सोनोग्राफी, स्त्रीची जीवलग मैत्रीण

sonography
sonography

स्त्री, सोनोग्राफी व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचं एक अतूट नातं निर्माण झालं आहे. कारण स्त्रीच्या वेगवेगळ्या वळणांवर (पौगंडावस्था, प्रजननशील व प्रौढावस्था) व आजारांवर सोनोग्राफी एखाद्या जीवलग मैत्रिणीसारखी मदत करते. स्त्रीला होणारा त्रास, शारीरिक तपासणीचे निष्कर्ष यावरून डॉक्‍टर काही अनुमान बांधतात व निदान निश्‍चित करण्यासाठी सोनोग्राफीचा मोठा सहभाग आहे.
1) पौगंडावस्था : स्त्रियांच्या आयुष्यातील ही एक अतिशय दोलायमान अवस्था आहे. कारण यामध्ये ती बालपणातून तारुण्यात पदार्पण करीत असते. बऱ्याच किशोरवयीन मुलींना पाळीचे वेगवेगळे त्रास असतात. त्याची शहानिशा लवकरच केलेली बरी. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तिची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. बऱ्याचदा या मुलींची सोनोग्राफी करावी लागते.
सोनोग्राफी केव्हा व का करावी?
1. पाळीच्या वेळी पोटात अति दुखणे
2. पाळी लवकर लवकर येणे, जास्त दिवस जाणे अतिरक्तस्त्राव, अनियमित रक्तस्त्राव
3. ओटीपोटात गाठ लागणे
4. पाळीच सुरू न होणे
5. नियमित असलेली पाळी चुकणे/ पाळी न येणे
6. पाळी खूप उशिरा उशिरा येणे
सोनोग्राफीमुळे मुलींच्या जननेंद्रियांच्या कितीतरी आजाराचे निदान होते. उदा. जन्मदोष, गर्भाशयाच्या गाठी (Fibroid), बीजकोषाच्या गाठी (Ovarian tumor) इ. वेळीच निदान झाल्यास पुढे होणाऱ्या मोठ्या आजाराचा संभाव्य धोका टळतो. या मुलींमध्ये सोनोग्राफीची चाचणी पोटावरून (abdominal) करावी लागते. त्यासाठी निदान चार तास लघवी न करता मूत्राशय पूर्ण भरलेलं असेल, अशी काळजी घ्यावी लागते.
2) प्रजननशील अवस्था :
यामध्येही आपण तीन गट करू शकतो.
1. वंध्यत्व असलेली स्त्री
2. गर्भवती स्त्री
3. गर्भवती व वंध्यत्व नसलेली स्त्री
1. वंध्यत्व असलेली स्त्री :- वंध्यत्वामध्ये, सोनोग्राफीचा सहभाग ही जगमान्य गोष्ट आहे. सोनोग्राफीशिवाय वंध्यत्वाच्या उपचाराची सुरुवातच होत नाही. यामध्ये सोनोग्राफी दोन प्रकाराने करता येते. Abdominal (पोटावरून) व Transvaginal (योनीमार्गाद्वारे). वंध्यत्वामध्ये प्रामुख्याने Transvaginal सोनोग्राफीचा वापर होतो. बऱ्याच जणांना वाटतं सोनोग्राफीने नेमकं काय कळतं? व किती वेळा करावी लागणार?
स्त्रियांमध्ये आंतरजननेंद्रिये सोनोग्राफीद्वारा तपासली जातात. (Ovulation Study) बीज कोषात होणाऱ्या बदलांचा अभ्यास. सोनोग्राफीच्या मदतीमुळे आपण ही अतिशय महत्त्वाची तपासणी अगदी सहजपणे करून खूप माहिती मिळवू शकतो. बीजकोषात असणाऱ्या पुटकांचा अभ्यास. प्रत्येक स्त्रीमध्ये पुटकांची संख्या वेगवेगळी असू शकते. टेस्ट ट्यूब बेबी उपचारामध्ये तर सोनोग्राफीच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
"स्त्रीहार्मोन्समुळे त्या पुटकांत होणाऱ्या बदलांची नोंद घेता येते. तसेच या स्त्रियांना हार्मोन्सची इंजेक्‍शन्स देऊन पुटकांची संख्या वाढवतात. त्यामुळे त्यात होणारे बदल, वाढ त्याचबरोबर गर्भाशयातील आतल्या आवरणात होणारे बदल या सर्वांचे निरीक्षण सोनोग्राफीद्वारा केले जाते. त्या स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर ही स्त्रीबीजे सोनोग्राफीद्वारे बाहेर काढतात. त्यानंतर लॅबमध्ये त्या बीजांचे शुक्राणूंबरोबर संयोग करून त्याचा गर्भ बनवला जातो. हा गर्भ परत गर्भाशयात सोनोग्राफीच्या मदतीने कॅथेटरद्वारे ठेवला जातो.
2. गर्भवती स्त्री :- गर्भवती स्त्रीला गर्भ राहिल्यापसून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल बघणं हे एक विलक्षण आश्‍चर्य केवळ सोनोग्राफीमुळे साध्य झालं आहे. अगदी बाळाच्या ठिपक्‍याएवढ्या अंशापासून ते त्याची जडणघडण आणि पूर्ण वाढ आपण नोंद करू शकतो. याशिवाय गर्भात असणारे आजार, विकार, दोष यांची पण बऱ्याच अंशी माहिती मिळू शकते. बऱ्याच वेळा त्यावर आपण उपाययोजना पण करू शकतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील लेखात बघू.
3. प्रौढावस्था :- बऱ्याच स्त्रियांना वाटतं की आता चाळिशीनंतर तपासण्याची काय गरज आहे. खरे तर वयाच्या चाळिशीनंतर स्त्रीचे तिसरे वळण (टप्पा) चालू होते. अशा स्त्रियांनी दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून आतून तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर दरवर्षी एकदा सोनोग्राफी करणे आवश्‍यक आहे. सोनोग्राफीमुळे खालील गोष्टींचे निदान होऊ शकते.
1. गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये साध्या गाठी होणे. (fibroid) या गाठी गर्भाशयाच्या वेगवेगळ्या भागात असू शकतात. जसे अंतःस्तर किंवा मधला स्तर किंवा बाह्य स्तर. सोनोग्राफीमुळे या गाठींच्या स्थानाचे जवळपास अचूक निदान होते. कारण या गाठी सर्वसाधारणपणे कर्करोगकारक नसतात पण त्या गर्भाशयाच्या ज्या भागात आहेत त्याप्रमाणे त्याचे त्रास, लक्षणे स्त्रियांमध्ये दिसून येतात. तसेच या गाठींमुळे होणारा अनियमित रक्तस्त्राव त्या गाठींच्या गर्भाशयातील स्थानावर अवलंबून असतात.
2. गर्भाशयाच्या आतल्या अस्तराची जाडी वाढणे. (Hyperplasia)
3. गर्भाशयाच्या पोकळीत गाठी वाढणे (polyps)
एक साधीशी योनीमार्गातून पाळीनंतर केलेली सोनोग्राफी, गर्भाशयाच्या पोकळीतील अगदी छोट्याशा गाठीचे निदान करू शकते. अशा स्त्रियांना पाळीमध्ये खूप रक्तस्त्राव होतो. तर या गाठीचे निदान व्यवस्थित झाले तर योनीमार्गातून दुर्बिणीद्वारे ही गाठ काढता येते. कारण बऱ्याचदा ही गाठ कॅन्सरची नसते. या गाठीसाठी पूर्ण गर्भाशय काढायची गरज नसते. सोनोग्राफीच्या निदानाआधारे अनावश्‍यक, मोठ्या व त्रासदायक शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो.
4. बीजकोषांमध्ये गाठी तयार होणे (Ovarian Tumor)
बीजकोषातील गाठींच्या निदानासाठी तर सोनोग्राफीचा महत्त्वाचा सहभाग आहे. कारण बऱ्याच स्त्रियांना या गाठींचा त्रास होत नसतो. त्याप्रमाणे गर्भाशयाच्या इतर ट्युमरमध्ये स्त्रियांना रक्तस्त्राव वगैरे होतो, त्याप्रमाणे बीजकोषांच्या गाठींचा असा त्रास बहुतांशी नसतो. म्हणून काही वेळा इतर कारणांसाठी सोनोग्राफी करताना बीजकोषाच्या गाठींचे निदान होते.
5. गर्भाशयाचा कॅन्सर
कधी कधी बीजकोषांचा ट्युमर कर्करोगकारक आहेत की नाही हे पाहण्यासाठी कलर डॉपलरचा उपयोग होतो. बऱ्याचदा ज्या स्त्रियांवर कर्करोगाचे उपचार चालू असतात त्या स्त्रियांमध्ये निदानाबरोबरच सोनोग्राफीच्या फेरतपासणीला (Follow up) खूप महत्त्व आहे.
या सर्व बाबींमुळे प्रौढावस्था किंवा उतार वयात सोनोग्राफीमुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
लक्षात ठेवा :
1. सोनोग्राफीची तपासणी कुठल्याही वयोगटांमध्ये हानिकारक नाही .
2. या प्रकारच्या सोनोग्राफीसाठी उपाशी पोटी जायची गरज नाही.
3. सोनोग्राफी क्‍लेशकारक वा अपायकारक नसते.
4. सोनोग्राफी करण्यासाठी पाच ते वीस मिनिटांचा कालावधी लागू शकतो. कोणत्या कारणासाठी सोनोग्राफी करायची आहे त्यावर ते अवलंबून आहे.
5. सोनोग्राफीमुळे पेशंटवर काहीही दुष्परिणाम होत नाही.
6. प्रत्येक सोनोग्राफीचे निदान अगदी अचूकच असेल असे नाही. पण साधारणतः 95 टक्के निदान बरोबर असते. अशी ही फारशी खर्चिक नसलेली, मैत्रीपूर्ण आपली काळजी घेणारी सोनोग्राफी आपण गरज असताना का करू नये?


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com