Mental Retardation
Mental Retardationesakal

Mental Health : ..तर बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकतं; यासाठी कशी काळजी घ्याल?

बाळाचा (Baby) जन्म झाल्यानंतर त्याची शारीरिक व बौद्धिक विकास झपाट्याने होऊ लागते.
Summary

पालकांनी आपले बाळ गतिमंद अथवा मतिमंद आहे हे स्वीकारणे गरजेचे असते. मतिमंदत्वावर काहीही औषधं नाही. ते एक प्रकारचे अपंगत्व आहे हे स्वीकारावे.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

मीनलची आई मला सांगत होती की, त्यांची मुलगी अभ्यासात मागे पडू लागली होती. मीनलची आई शिकवण्या घ्यायची आणि त्यांचे विद्यार्थी (Students) नेहमी चांगल्या मार्कांनी पास व्हायचे. मीनलचा छोटा भाऊ अभ्यासात हुशार होता व त्याला यंदा शिष्यवृत्तीही मिळाली होती. मीनल थोडीशी अबोल; पण प्रेमळ मुलगी आहे. तिला चित्र काढायला आणि रांगोळी काढायला आवडते. तिला थोडा वाचादोष आहे आणि त्यामुळे मुली तिला चिडवतात, खेळायला घेत नाहीत. तिला गणित, इंग्रजी जड जाते. मीनलच्या तपासणीअंती कळाले ती गतिमंद आहे. काय करायचं या बाळाचे...

Mental Retardation
Brain Hemorrhage Symptoms : मेंदूत रक्तस्राव होण्याची कोणती आहेत कारणे? पेशंटवर काय होतो आघात?

बाळाचा (Baby) जन्म झाल्यानंतर त्याची शारीरिक व बौद्धिक विकास झपाट्याने होऊ लागते. सामान्यता ज्या गतीने विकास होतो त्या गतीने जर मूल वाढत नसेल तर मुलामध्ये गतिमंदत्व किंवा मतिमंदत्व (Mental Retardation) असू शकते. सर्वसामान्य माणसाचा बुद्ध्यांक ९० ते ११० च्या दरम्यान असतो. ज्या मुलांचा बुद्ध्यांक ९० पेक्षा कमी; पण ७० पेक्षा जास्त आहे त्यांना गतिमंद म्हटले जाते. ज्या मुलांचा बुद्ध्यांक ५० पेक्षा जास्त; पण ७० पेक्षा कमी असतो त्यांना सौम्य मतिमंदत्व आहे, असे म्हटले जाते. ८५ टक्के मतिमंद मुलं या कक्षेत येतात. ३५ ते ५० बुद्ध्यांक मध्यम मतिमंदत्व व ३५ पेक्षा कमी बुद्ध्यांक म्हणजे तीव्र मतिमंदत्व.

मतिमंदत्वामध्ये चालणे, हातांचा वापर, स्वतःची काळजी घेणे, स्वच्छता, अंघोळ, बोलणे, समाजात मिसळणे या सर्व क्रियांना विलंब होतो; पण प्रयत्न केल्यास मूल हे सर्व कमी-अधिक प्रमाणात शिकू शकते. मतिमंदत्वाचे महत्त्चाचे कारण म्हणजे मेंदूमधील बिघाड. जैविक कारणांमध्ये जनुकीय जसे डाऊन सिंड्रोम, जैवरासायनिक बदल व रक्तातील दोष असू शकतात. जवळच्या नात्यातील लग्नात ही कारणे प्रकर्षाने आढळतात. मातेचे वय जास्त असल्यास गर्भामध्ये दोष उद्‌भवू शकतो.

तसेच वाढणाऱ्या गर्भाच्या मेंदूला आघात झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. जन्माआधी जर माता व्यसनी असेल, कुपोषित असेल, तिला अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाबसारखे आजार असल्यास गर्भाची वाढ बाधित होऊ शकते. अपुऱ्या वाढीच्या गर्भाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. प्रसूतीदरम्यान बाळाच्या मेंदूला आघात झाल्यास, श्वास घुसमटल्यास, जंतूसंसर्ग झाल्यास तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर ते दुर्लक्षित, कुपोषित राहिल्यास बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकते.

Mental Retardation
Endometriosis Symptoms : 'एंडोमेट्रिओसिस' हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो; कशी घ्याल काळजी?

मतिमंदत्वामध्ये भावनिक व वर्तणूक समस्या जास्त प्रमाणात आढळून येतात. अशा मुलांमध्ये अतिचंचलता, स्वमग्नता, भीती व नैराश्य असू शकते. त्यांच्यात आत्महिंसा, आकडी तसेच श्रवणदोष, वाचादोष जास्त प्रमाणात आढळून येतात. तीव्र मतिमंदत्वामध्ये मूल बऱ्याच गोष्टींसाठी पालकांवर निर्भर असते. बऱ्याचदा एका पालकाला त्याची काळजी घेण्यासाठी घरी थांबावे लागते ज्याचा आर्थिक बोजा कुटुंबाला सोसावा लागतो. अशा मुलांना शाळेत प्रवेश मिळणे कठीण जाते. पालकांना अशा मुलांमुळे अपराधी वाटू शकते. अशा मुलांना शाळेत व समाजात हिणवले जाऊ शकते व अशा तीव्र मतिमंदत्व असलेल्या मुलांचे जीवनमान इतरांपेक्षा कमी असते.

सौम्य मतिमंदत्व असणारे मूल मात्र हळूहळू आत्मनिर्भर बनत जाते, शाळेत जाऊ लागते. बऱ्याचदा शाळेत मागे असले तरी कमी-अधिक प्रमाणात काही कौशल्य शिकू लागते. शाळा संपल्यावर काही ना काही अकुशल काम शिकू लागते व स्वावलंबी बनू शकते. बऱ्याचदा सौम्य मतिमंदत्व असलेली मुले लग्न करून संसार करतात व नोकरीही टिकवतात. यामुळे कुटुंबावर त्यांचा आर्थिक बोजा कमी राहतो व त्यांचे जीवनमान सर्वसाधारण मुलांसारखे असते.

Mental Retardation
Arthritis Symptoms : सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठं नुकसान होईल!

मूल जर चालायला, बोलायला उशीर करत असेल तर पालकांनी वेळीच डॉक्टरांशी चर्चा करावी व योग्य तपासण्या करून घ्याव्यात तसेच शाळेतील अभ्यासात मूल मागे पडत असेल, इतरांसारखा त्याचा विकास होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परिवारात अजून कोणी गतिमंद, मतिमंद असेल तर गर्भधारणेआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रसूतीच्या आधी, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतर मातेची व बाळाची सुरक्षा खूप महत्वाची असते त्यामुळे उभयतांना जपावे. बाळ व्यवस्थित वाढत आहे ना याकडे लक्ष द्यावे. विकासामध्ये जर अडसर आला तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पालकांनी आपले बाळ गतिमंद अथवा मतिमंद आहे हे स्वीकारणे गरजेचे असते. मतिमंदत्वावर काहीही औषधं नाही. ते एक प्रकारचे अपंगत्व आहे हे स्वीकारावे. त्यावर कुठलेही औषध नाही त्यामुळे पालकांनी फसू नये. परिवाराने एकत्र येऊन, मेहनत घेऊन मुलाला हळूहळू आत्मनिर्भर करता येईल. पालकांनी सतत मुलाची इतर मुलांशी तुलना करू नये. आपल्या मूलाला जे जमत नाही त्यापेक्षा काय जमते ते बघावे व नियमित प्रोत्साहन द्यावे. मुलाला त्याच्या शारीरिक वयानुसार नव्हे तर मानसिक वयानुसार किंवा बुद्धीनुसार वागवावे. स्वमदत, संवाद करणे व शौचावर नियंत्रण शिकणे यावर भर द्यावा जेणेकरून त्याला सांभाळणे सोपे जाईल.

Mental Retardation
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

मुलाला शिकवताना कुठलीही क्रिया छोट्या छोट्या टप्प्याटप्प्याने शिकवावी. मुलांना शाळेत टाकण्यास प्राधान्य द्यावे. जर शक्य असल्यास दिव्यांग शाळेत घालावे. इतर मुलांमध्ये, नातेवाईकांमध्ये मिसळण्यास प्रोत्साहन द्यावे. भावनिक किंवा वर्तणूक समस्या आढळल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पालकांनी स्वतःला दोष देऊ नये. शांत मनाने व प्रेमाने अशा मुलांचे संगोपन केल्यास त्यांचा सांभाळ सोपा होत जातो. पौगंडावस्थेत अशा मतिमंद मुलांमध्ये तीव्र मानसिक आजार, आकडी किंवा लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात, हे जाणावे. मुलाला जमेल असे सोपे काम शिकवावे जेणेकरून ते व्यस्त व आनंदी राहील. या खडतर प्रवासात समाजानेही दिव्यांग मुलांना व पालकांना सहानुभूतीने वागवण्याची गरज आहे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com