जागतिक गर्भनिरोधक दिवस : अनैच्छिक गर्भधारणा अन् त्यातून होणाऱ्या गर्भपाताचं प्रमाण का वाढतंय?

unwanted pregnancy increases due to lack of knowledge of contraception
unwanted pregnancy increases due to lack of knowledge of contraception

नागपूर - आपल्या देशात सर्वाधिक तरुणांची संख्या आहे. यापैकी अनेकांना लैंगिक ज्ञान तसेच गर्भधारणेबाबत अत्यल्प माहिती असते किंवा माहिती नसते. या अज्ञानामुळे अनेकदा महिलांना अनैच्छिक गर्भधारणेचा त्रास सहन करावा लागतो. त्या जोडप्याला ते मुल नको असते. त्यामुळे गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. गर्भनिरोधकाबद्दलच्या अज्ञानामुळेच अशा गर्भधारणेचे प्रमाण वाढत चालल्याचे पाहायला मिळते. त्यासाठीच जागतिक गर्भनिरोधक दिवसानिमित्त लैंगिक आरोग्य आणि प्रजनन क्षमता याबाबत जनजागृती केली जाते.

जागतिक गर्भनिरोधक दिवस म्हणजे काय?
जागतिक गर्भनिरोधक दिवस दरवर्षी २६ सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवशी महिला आणि तिच्या जोडीदाराला प्रजनन क्षमतेबद्दल योग्य निर्णय घेता यावे. किंबहूना ते अधिक सक्षम करण्यासाठी जन्म नियंत्रण पद्धतींबद्दल जागरुकता वाढविणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. जोडप्याच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा होणार नाही, याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक स्तरावर हे अभियान राबविले जाते.

प्रत्येक गर्भधारण ही जोडप्यांना हवीहवीशी वाटावी तसेच त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलीही गर्भधारणा होऊ नये यासाठी २६ सप्टेंबर २००७ ला काही आंतरराष्ट्रीय कुटुंब नियोजन संस्थांनी जनजागृती करायला सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी जागतिक गर्भनिरोधक दिवस म्हणून साजरा केला जातो. यामध्ये १५ आंतरराष्ट्रीय एनजीओ, सरकारी संस्था, सायंटिफीक आणि मेडीकल सोसायटी यांचा समावेश आहे. 

देशात दरवर्षी ६० लाख गर्भपात -
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया व बायर स्किरिंग फार्मा या संस्थेच्या अभ्यासानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे ४.२ कोटी स्त्रिया नको असताना गर्भधारणा झाल्याने गर्भपात करतात. देशाच्या लोकसंख्येत २५ वर्षांहून कमी वयाच्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. यापैकी अनेक तरुणांना लैंगिक ज्ञान तसेच गर्भधारणेबद्दल अत्यल्प माहिती नसते. त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणेचे प्रमाण वाढत आहे. गर्भनिरोधक साधनांचा वापर न केल्यामुळे दरवर्षी ५.१ कोटी महिला अकाली गर्भधारणा करून घेतात. तसेच २.५ कोटी गर्भधारणा गर्भनिरोधक साधनांचा अयोग्य व अनियमित वापरामुळे होतात. देशात दरवर्षी ६० लाख गर्भपात केले जातात. त्यापैकी २० लाख गर्भपात हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले असतात; तर ४० लाख गर्भपात औषधे देऊन किंवा शस्त्रक्रिया करून करविले जातात.

 ...म्हणून डिसेंबरनंतर लोकसंख्यावाढीचा विस्फोट -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस देशात लॉकडाऊन होते. त्या काळात गर्भनिरोधकाचाही तुटवडा पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे डिसेंबरनंतर देशात पुन्हा एकदा लोकसंख्या वाढीचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात नको असलेल्या गर्भधारणेला प्रतिबंध करण्यासाठी २६ सप्टेंबर हा दिवस जगभर गर्भनिरोधक दिवस म्हणून पाळला जातो. 

देशात किती पुरुष नसबंदी करतात -
भारतासारख्या पुरुषप्रधान समाजात पुरुषांमध्ये गर्भनिरोधकांचा वापर कमी आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 90 टक्क्यांपेक्षा जास्त विवाहित जोडपे काँडम वापरत नाहीत. पुरुषांच्या नसबंदीचं प्रमाण खूपच कमी आहे आणि महिलांची नसबंदी ही एक लोकप्रिय गर्भनिरोधक पद्धत आहे. पण, जगभरात याविषयीची वृत्ती बदलत आहे, असा दावा संशोधक करतात. 

पुरुष गर्भनिरोधकाची गरज का निर्माण झाली? -
अमेरिकेत प्रथम गर्भनिरोधक गोळी उपलब्ध झाल्यानंतर आज जवळजवळ 60 वर्षांनंतर नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी महिला डझनपेक्षा जास्त गर्भनिरोधक पद्धतींवर अवलंबून आहेत. यामध्ये गोळ्या, इंजेक्शन, रिंग्ज, आणि स्पंज यांचा समावेश होतो. अनेक दशकांपासून स्त्रियांनी अनैच्छिक गर्भधारणा आणि त्यातून होणाऱ्या गर्भपाताचा त्रास सहन केला आहे. अशा गर्भधारणेमध्ये कधी-कधी प्रसूती धोकादायक असते. त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी गर्भधारणेचा उपाय म्हणून पुरुषांसाठी गर्भनिरोधकाची गरज निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

गर्भनिरोधकाचे फायदे -
गर्भनिरोधक वापरल्याने कुटुंबनियोजन योग्य पद्धतीने करता येते. तसेच अनेक जन्म नियंत्रण पद्धती माहिती असल्यास महिलांना जेव्हा मुलं हवं असेल तेव्हा गर्भधारणा करता येते. तसेच आपल्याला किती अपत्य हवी आहेत हे देखील त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ठरविता येते. तसेत दोन मुलांमध्ये योग्य तो वयाचा फरक ठेवण्यास हे गर्भनिरोधक मदत करतात. त्या काळात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्याच्या वाढीसाठी आर्थिक तरतुदी करण्यास पालकांना वेळ मिळतो.

  • तरुणी किंवा महिला गर्भधारणेसाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तयार नसेल तर गर्भनिरोधक वापरून त्या त्यांच्या सेक्शुअल लाईफचा आनंद घेऊ शकतात. 
  • जन्मदर नियंत्रणामुळे लोकसंख्या वाढ होत नाही. तसेच आपल्याला मुलं हवंय की नको, ही त्या जोडप्याची इच्छा असते. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार किती अपत्य हवी आहेत हे ठरविता येतं ते फक्त गर्भनिरोधक वापरूनच. लैंगिक संबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरल्या अनैच्छिक गर्भधारणा टाळता येते. तसेच कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षण बनण्यास मदत होते.

जागतिक गर्भनिरोधक दिवसानिमित्त अभियानामध्ये तुमचा सहभाग -
लैंगिक संबंध हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, आजही अनेक देशात लैंगिक संबंध किंवा लैंगिक आरोग्य याबाबत बोलणं जाणीवपूर्वक टाळलं जातंय. त्यामुळे महिला आणि जोडप्यांना लैंगिक आरोग्याबाबत माहिती देणे, जन्मदर नियंत्रण पर्यायाबाबत सांगणे हे जागतिक गर्भनिरोधक दिवसाचे उद्दिष्ट आहे. आजच्या दिवशी या अभियानामध्ये तुम्ही पुढीलप्रकारे सहभाग घेऊ शकता -

  • इतरांना माहिती देत जागरूक करणे. तुम्हाला किशोरवयीन मुलं, मुली असेल तर त्यांना लैंगिक आरोग्याबाबत माहिती देणे. तसेच जागतिक गर्भनिरोध दिवसाचे महत्व पटवून देणे.
  • तुम्ही बाळाला जन्म देण्यासाठी सक्षम असाल आणि तुमचे लैंगिक आयुष्य चांगले सुरू असेल तर तुम्हाला जन्मदर नियंत्रण पद्धतींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. 
  • शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन लैंगिक आरोग्य आणि जन्मदर नियंत्रण पद्धती समजावून सांगणे
  • आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत गर्भनिरोधकांबाबत चर्चा करणे

गर्भनिरोधकाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी -

  • अमेरिकेमध्ये १५ ते ४४ वर्ष वयोगटातील महिला जास्त प्रमाणात गर्भनिरोधक वापरतात.
  • जन्मदर नियंत्रित करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे.
  • गर्भनिरोधक ट्यूबचा वापर करणे ही देखील अमेरिकेतील महिलांमध्ये लोकप्रिय जन्मदर नियंत्रण पद्धत आहे.
  • गर्भनिरोधक पॅचेस किंवा रिंग हे गोळ्यांपेक्षा कधीही चांगले असते. पॅचेस किंवा रिंग हे आठवड्याला बदलवायचे असते, तर गोळ्या दररोज घ्याव्या लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com