चेतना तरंग : गायन, संवाद आणि अहंकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri sri ravi shankar

परस्पर संवाद तीन प्रकारचा असतो; मस्तका-मस्तकांमधील संवादामध्ये तुम्ही बोलता, हृदयाच्या संवादामध्ये तुम्ही गाता आणि आत्म्यांमधील संवादामध्ये तुम्ही मौन राहता.

चेतना तरंग : गायन, संवाद आणि अहंकार

परस्पर संवाद तीन प्रकारचा असतो; मस्तका-मस्तकांमधील संवादामध्ये तुम्ही बोलता, हृदयाच्या संवादामध्ये तुम्ही गाता आणि आत्म्यांमधील संवादामध्ये तुम्ही मौन राहता.

अनेकदा लोकांशी भेट झाली, की तुम्ही मस्तकांमधील संवाद साधाल. तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असताना त्याच्याशी हृदयाने संपर्क साधाल आणि म्हणून गाऊ लागाल. लोकांच्या संपर्कात तुम्ही बोलत राहाल, बरळतसुद्धा राहाल, कारण तिथे तुमचा संवाद मस्तकांच्या पातळीवरच राहतो. उलट निसर्गाबरोबरचा संवाद हृदयाने होत असल्याने तुम्ही गाऊ लागाल. आणि जेव्हा तुम्ही गुरूच्या सान्निध्यात येता, तेव्हा तुम्ही सर्व प्रश्न विसरून जाऊन निःशब्द व्हाल. मग तुमचा संवाद हा मौनामध्ये, आत्म्याच्या पातळीवर होतो.

लोकांबरोबरच्या भेटीत तुम्ही मस्तकाच्या पातळीवर राहू पाहता. गाण्याचे प्रयोजन केले असेल, तर तसे प्रसंग सोडून इतर वेळी लोकांमध्ये तुम्ही गाऊ लागत नाही. अशा वेळी तुमचा अहंकार तुम्हाला गाऊ देत नाही. त्यामुळे लोकांमध्ये गाणे अनेकांना सुखकारक, सहज वाटत नाही.

पण तुम्ही लोकांच्या सान्निध्यात गाऊ शकाल तर तुम्ही हृदयाच्या व भावनांच्या पातळीवर पोचाल. काहीजणांना संगीत केवळ ऐकायला आवडते. काहींना एकटे असतानाच गाणे बरे वाटते. काहीजण लोकांचे ध्यान आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना भुरळ पाडण्यासाठी गाऊ लागतात. काहीजण मात्र इतर सर्व गात असतील तर त्यांना सामील होतात. अशा सर्व प्रकारचे गायन अहंकारातून येते. भजन म्हणजे सहभागी होणे, वाटून घेणे. हा सहभाग आपल्या अस्तित्वाच्या अत्यंत खोल पातळीवरून होतो. भजन हाच खरा सहभाग आहे.

तुम्ही इतर लोकांबरोबर सहज गाऊ लागाल, तर मग अहंकार तुटून पडतो.

लहान मुलांना अहंकार नसतो आणि त्यामुळे ते लोकांबरोबर गाऊ लागतात. अनोळखी व्यक्तीबरोबर गायचे असेल तर तुम्ही अहंकारापासून मुक्त व्हायला हवे. अहंकार तुम्हाला अनोळखी व्यक्तीबरोबर गाऊ देणार नाही.

मस्तकाची पातळी अहंकारासाठी सुरक्षित असते. हृदयाची पातळी अहंकाराचे तुकडे करते. आत्म्याच्या पातळीवर अहंकार विरघळून जातो. संवादात अहंकारामुळेच फुट पडते.

गृहपाठ / स्वाध्याय: लोकांमध्ये असताना फक्त बोलत न राहता गायला सुरवात करा. लगेच वातावरणातील ऊर्जेमध्ये घडणारा बदल अनुभवा. आणखी गंमत हवी असेल, तर एखाद्या अनोळखी व्यक्तीचे स्वागत गाऊन करा.

Web Title: Sri Sri Ravi Shankar Writes Singing Dialogue And Ego

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..