esakal | गर्भधारणेतील सोनोग्राफीची महत्त्वाची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

pregnency

आजकाल गर्भवती स्त्रीला काहीही त्रास नसला तरी कमीत कमी तीन-चार वेळा सोनोग्राफी सांगितली जाते. काही पेशंटमध्ये गर्भवतीच्या त्रासाप्रमाणे सोनोग्राफी जास्त वेळा करावी लागते. बऱ्याचदा सगळ्यांना प्रश्‍न पडतो की, सोनोग्राफी इतक्‍या वेळा करायची काय गरज आहे. आज आपण गर्भवती स्त्री व सोनोग्राफीबद्दल माहिती मिळवू या.

गर्भधारणेतील सोनोग्राफीची महत्त्वाची भूमिका

sakal_logo
By
डॉ. सुषमा देशमुख

रचिताची high-risk प्रेग्नन्सी होती. तिचे वय 34 वर्षांचे होते. मधुमेह व रक्तदाब आधीपासूनच होता. खूप विचाराअंति तिने प्रेग्नन्सी प्लॅन केला होता. सगळं काही आटोक्‍यात होतं. पण, सहा महिन्यांतच लक्षात आलं की, बाळाची वाढ खुंटली आहे. मग तिला ऍडमिट करून त्याचे विशेष उपचार केले. दर आठ ते दहा दिवसांनी डॉपलर सोनोग्राफी (ज्यामुळे बाळाला मिळणाऱ्या रक्तप्रवाहाचा दाब व अनेक गोष्टी कळतात.) करून कसेबसे आठ महिन्यांनंतर प्रसूती केली. बाळाचे वजन दोन किलो निघाले. बाळाला 3 ते 4 दिवस लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात ठेवले. बाळ व बाळंतीण आता सुखरूप आहेत. ही सर्व सोनोग्राफीचीच कृपा.
अशी अनेक प्रकारची जोखमीची बाळंतपणे सोनोग्राफीमुळे आम्ही व्यवस्थित पार पाडू शकतो.
आजकाल गर्भवती स्त्रीला काहीही त्रास नसला तरी कमीत कमी तीन-चार वेळा सोनोग्राफी सांगितली जाते. काही पेशंटमध्ये गर्भवतीच्या त्रासाप्रमाणे सोनोग्राफी जास्त वेळा करावी लागते. बऱ्याचदा सगळ्यांना प्रश्‍न पडतो की, सोनोग्राफी इतक्‍या वेळा करायची काय गरज आहे. आज आपण गर्भवती स्त्री व सोनोग्राफीबद्दल माहिती मिळवू या.
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळेला सोनोग्राफी केली जाते.

I) पहिली सोनोग्राफी दीड ते दोन महिन्यांत करतात.
यामध्ये खालील गोष्टी पाहतात.

1. गर्भधारणा नक्की आहे का?
2. गर्भधारणा असेल, तर ती किती आठवड्यांची आहे.
3. गर्भाच्या हृदयाची हालचाल
4. गर्भ हा एक आहे की अनेक आहेत.
5. तसेच कधी कधी आंतर्जननेंद्रिये व त्याच्याशी निगडित आजार असतील, तर सोनोग्राफीमुळे त्याची माहिती होते. उदा. गर्भाशयातील गाठी (Fibroid) अंडकोषाच्या गाठी (Cysts)
6. कधी कधी गर्भ हा गर्भाशयात नसून बीजनलिकेत असतो. ही अतिशय गंभीर बाब असते. याला इक्‍टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. बीजनलिका कमकुवत असल्यामुळे किंवा वाढणारा गर्भ सामावून घेण्याची क्षमता अजिबात नसल्यामुळे ती नलिका फुटते. त्यामुळे पोटात रक्तस्राव होऊन गर्भवतीच्या जीवाला धोका होऊ शकतो. सोनोग्राफीमुळे याचे निदान बऱ्यांच अंशी होऊ शकते. किंवा इक्‍टोपिक प्रेग्नन्सीची शंका आल्यास व सोनोग्राफीमध्ये गर्भ गर्भाशयात दिसत नसेल, तर इतर महत्त्वाच्या तपासण्या करून या जिवावर उठणाऱ्या त्रासाचे निराकरण करता येते.
7. काही स्त्रियांना पाळीची तारीख माहिती नसते. किंवा त्यांनी सांगितलेल्या तारखा चुकीच्या असतात. सोनोग्राफीमुळे गर्भ नक्की किती आठवड्यांचा आहे, हे बरोबर समजते. यामुळे प्रसूतीच्या तारखेची निश्‍चिती करता येते.
8. बऱ्यांच वेळेला गर्भाचे रूपांतर छोट्या छोट्या पाणी भरलेल्या गाठींमध्ये होते. याला द्राक्षगर्भ म्हणतात. याचे अचूक निदान सोनोग्राफीद्वारे होऊ शकते. हा पण स्त्रियांसाठी एक गंभीर आजार आहे.
9. काही स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होत असतो. अशा स्त्रियांमध्ये सोनोग्राफीच्या मदतीने आपण उपचार करू शकतो.
10. काही वेळा पहिल्या तीन महिन्यांत गर्भाच्या सभोवताली असणाऱ्या पिशवीच्या बाहेर काही कारणाने रक्तस्राव होऊन रक्ताची गुठळी तयार होते. यामुळे गर्भपात होण्याची भीती असते. सोनोग्राफीमुळे ही बाब लक्षात येऊन आपण वेळीच उपाययोजना करू शकतो.

II) दुसरी सोनोग्राफी तीन ते चार महिन्यांत करतात (11-14 Weeks) यावेळी आपल्याला छोटासा तयार झालेला गर्भ दिसतो. छोटे-छोटे अवयव पण दिसतात.
a) यामध्ये गर्भाची वाढ पाहिली जाते.
b) या वेळेपर्यंत गर्भाला छोटे हात पाय फुटायला सुरुवात होते.
c) गर्भाच्या हृदयाची, गर्भाची हालचाल दिसते.
d) गर्भाचे इतर अवयव पाठीचा कणा या विषयी पण बारकाईने पाहणे जरुरीचे असते.
याच कालावधीत न्युकल फोल्ड थिकनेस ही महत्त्वाची गोष्ट पाहतात. यामध्ये सोनोग्राफीद्वारे बाळ एका विशिष्ट पोझिशनमध्ये आणून बाळाच्या मानेची मागील त्वचा व स्पाईन यामधील जाडी मोजतात. जर ही जाडी प्रमाणाबाहेर जास्त असेल, तर एक विशिष्ट प्रकारचा आजार बाळाला असू शकतो. ज्याला डाउन्स सिंड्रोम म्हणतात. या आजारात बाळ मतिमंद असते. सोनोग्राफीमुळे एका महत्त्वाच्या आहाराची प्राथमिक चिकित्सा आपण करू शकतो.

III) तिसरी सोनोग्राफी चौथ्या ते पाचव्या महिन्यांत केली जाते (18-22 weeks)
या सोनोग्राफीला बरेच जण टार्गेटेड सोनोग्राफी म्हणतात.

ही खूप महत्त्वाची सोनोग्राफी असते. तीन ते चार महिन्यांतसुद्धा आजकाल ही विशेष सोनोग्राफी करतात. यामध्ये बाळाचा एकूण एक अवयव सोनोग्राफीवर दिसतो. ही सोनोग्राफी करताना सर्वांत आधी गर्भाच्या हृदयाचे ठोके व इतर अवयव यावरून एक दृष्टिक्षेप टाकून मग गर्भाच्या डोक्‍यापासून सविस्तर तपासणी सुरू करतात. या सोनोग्राफीमध्ये गर्भाच्या वेगवेगळ्या भागांचे मोजमाप करतात व गर्भाची वाढ त्या महिन्याप्रमाणे बरोबर आहे का ते पाहतात. तसेच गर्भात काही दोष किंवा व्यंग्य आहे का, हेही आपल्याला बऱ्यापैकी समजू शकते. उदा. गर्भाचे डोके, गर्भाच्या पाठीचा कणा, गर्भाच्या पोटाची तपासणी, गर्भाचे हृदय, गर्भाचे हात-पाय व गर्भाचा चेहरा.
आजकाल III-D, IV-D आपण गर्भ खूप चांगल्यारीतीने पाहू शकतो. इतकेच नव्हे, तर यामध्ये गर्भांच्या चेहऱ्यावरचे भाव पण टिपता येतात. इतकेच नव्हे, तर गर्भाच्या हालचाली, मान पुढे-मागे होणे (Flexion-extension) असे सर्व काही दिसते. तसेच खालील महत्त्वाच्या गोष्टींची पण माहिती मिळते.

a) गर्भजल : गर्भजल व त्याची कमी-जास्त पातळी पाहता येते.
b) प्लॅसेंटा (वर) : याला खूप महत्त्व आहे. कारण आईकडून बाळाला रक्तपुरवठा याच्यामार्फतच होतो. याचे स्थान गर्भाशयाच्या पिशवीच्या वरच्या भागाला असते. जर हा आपल्या स्थानापासून गर्भाशयाच्या तोंडाकडे सरकला तर गर्भवतीसाठी त्रासदायक होऊ शकते.

IV) चौथी सोनोग्राफी सात ते आठ महिन्यांत करतात (28-32 weeks)
सात महिने पूर्ण होईपर्यंत बाळाचे वजन 1 ते सव्वा किलो होते. नंतरच्या दोन महिन्यांत बाळाच्या शरीराची चांगलीच वाढ होते. म्हणून याला Growth scan असेही म्हणतात.
काही गर्भवती स्त्रियांमध्ये सुरुवातीला चांगली असणारी वाढ शेवटच्या दोन महिन्यांत मंदावते. यामुळेही सोनोग्राफीसुद्धा महत्त्वाची आहे. यामध्ये आपण खालील गोष्टी बघतो.
बाळाची वाढ, गर्भजलाची पातळी, बाळाचे वजन, बाळातील जन्मदोष, प्लॅसेंटाची पोझिशन, बाळाची पोझिशन व नाळ व डॉपलर सोनोग्राफी. डॉपलर सोनोग्राफी ही खूप महत्त्वाची तपासणी आहे. डॉपलर म्हणजे रक्तपुरवठा करणाऱ्या धमनींच्या रक्तप्रवाहामधील बदल व निरीक्षण.
अशाप्रकारे सोनोग्राफीमुळे गर्भवती स्त्री व डॉक्‍टर यांना पूर्ण नऊ महिने गर्भवती स्त्री व तिच्या होणाऱ्या बाळाबद्धल अतिशय महत्त्वाची माहिती मिळते.

थोडक्‍यात...
a) सोनोग्राफी हे गर्भवती स्त्रीसाठी महत्त्वाचे व अपरिहार्य उपकरण आहे.
b) सोनोग्राफीचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्या.
c) डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे सोनोग्राफी गरजेनुसार करणे आवश्‍यक आहे.
d) पण लक्षात ठेवा : सोनोग्राफीने बाळाचे लिंग जाणणे हा कायद्याने गुन्हा आहे. सोनोग्राफीचा दुरुपयोग करू नका.

loading image