हेल्थ वेल्थ : फळे खावीत की ज्यूस प्यावा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fruit Juice
हेल्थ वेल्थ : फळे खावीत की ज्यूस प्यावा?

हेल्थ वेल्थ : फळे खावीत की ज्यूस प्यावा?

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

तुम्हाला तुमचा दिवस एखादे फळ खाऊन किंवा फळाचा रस पिऊन सुरू करणे आवडते का? अनेकांना फळे चावून खाण्यापेक्षा त्यांचा ज्यूस प्यायला आवडते. त्यांना असे वाटते, की फळांचा ज्यूस केल्याने त्यातील पौष्टिक मूल्ये कमी होत नाहीत. त्याचबरोबर त्यांना असेही वाटते, की उन्हाळ्याच्या दिवसांत फळे खाण्यापेक्षा त्यांचा गारेगार रस पिणे अधिक उत्साहवर्धक ठरते. फळांचा रस पिण्याचे आरोग्यासाठी खरेच काही फायदे आहेत काय?

फायबर : शरीरासाठी आवश्‍यक

जाहिरातींचा मारा करून फळांचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे मनावर बिंबवले जाते. त्यामुळे अनेक जण नाश्‍त्यात किंवा कोणत्याही जेवणाच्या वेळी फळांचा ज्यूस घेणे अधिक पौष्टिक बनवण्याचा मार्ग असल्याचे मानतात. मात्र, विज्ञानाने अगदी स्पष्ट सांगितले आहे, की फळांचा ज्यूस पिणे हे फळ चावून खाण्याच्या तुलनेत फारसे आरोग्यवर्धक नाही. आहारातील फायबर (तंतूमय पदार्थ) या पौष्टिक घटकाचे सहज विघटन होत नाही व त्याचे पचनही शरीराकडून सावकाशपणे होते. फायबरचे विपुल प्रमाण असलेल्या पदार्थाचे पचन होण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे ग्लुकोज आणि ऊर्जेचा शरीराला सलग आणि संथपणे पुरवठा होत राहतो. आणि कोणत्याही अन्नापदार्थामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यास तुमच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा संबंध प्री-डायबेटिक व ‘टाइप-२’ डायबेटिस आदींशी आहे. तुम्ही फळाचा ज्यूस न करता ते चावून खाण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुम्ही त्या फळात उपलब्ध असलेले फायबर पोटात घेता. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखर अचानक वाढत नाही, तर फळाचा ज्यूस पिण्याच्या तुलनेत अधिक संथपणे वाढत जाते. त्याबरोबर फळाचा ज्यूस केल्यावर त्यातील महत्त्वाची प्रथिने आणि खनिजेही बाहेर फेकली जातात.

फायबर, मधुमेह आणि वजन

  • तुम्ही फळांचे ज्यूस पिता, तेव्हा त्यात फायबरचे प्रमाण शून्य असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते आणि कमीही होते.

  • या प्रक्रियेमुळे तुम्हाला पुन्हा भूक लागल्यासारखे वाटते व तुम्हाला अधिक अन्नाची गरज भासते. ते घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी पुन्हा वेगाने वाढते.

  • यातून तुम्ही एका दुष्टचक्रात अडकता आणि त्याचा शेवटी तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते.

  • लक्षात घ्या ः कोणत्याही मधुमेही व्यक्तीने शरीरातील साखरेची पातळी कायम ठेवण्यासाठी फळांचे ज्यूस घेणे टाळायला हवे. अनेक अभ्यासांतून हे स्पष्ट झाले आहे, की फळ चावून खाल्ल्यास ‘टाइप-२’चा मधुमेह होण्याचा धोका खूप कमी होतो, तर फळांचा ज्यूस घेतल्यास हा धोका वाढतो.

  • सातत्याने फळांचा ज्यूस घेतल्यास तुमचे वजन वाढण्याचाही धोका संभवतो. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, मात्र अनेक जण फळांचा ज्यूस करताना त्यात आणखी साखर टाकणे पसंत करतात. त्यामुळे ते साखरेचे प्रचंड प्रमाण असलेले पेय बनते. यातून ‘टाइप-२’ डायबेटिसचा धोका वाढतो व वजन वाढत जाऊन ओबिसिटीचा त्रास होऊ शकतो.

  • तुम्हाला फळ चावून खाणे आवडत नसल्यास, तुम्ही तुमच्या आवडत्या फळाचा गर काढून त्याची स्मुदी बनवू शकता. ब्लेंडिंगच्या प्रक्रियेत फळांतील फायबर कायम राहाते. फायबरचे अनेक फायदे असून, ते तुमच्या आतड्यातील कोलेस्टरोलच्या रेणूंशी संयोग करून त्याला तुमच्या शरीरातून विष्ठेवाटे बाहेर फेकतात. त्यामुळे कोलेस्टरोलच्या पातळी घटते

फळांचा ज्यूस कधी घ्यावा?

  • एखाद्या व्यक्तीला अतिसाराचा त्रास असल्यास डॉक्टर तुम्हाला फायबरचे प्रमाण कमी असलेल्या आहाराचा सल्ला देतात, अशा वेळी फळांचा ज्यूस घेणे हा उत्तम पर्याय ठरतो.

  • मात्र, सामान्य परिस्थितीत तुमच्या पुढे फळ आणि फळाचा ज्यूस असे दोन पर्याय असल्यास तुम्ही फळाचा पर्याय निवडा.

टॅग्स :juicedrinkFruitEat Fruit