मन करा रे प्रसन्न

सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
Tuesday, 14 January 2020

निरामय आरोग्यासाठी नियमित व्यायाम, पथ्याबरोबर मन-शांतीसाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगी बाणवायला हव्यात. 

कोणती पथ्ये पाळतेस?
सोनाली -
सूर्योदय ते सूर्यास्त यादरम्यान आपण जे जे खाल्लं ते आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला कोणताही आजार वा त्रास होणार नाही. पोटाचे विकारही होत नाहीत. मात्र, दिवसाच्या सुरुवातीलाच फळं खावीत. कारण, त्यातील साखर पचायला वेळ लागतो. त्यामुळं फळं संध्याकाळनंतर खाणं टाळावंच. सूर्योदयाला जास्त खावं, कारण पचनक्रिया उत्तम राहते. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा असते. मात्र, सूर्यास्त जवळ येऊ लागल्यानंतर खाणं कमी करावं. कारण, त्यानंतर पचनशक्ती कमी होत जाते. आपले पूर्वजही हाच नियम पाळत होते. त्यामुळं त्यांची शरीरयष्टी खूपच चांगली होती. ते कधीही आजारी पडत नव्हते. आता त्यांच्यासारखीच वेळेची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 व्यायाम कधी करतेस?
सोनाली -
मी दररोज न चुकता वेळच्या वेळी व्यायाम करते. व्यायामाच्या प्रकारांमध्ये मी नेहमीच बदल करत असते. किक बॉक्‍सिंग, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, एरियल सिल्क, एरियल योगा, पॉवर योगा हे प्रकार करते. ते फिटनेस प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करते. कारण, त्यांना त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती असते. मला कधी कधी चित्रपटातील व्यक्तिरेखेनुसार आणि भूमिकेनुसार लुक आणि वजन कमी-जास्त करावं लागतं. त्या वेळी माझे फिटनेस गुरू प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करते. विशेष म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी सर्वच व्यक्तिरेखेनुसार माझा लुक नैसर्गिकरीत्या बदलून दिला आहे. मला हवी ती फिटनेस लेव्हल मिळाली. अनेक जण कोणाचेही मार्गदर्शन न घेता किंवा कधी कधी व्हिडिओ पाहून व्यायाम, आसनं करत असतात. नंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळं मार्गदर्शन घेतल्याशिवाय व्यायाम वा योगासने, प्राणायाम करू नका.

मन-शांतीसाठी काय करते?
सोनाली -
खरंतर आपल्या कुटुंबाचा, मित्रमैत्रिणींचा, आजूबाजूच्या लोकांचा आपल्या वेलनेसवर परिणाम होत असतो. त्यामुळं आपल्या मनातील भावना व्यक्त करणं गरजेचं आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करतात. पण, त्यातून मन-शांती मिळत नाही. त्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर आपलं मन मोकळं करत जा. त्यातून समुपदेशनही होत असतं. योग्य व्यक्तीपाशी भावना व्यक्त केली, तर आपलं मनही हलकं होतं. त्यासाठी चित्रपट, मालिका, नाटकं पाहा. नेटफ्लिक्स, ॲमेझॉनचे पर्यायही अवलंबा. आपल्याला एखादा छंद असेल, तर तो जोपासा. कारण, आपण स्वत-ला सकारात्मक ठेवणं हेच आपल्यासाठी खूप मोठं आव्हानं असतं. त्यामुळं आपल्यातील कलेला वाव द्या. मला नृत्य करायला आवडतं. त्यातून ऊर्जा मिळते. काही जणांना गायला आवडतं. काही जण वेगवेगळे खेळ खेळतात. त्यातून त्यांना समाधान मिळतं. यालाच मन-शांती म्हणतात.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonali kulkarni actress fitness