esakal | योगा लाईफस्टाईल : पंचकोष आणि त्याचे स्वास्थ्यातील स्थान

बोलून बातमी शोधा

Yoga

योगा लाईफस्टाईल : पंचकोष आणि त्याचे स्वास्थ्यातील स्थान

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

आपण बाहेरील बाजूने घन स्थितीमध्ये दिसत असलो, तरी आपण एका ऊर्जेने बनलेले असून ती कायम वाहत असते. आपण ट्रिलियन्स अणू आणि रेणूंचे बनलेलो असून, ते मोठ्या वारंवारतेने धडधडत आहेत, कंप पावत आहेत. ते काही नॅनो सेकंदांत तयार होतात आणि नष्टही होतात. ते आपल्याला अमर आणि कायमस्वरूपी आहेत असे वाटते, ते तसे नाही. ते स्थिर आणि दृढ वाटतात, ते तसेही नाहीत.

‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर आहे ः ‘मी एका सूक्ष्म शरीरांचे मिश्रण असून, त्यातील प्रत्येकाला स्वतःचे ऊर्जाक्षेत्र आहे व ते विशिष्ट वारंवारतेने (फ्रिक्वेन्सी) कंप पावत असून, त्याची पातळी आणि घनताही वेगवेगळी आहे.’ थोडक्यात, मी अनेक बुडबुड्यांचा बनलेला एक मोठा फुगा आहे आणि तो प्रत्येक नॅनोसेकंदाला फुटत असतो. एखादे रूपक द्यायचे झाल्यास, आपण एखाद्या कांद्याप्रमाणे असून, त्यावरील सर्व पापुद्रे काढले जाऊन त्याच्या गाभ्यापर्यंत पोचण्याची आपण वाट पाहतो आहोत...

कोष म्हणजे काय?

कोष म्हणजे संस्कृतमध्ये शीथ. त्याचा उल्लेख तैत्तिरीय उपनिषदामध्ये आढळतो. त्यातील पाच कोषांचा उद्देश आपल्याला सूक्ष्मता प्राप्त करण्यासाठी मदत करणे, आपल्यातील हुशारी व जंगलीपणाची उत्तम जोडणी करणे हा आहे. आपल्या आत्म्याचे उच्चारण या पाच कोषांतूनच होते. त्यांना ‘शीथ’ असे संबोधले जाते, कारण ते आपल्या स्वत्वाला अनेक थरांच्या कोषांद्वारे झाकून ठेवतात. त्यातील बाहेरचा थर खूप जाडसर असतो, आतमध्ये जाताना हे थर अधिक सूक्ष्म बनत जातात. त्यामुळे योगीजन कायमच ‘स्वतःच्या आतमध्ये प्रवेश करणे’ या वाक्याचा उपयोग करताना दिसतात. याचा अर्थ तुमच्या जाणिवांचा प्रवास बाहेरील आवरणापासून आतील आवरणाच्या दिशेने करणे असा आहे व त्याचाच अर्थ विविध कोषांमधून प्रवास करणे असा होतो.

पाच कोष आणि त्यांचे कार्य

आयुष्याचा समतोल बिघडतो, आपल्या शरीरात बेबनाव वाटू लागतो आणि त्यातून आपण निराश आणि अशांत होतो, आपल्याला आजारी असल्यासारखे आणि अस्वस्थ वाटू लागते. यावेळी आपण आपला कोणता कोष फुटला आहे, याचा शोध घेणे गरजेचे असते. त्याचवेळी आपण विविध उपाययोजना करून इतर सर्व कोषांशी त्याचा सुसंवाद घडवून आणू शकतो. यातील अन्नमय कोष हा शारीरिक आहे, तर त्यानंतरचे तीन प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष सूक्ष्म आहेत. सर्वांत शेवटचा कोष असलेला ‘आनंदमय कोष’ कार्यकारण भाव असलेला आहे. आपल्यापैकी बहुतेक जण शारीरिक कोषावरच अडकून बसतात व त्यांना आतमध्ये आणखी काही थर आहेत किंवा हे पाचही कोष एकमेकांशी संलग्न आहेत हेच ज्ञात नसते. जेव्हा या कोषांमध्ये एकवाक्यता नसते, तेव्हा ते सर्व एकाच दिशेने प्रवास करण्याऐवजी एकमेकांना वेगवेगळ्या दिशांना खेचत असतात. त्यामुळेच तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिकदृष्ट्या शब्दशः तुटून गेल्यासारखे वाटते. यातील एखादा जरी कोष इतरांच्या बरोबर नसल्यास सर्वकाही हलते, एकवाक्यता गमावते. पुढील भागापासून आपण या प्रत्येक कोषाची विस्ताराने माहिती घेऊ.