इनर इंजिनिअरिंग : नवरात्री आणि विजयादशमीचे महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Navratri

भारतीय संस्कृती मानवी यंत्रणा आणि तिच्या पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि ईश्वरी शक्तीच्या विविध पैलूंशी असलेल्या उपजत नात्याचे सखोल निरीक्षण करून निर्माण झालेली आहे.

इनर इंजिनिअरिंग : नवरात्री आणि विजयादशमीचे महत्त्व

भारतीय संस्कृती मानवी यंत्रणा आणि तिच्या पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि ईश्वरी शक्तीच्या विविध पैलूंशी असलेल्या उपजत नात्याचे सखोल निरीक्षण करून निर्माण झालेली आहे. हे आपण आपले सण कधी आणि कसे साजरे करतो यामध्ये सुद्धा दिसून येते. नवरात्रीचा शब्दशः अर्थ ‘नऊ रात्र’. या नऊ रात्री अमावस्येपासून मोजल्या जातात. चंद्राच्या चक्राचे पहिले नऊ दिवस हे स्त्री तत्त्वाचे मानले जातात. हा देवीचा खास काळ आहे, जी ईश्वरी स्त्री तत्त्वाचे प्रतीक आहे. नवव्या दिवसाला म्हणतात नवमी. पौर्णिमेच्या आसपासचा दीड दिवस, हा पुरुष किंवा स्त्री असे दोन्ही गुण नसलेला काळ असतो. बाकीचे १८ दिवस हे पुरुष तत्त्वाचे असतात. स्त्री तत्त्वाचा काळ देवीचा असतो. म्हणूनच या परंपरेमध्ये, नवमीपर्यंत देवीची पूजा केली जाते.

वर्षामध्ये ९ दिवसांचे असे १२ समूह असतात आणि यांपैकी प्रत्येक समूह देवीच्या एक वेगळ्या पैलूबद्दल असतो. ऑक्टोबरच्या आसपास येणारी नवरात्री सर्वांत महत्त्‍वाची मानली जाते, कारण ती शारदेला समर्पित आहे जी ज्ञानाची आणि विद्येची देवी आहे. ज्या विविध गोष्टी मनुष्य करू शकतो, त्यापैकी या परंपरेने ज्ञानाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. इतर प्राणी आपल्याहून जास्त वेगात धावू शकतात; ते आपल्यापेक्षा जास्त बळकट असतात; ते अशा गोष्टी करू शकतात ज्या आपण करू शकत नाही - पण ते आपल्याप्रमाणे शिकू शकत नाही. मनुष्य असण्याचा अभिमान यातच आहे, की तुम्ही मनात आणल्यास काहीही शिकू शकता.

तुमच्या पूर्ण क्षमतेत बहरून येणे

नवरात्री ही पूर्णपणे देवीच्या विविध रूपांबद्दल आहे. काही रूपे अगदी प्रेमळ आणि छान आहेत. काही उग्र, भयंकर आणि भीतीदायक आहेत. ही एकमेव संस्कृती आहे जी अशा स्त्रीची पूजा करते जी तुमचे मुंडके छाटून टाकू शकते. हे यामुळे आहे की आपल्याला केवळ चांगल्या वागणुकीच्या अट्टाहासापायी एखाद्यामधल्या बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कौशल्याचा बळी द्यायचा नाहीये. चांगली वागणूक तुम्हाला समाजात मान्यता मिळवून देऊ शकते. तुमची वागणूक चांगली नसल्यास समाज तुम्हाला नाकारेल, पण जीवन तुम्हाला नाकारणार नाही. तुम्ही या पृथ्वीवरचे एकमेव व्यक्ती असाल, तर चांगली वागणूक म्हणजे काय हे सांगायला तुमच्या आसपास कुणीही नसेल. तुमची चांगली वागणूक फक्त तुमच्या आसपासच्या लोकांच्या समजुतीनुसार असते. पण जीवनाच्या दृष्टीने त्याला काही विशेष महत्त्व नाही.

मनुष्यांची घडण अशी आहे, की त्याच्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवन म्हणून तो त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणे. हे नऊ दिवस याच बद्दल आहेत. आणि दहावा दिवस आहे विजयादशमी, ज्याचा अर्थ विजयाचा दिवस, म्हणजेच तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेत बहरून आलात!