esakal | हेल्दी फूड : वर्क फ्रॉम होम आणि तब्येतीची काळजी!
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy

हेल्दी फूड : वर्क फ्रॉम होम आणि तब्येतीची काळजी!

sakal_logo
By
शौमा मेनन

नमस्कार, आपल्यापैकी अनेक जण सध्या अत्यंत आरामदायी स्थितीत असून, घरातील सोफ्यावर बसून ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहोत. मला विचाराल तर, हा अत्यंत आनंददायी बदल आहे, कारण यातून तुमचा ऑफिसमध्ये जाण्या-येण्याचा वेळ वाचतो आहे आणि त्यामुळे प्रदूषणातही मोठी घट होत आहे. याची नकारात्मक बाजू म्हणजे या परिस्थितीत आपल्या सर्वांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. आपल्या ‘लॉग इन’च्या वेळा निश्चित आहेत, मात्र व्यायामाच्या वेळा नाहीत. त्या खूपच अनियमित झाल्या आहेत. आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित आहेत, मात्र तुमच्या शेजारच्या खोलीमध्ये असलेला फ्रिज तुमच्यासाठी हानिकारक ठरत आहेत. विचार न करता खाण्याची सवय तुम्हाला जडली आहे! त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे आरोग्य चांगले राखण्यासाठीच्या टिप्स पाहूयात व तुमची आरोग्यविषयक ध्येये पुन्हा एकदा मार्गावर आणण्याचा प्रयत्न करूयात...

लवकर झोपण्याचा प्रयत्न करा

तुमच्या ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला रात्री नऊच्या आत सुट्टी द्या. त्यामुळे उशिरापर्यंत स्क्रीनसमोर बसण्याऐवजी तुम्ही लवकरच अंथरुणाला टेकाल.

लवकर उठून कामाला लागा

पहिली टीप पाळल्यास ही पाळणे तुम्हाला सोपे जाईल! तुम्ही दिवसाची सुरूवात लवकर केल्यास तुम्हाला स्वतःसाठीच्या गोष्टी करण्यास अधिक वेळ मिळतो. ऑफिसचे कॉल सुरू होण्याआधी तुम्ही कोणत्याही व्यत्ययाविना ती कामे पूर्ण करू शकता!

व्यायामाचे नियोजन करा

तुम्हाला करायच्या व्यायामाचे नियोजन आदल्या रात्रीच करून ठेवा. ही अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करणार आहात, हे माहिती नसल्यास तुम्ही रडतखडत व्यायाम सुरू करता आणि त्यामुळे तुम्हाला व्यायामात कोणताही रस वाटत नाही. तुमच्या अंगात आळस शिरतो आणि तुमच्या व्यायाम होत नाही.

जेवणाचे नियोजन करा

तुम्ही खाणार असलेल्या भाज्या आदल्या दिवशी चिरून ठेवा, अंडी उकडून ठेवा, अन्नातू घेण्याचे प्रोटिन्स भाजा व हे सर्व फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला भूक लागल्यानंतर घाईत काहीही तोंडात टाकण्यापेक्षा तुम्ही योग्य आहार निवडू शकाल.

उपवास करू नका

उपवास केल्याने तुमचे पोट कमी होणार नाही. त्याउलट उपवासात भूक लागल्यास तुम्ही विचार न करता काहीही खाल आणि त्यातून तुमचे वजन वाढेल.

स्वतःला थोडा वेळ द्या

मला माहिती आहे, तुमचे काम खूप थकवणारे आहे आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करताना आपण आपल्या विश्रांतीच्या वेळेचाही त्याग करीत आहात. मात्र, कामाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर किंवा मानसिकतेवर होऊ देऊ नका. स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही थकलेले असण्यापेक्षा आरोग्यपूर्ण असता, तेव्हा अधिक उत्पादनक्षम काम करू शकता, हे लक्षात ठेवा.

पुढील आरोग्यपूर्ण आठवड्यासाठी शुभेच्छा.

loading image