चेतना तरंग : त्याग करा आणि नंतर स्वीकारा 

श्री. श्री. रवीशंकर 
Tuesday, 22 September 2020

‘माझा मुलगा, माझा मुलगा’ असा सारखा विचार करत बसल्यास त्या मुलाच्या रूपानेच दु:ख तुमच्या वाट्याला येईल. श्रीरामचंद्रासारख्या मुलाला जन्म दिल्यानंतरही दशरथाच्या वाट्याला दु:खच आले. मग तुम्हाला सुख कुठून मिळणार?

या सृष्टीत जे काही अस्तित्वात आहे, मग ते लहान असो अथवा मोठे, त्यामध्ये ईश्वरी हुंकार आहे. चॉकलेटच्या बॉक्समध्ये सगळे चॉकलेट वेगवेगळ्या वेष्टनात बांधलेले असले, तरी ते सारखीच असतात. वेष्टने निरनिराळ्या रंगाची असली तरी सगळ्यांमध्ये एकच ईश्वरी तत्त्व सामावलेले असल्याची जाण महत्त्वाची आहे. ही जाणीव तुम्हाला झाल्यास तुम्ही त्यांच्यात भेदभाव करणार नाही. अशावेळी तुम्ही म्हणाल, ‘बाहेरचे वेष्टण लाल रंगाचे असले काय किंवा हिरव्या रंगाचे, त्याने काय फरक पडतो?’ 

या सृष्टीत जे जे अस्तित्वात आहे, त्या सर्वांत शिवाचे वास्तव्य आहे. प्रथम अर्पण करा आणि मग स्वीकारा. दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा धरू नका. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याचाच अर्थ, ईश्वरी अस्तित्व प्रत्येक गोष्टीत असले, तरी ती गोष्ट धरून ठेवल्याने तुमचा गोंधळ उडेल. तुमच्या वाट्याला दु:ख येईल. अशा वेळी काय करावे? सगळ्या गोष्टींचा प्रथम त्याग करावा. तुम्ही त्याग कशाचा करणार? ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या हक्काच्या आहेत, तुमच्या आहेत असे वाटते त्याचा त्याग करावा. ही गोष्ट ‘माझी आहे, माझी आहे,’ असे म्हणून मिठाई हातात धरून ठेवल्यास काय उपयोग. तुम्ही ती खात नाही तोपर्यंत हातात धरून ठेवलेल्या मिठाईचा तुम्हाला काय उपयोग? तुम्ही ती स्वत:ही खात नाही किंवा दुसऱ्यालाही देत नाही. कडकडून भूक लागल्यावर तुमच्या हातातून ती सुटत नाही, कारण त्या मिठाईवरची मालकी सोडायची नसते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथम तुम्ही अर्पण केलेत आणि मग स्वीकारले की कोणत्याही गोष्टीचे रूपांतर ‘प्रसादात’ होते. ईश्वराने दिलेल्या भेटवस्तूत होते. ईश्वराचा आशीर्वाद भेटवस्तूच्या रूपाने मिळाल्याबद्दल तुम्हाला आनंदच होईल. त्याउलट एखादी गोष्ट ‘माझ्याच मालकीची आहे, माझाच त्यावर हक्क आहे,’ असे म्हणून स्वतःच्या ताब्यात ठेवल्यास त्या वस्तूंपासून तुम्हाला कधी आनंद मिळणार नाही, उलट दु:खच तुमच्या वाट्याला येईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘माझा मुलगा, माझा मुलगा’ असा सारखा विचार करत बसल्यास त्या मुलाच्या रूपानेच दु:ख तुमच्या वाट्याला येईल. श्रीरामचंद्रासारख्या मुलाला जन्म दिल्यानंतरही दशरथाच्या वाट्याला दु:खच आले. मग तुम्हाला सुख कुठून मिळणार? श्रीकृष्णासारख्या मुलाला जन्म दिल्यावर वासुदेवाच्या वाट्याला सुख आले का? म्हणून ‘माझा मुलगा, माझा मुलगा,’ असे म्हणत मुलात जीव अडकवून दु:ख ओढवून घेण्यापेक्षा, ‘सर्वच गोष्टी ईश्वराच्या आहेत त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्व घडेल,’ असा विचार का करत नाही? असा विचार केल्यावर भविष्यात काहीही झाले, तरी त्याचे दु:ख तुम्हाला होणार नाही. तुमच्या जवळच्या सर्व गोष्टी ईश्वराला अर्पण करा, यालाच त्याग करणे म्हणतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri sri ravishankar writes article