World Asthma Day 2022: ओमिक्रॉननंतर वाढतोय दम्याचा त्रास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Asthma Day 2022 health update Asthma is rise after Omicron pune

World Asthma Day 2022: ओमिक्रॉननंतर वाढतोय दम्याचा त्रास!

पुणे - कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये पुण्यात चार पटींनी वाढ झाल्याचे निरीक्षण छातीविकार तज्ज्ञांनी सोमवारी नोंदविले. उन्हाळ्यामध्ये दम्याचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असते. मात्र, या वर्षी उन्हाळ्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते, असेही त्यांनी सांगितले. जागतिक अस्थमा (दमा) दिन मंगळवारी (ता. ३) आहे. त्या निमित्ताने शहरातील छातीविकार तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यातून ही माहिती पुढे आली. पूना हॉस्पिटलचे छातीविकार तज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर म्हणाले, ‘‘कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे आली होती. (World Asthma Day 2022)

या लाटेनंतर आता अस्थमाच्या रुग्णांचे प्रमाण तीन ते चार पटींनी वाढल्याचे दिसत आहे. अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा काळ नाही. हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांचा त्रास वाढतो. पण, या वेळी हिवाळ्यात कोरोनाच्या दुसरी लाट येऊन गेली होती. पण, या वर्षी उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थमाचे रुग्ण तपासले.’’ कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अस्थमाच्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी होते. पण, तिसऱ्या लाटेनंतर ते आमूलाग्र वाढले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रूबी हॉल क्लिनिकमधील डॉ. महावीर मोदी म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अस्थमाच्या रुग्णांवर विषाणूंचा फारसा परिणाम झाला नाही. तिसऱ्या लाटेत म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांना त्यावेळी काहीच त्रास झाला नाही. घरी राहूनच उपचार पूर्ण केले. पण, आता दोन महिन्यांनंतर सुरू झालेला खोकला थांबत नाही, अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत.’’ इम्पल्स ऑक्सिमेटरी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अस्थमाच्या रुग्णांचे अचूक निदान केले जाते. त्याचा खूप चांगला उपयोग होत आहे. स्पायरोमेटरी आणि इम्पल्स असे दोन्ही केल्यास सेंसीटीव्हिटी चांगली राहाते. त्यातून रुग्णांवर लवकर उपचार करणे शक्य होते.

सध्या आढळणाऱ्यांपैकी ९० टक्के रुग्णांना पूर्वी अस्थमाचा त्रास होता. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोणताच त्रास झाला नाही. आता तो परत सुरू झाल्याचे रुग्ण सांगतात.

- डॉ. महावीर मोदी, छातीविकारतज्ज्ञ, रूबी हॉल क्लिनिक

कोरोना संसर्गाची क्षमता कमी होत आहे. पण, त्याच वेळी त्याच्या संसर्गामुळे होणारे ॲलर्जीक त्रास वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागृत राहीले पाहिजे.

- डॉ. नितीन अभ्यंकर, छातीविकारतज्ज्ञ, पूना हॉस्पिटल

का वाढला अस्थमा?

१. कोरोनाचा संसर्ग श्‍वसनमार्गातून होतो, त्यामुळे त्याचा थेट परिणाम श्‍वसनसंस्थेवर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. ओमिक्रॉनच्या आधी आलेले कोरोनाचे अल्फा आणि डेल्टा हे व्हेरियंट थेट फुप्फुसावर हल्ला चढवायचे. ओमिक्रॉन हा नाक, घसा आणि श्‍वसननलिका या भागापर्यंतच सीमित राहिला. त्यातून या अवयवांना सूज आली. त्यामुळे अस्थमाचा त्रास वाढायला सुरुवात झाली.

२. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील विषाणूंच्या संसर्गाची तीव्रता तिसऱ्या लाटेत कमी झाली. त्यामुळे श्‍वसन संस्थेच्या वरच्या भागापूरता मर्यादित राहील.

काय काळजी घ्यावी?

  • गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अवश्य कराच

  • रुग्णालय, दवाखान्यांत मास्कशिवाय प्रवेश करू नका

  • कोरोना प्रतिबंधक लसीकरण करा

Web Title: World Asthma Day 2022 Health Update Asthma Is Rise After Omicron Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top