चेतना तरंग : आनंदापासून मुक्‍तीतच सुख!

श्री श्री रविशंकर
Tuesday, 2 March 2021

लहान मुलांना चॉकलेट, आइस्क्रीम आणि गोळ्यांचे आकर्षण असते. पण ते न मिळाल्यास मुले दरवाज्यावर डोके आपटतील, जमिनीवर गडाबडा लोळतील. ते आइस्क्रीम किंवा चॉकलेट मिळण्यासाठी सर्व काही करतील. पण मोठी माणसे चॉकलेटसाठी असे करणार नाहीत. कामात व्यग्र झाल्यावर त्यांना जेवणाचे सुद्धा भान राहणार नाही.

लहान मुलांना चॉकलेट, आइस्क्रीम आणि गोळ्यांचे आकर्षण असते. पण ते न मिळाल्यास मुले दरवाज्यावर डोके आपटतील, जमिनीवर गडाबडा लोळतील. ते आइस्क्रीम किंवा चॉकलेट मिळण्यासाठी सर्व काही करतील. पण मोठी माणसे चॉकलेटसाठी असे करणार नाहीत. कामात व्यग्र झाल्यावर त्यांना जेवणाचे सुद्धा भान राहणार नाही. उलट ते म्हणतील जेवलो नाही ते एका अर्थी बरेच झाले, त्यामुळे माझे वजन वाढणार नाही. मुले मात्र जेवायला मिळाले नाही, तर रडतील, आक्रस्ताळेपणा करतील. यालाच ‘विरक्ती’ म्हणतात. विरक्ती म्हणजे काय? आनंदाचा विसर पडला पाहिजे. एखादी गोष्ट मिळाली काय किंवा न मिळाली काय, त्याबद्दल सुख-दु:ख वाटता कामा नये. आनंदापासून मुक्ती मिळविण्यातच खरे सुख असते. दु:ख तुम्हाला बंधनात टाकत नाही, पण सुखामुळे तुम्ही बंधनात अडकता. सुखाच्या अभिलाषेमुळे तुम्ही स्वत:वर बंधने लादून घेता. या सुखाच्या अपेक्षेतून मुक्त होण्यातच खरे स्वातंत्र्य दडलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्ही तुमची आसक्ती सोडू शकल्यास तुमच्या मनातला दुस्वास दूर करण्याचा वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यातले आसक्तीचे बीज जाळून टाका; म्हणजेच तुमच्यात आधीच वसलेले अद्वैताचे ‘ब्रह्मन’ उसळून वर येईल. त्या सिंहासनावर तुम्ही विराजमान का होत नाही? ते सिंहासन तुमच्यासाठीच आहे. तुमच्याच मालकीच्या गोष्टी मिळविण्यासाठी फाटके कपडे घालून विपन्न अवस्थेत भिकाऱ्यासारखे आजूबाजूला का भटकत आहात? सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ‘भिकारी बनू नका.’ आसक्ती आणि  

अभिलाषेमुळे तुम्ही भिकारी बनता. जो भीक मागत फिरतो त्याला कोणी काही देत नाही. जागे व्हा! तुम्ही ‘राजा’ आहात. कोणते सुख तुम्हाला हवे आहे? जे पाहिजे ते तुम्हाला आपोआप मिळेल. सर्व सुखे तुमच्या पायाशी लोटांगण घालतील. आनंद आणि सुख मिळविण्यासाठी भिकारी बनू नका. काही वेळा लोक तुमच्याकडे काहीतरी मागायला येतात, पण त्यांना काही द्यावे असे मात्र तुम्हाला मनापासून वाटत नाही, उलट लोक ‘मला काही नको’ असे म्हणतात, त्यांना मात्र तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते. माणसाची अशी वृत्तीच असते. ज्या क्षणी कोणी तुमच्याकडे काही मागायला येतात त्या क्षणीच तुम्ही दोन पावले मागे सरता. माणसाचा हा स्वभावधर्मच आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निसर्गसुद्धा याला अपवाद नाही. तो सुद्धा हाच नियम पाळतो. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जितक्या विनवण्या कराल, त्या गोष्टीच्या मागे लागाल तितकी ती गोष्ट तुमच्यापासून लांब जाते. ज्या क्षणी हा पाठलाग तुम्ही थांबवाल आणि आत्मतत्त्वात विलीन व्हाल त्यावेळी तीच गोष्ट तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठा प्रमाणात आपण होऊन तुमच्याकडे येईल. जिझस ख्राईस्टने म्हणले आहे, ‘ज्यांच्याकडे आहे त्यांना आणखीन दिले जाईल आणि जे कफल्लक आहेत त्यांच्या कडून असलेले सुद्धा काढून घेतले जाईल.’ निसर्गाचा हाच नियम आहे. लहानसहान इंद्रिय सुखांच्या मागे धावू नका. हृदयात स्थानापन्न व्हा. आधी राज्याच्या सिंहासनावर बसा म्हणजे इतर सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे चालत येतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Sri Ravishankar Writes about Happiness is freedom from happiness