
Yoga : कार्यालयीन योग
आपण आजपासून पुढील काही दिवस कार्यालयीन योग, म्हणजेच सध्याचे टर्म कॉर्पोरेट योग याबद्दल जाणून घेणार आहोत. सध्याचे आयुष्य अतिशय धावपळीचे, तणावाचे आहे. ते प्रसन्न, आनंदी करण्यासाठी योगसाधना, व्यायाम, प्राणायाम, ध्यान करणे खूप आवश्यक आहे. मात्र, यासाठीच काही जणांकडे वेळ नाही. घर व ऑफिस किंवा कामाचे ठिकाण हे खूप दूर असल्याने अनेक जणांना वेळच मिळत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या कार्यालयातच बसून काही व्यायाम, आसने करता येतील.
बराच वेळ मोटार चालवून किंवा एकाच जागी बसून पाठदुखी सुरू होते. लवचिकता कमी होते, तसेच व्यायाम-योगसाधनेच्या अभावामुळे पोट, चरबी वाढते. अपचनाचा त्रास सुरू होतो. तणावाची पातळीही वाढते. अशा अनेक समस्या डोके वर काढू लागतात. या सर्वांवर उपयोगी म्हणजे योगसाधना. आपल्याला सहजतेने काही आसनप्रकार करता येतात. त्याचा नित्य सराव ठेवल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते.
असे करावे आसन
ऑफिसमध्ये कोणत्याही वेळी तुम्ही २ ते ५ मिनिटे वेळ काढून हे स्ट्रेचस, आसने करू शकता.
या प्रकारामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल.
या आसनाचा प्रकार अगदी सोपा आहे.
खुर्चीवर ताठ बसावे.
दोन्ही तळपायाकडची बाजू जमिनीवर टेकलेली असावी.
गुडघे व टाच एका सरळ रेषेत येतील अशी स्थिती ठेवावी.
दोन्ही हात श्वास घेत वरच्या दिशेला ताणून घ्यावेत.
या स्थितीत १० ते १५ सेकंद तरी थांबावे.
श्वास संथ सुरू ठेवावा. त्यानंतर श्वास सोडत सावकाश हात खाली घ्यावेत.
अशी कृती किमान पाच वेळा करावी.
आसनाचे फायदे
आळस कमी होतो. पाठीचा कणा ताणला गेल्याने तो अधिक लवचिक व सशक्त होतो.
बराच वेळ बसल्याने किंवा पाठीला रग लागली असल्यास ती कमी होते.
खांद्यांचे जॉइंटस् मोकळे होतात.
हाताच्या स्नायूंना ताण बसल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. हाताला मुंग्या येण्याचे किंवा हात दुखण्याचे प्रमाण कमी होते.
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
पोश्चर सुधारण्यास उपयोग होतो.
पान, खांदे, पाठ यांवर आलेला अतिरिक्त ताण कमी होतो.
हा प्रकार सर्वांनीच करून पाहावा. यालाच आपण खुर्चीत बसूनचे ताडासन असेही म्हणू शकतो.