हेल्थ वेल्थ : जेवणानंतर चालण्याचे फायदे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Walking
हेल्थ वेल्थ : जेवणानंतर चालण्याचे फायदे!

हेल्थ वेल्थ : जेवणानंतर चालण्याचे फायदे!

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

चालणे हे सर्वसाधारणपणे सर्व वयोगटांसाठी असंख्य फायदे देणारे आहे, पण जेवल्यानंतर चालण्याचा शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता असते. काहीजण जेवल्यानंतर चालणे ही योग्य असल्याचे मानतात आणि ती सवय बनवण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण जेवणानंतर फक्त बसून किंवा पडून राहण्यात आनंद मानतात. जेवल्यानंतर चालण्याच्या फायद्यांमागे एक मनोरंजक विज्ञान आहे.

फायदे काय?

  • जेवल्यानंतर अन्न पोटातून लहान आतड्यापर्यंत जाते आणि ह्यासाठी लागणारा वेळ हा गॅस्ट्रिक एमटीयिंग टाइम म्हणून ओळखला जातो. चालण्याने हा वेळ कमी करण्यास मदत होते आणि ते पचनास साहाय्य करते. शिवाय, रात्रीच्या जेवणानंतर चालणे बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यास किंवा टाळण्यास मदत करू शकते आणि झोपेचा दर्जा वाढवते.

  • जेवण झाल्यावर चालणे आतड्याची हालचाल सुधारून पोट साफ ठेवण्यास हातभार लावते. हे शक्य आहे कारण शरीराची हालचाल होत असताना ते पोट आणि आतडे सक्रिय करते आणि त्यामुळे अन्न पोटातून लहान आतड्यात सहजपणे जाते.

  • तुमच्या लहान आतड्यात अन्न जितक्या वेगाने जाते, तितके तुमचे शरीर आम्लपित्त, बद्धकोष्ठता इत्यादीसारख्या पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहते. परंतु हेही लक्षात ठेवा, गॅस्ट्रो किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्या असलेल्या लोकांनी ह्या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी दररोज १०,००० पावले चालण्याचे लक्ष ठेवावे.

  • जेवणानंतर चालण्याची सवय तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास हातभार लावते. तुम्ही जेवण पूर्ण केल्यावर, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि ती ६० मिनिटांनमध्ये सगळ्यात जास्त असते. परिणामी, हे ग्लुकोज रक्तप्रवाहातून बाजूला नेऊन साठवून ठेवण्यासाठी शरीराद्वारे रक्तात इन्शुलिन सोडले जाते. तुम्ही जेवल्यानंतर चालता तेव्हा, तुम्ही रक्तप्रवाहात सोडला जाणाऱ्या ग्लुकोजचा वापर होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे ते साठून राहण्याची शक्यता कमी होते आणि म्हणूनच प्री-डायबेटिक किंवा ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी जेवण झाल्यावर चालायला जाणे ही एक चांगली सवय आहे.

जेवण झाल्यावर चालण्यासाठी काही टिप्स

  • फिरायला जाण्यापूर्वी जेवणानंतर ३० मिनिटांचा ब्रेक घ्या. असे केल्याने तुम्हाला पोटदुखी किंवा पोट फुगण्याची शक्यता कमी होईल. तुम्हाला जेवणानंतर लगेच फिरायला जाण्याची सवय असेल आणि तुम्हाला त्रास होत नसल्यास तुम्ही ते चालू ठेवू शकता. तुम्ही जर वजन कमी करण्यावर लक्ष देत असल्यास ३०-६० मिनिटे वाट पाहून नंतर चालायला जाण्यापेक्षा जेवणानंतर लगेच चालायला जाण्याचा उपाय हा जास्त प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

  • तथापि, चालताना, गती सौम्य ते मध्यम ठेवणे योग्य आहे, त्याचे कारण असे की स्पीड वॉक केल्याने शरीराचे खालील स्नायू कार्यरत होतात ज्यामुळे ह्या स्नायूंना जास्त रक्तपुरवठा होतो आणि पोटाला होणार रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळेच तुमच्या गॅस्ट्रो ट्रॅक्टमध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि त्याने अपचन होऊ शकते.