चेतना तरंग : तुमचे सौंदर्य कसे वाढेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री श्री रविशंकर

तुम्ही तक्रार करीत नसाल आणि तुम्ही जबाबदार, धैर्यवान, आत्मविश्वासपूर्ण, रिक्त आणि पोकळ असाल, तेव्हा तुम्ही अवर्णनीयरीत्या सुंदर असता.

चेतना तरंग : तुमचे सौंदर्य कसे वाढेल

तुम्ही तक्रार करीत नसाल आणि तुम्ही जबाबदार, धैर्यवान, आत्मविश्वासपूर्ण, रिक्त आणि पोकळ असाल, तेव्हा तुम्ही अवर्णनीयरीत्या सुंदर असता.

या जगात रमणारे मन तक्रारींचे सूर आळवते. दैवीशक्तीत रमणारे मन नाचत बागडत असते. काहीतरी उपाय न सांगता केवळ तक्रार करणे ही बेजबाबदार वृत्ती आहे. चुकांचे निरसन करण्याच्या दिशेने पावले न उचलणाऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकारच नाही. आणि जो चुका सुधारण्यासाठी उपाय शोधून कार्य करतो, तो कधी तक्रार करीत नाही. एखादा उपाय उपयुक्त ठरत नसेल, तर दुसरा नवा मार्ग शोधण्यास धैर्य लागते.

तक्रारीचा सूर ही दुर्बळ मनाची खूण आहे. अशी व्यक्ती पूर्णतः अज्ञानात असते आणि तिला आपल्या आत्म्याची ओळख नसते. तक्रार ही तुमच्यातील जन्मजात सौंदर्याला झाकोळून टाकते आणि अध्यात्माच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीत हे सौंदर्य नक्कीच दिसते.

  • बाह्य सौंदर्यासाठी तुम्ही विविध सौंदर्य प्रसाधने वापराल, पण आंतरिक सौंदर्यासाठी तुम्हाला तुमच्या तक्रारीसह सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतील.

  • बाह्य सौंदर्यासाठी तुम्हाला कृत्रिम प्रसाधने आहेत. आंतरिक सौंदर्यासाठी तुमच्या अकृत्रिम जन्मजात क्षमतेची जाणीव हवी फक्त.

समर्पणवृत्ती आणि वचनबद्धता

तुमच्या कारमधील इंधन संपते आणि तुम्हाला ते पुनःपुन्हा भरावेच लागते. याचप्रमाणे तुमची समर्पणवृत्ती आणि वचनबद्धता देखील काळानुसार कमी होत जातात आणि त्यांची पुनर्जागृती करावी लागते. तुम्हाला पुन्हा शरणागत व्हावे लागते. अनेकदा, आपण समर्पित आहोच, असे मानून लोक जगत असतात. असे केल्याने मन हळूहळू तक्रार आणि हट्टाने मागण्या करू लागते. तुम्ही पूर्णतः समर्पित असत नाही, तेव्हा तक्रारी आणि कुरकूर होऊ लागतात.

संपूर्ण समर्पणामुळे आपल्यात प्रचंड उत्साह, ऊर्जा, विश्वास आणि आव्हान स्वीकारण्याची क्षमता उत्पन्न होतात. अशामध्ये मग गर्वाला वा अहंकाराला जागाच नसते.