esakal | World Kidney Day : तुमच्या किडनीची अशी घ्या काळजी, नाही तर होऊ शकतो हा त्रास...
sakal

बोलून बातमी शोधा

world kidney day Take care of kidneys strengthen body

शरीरातील हजारो विषारी घटक बाहेर काढण्यासह रक्तदाब नियंत्रण, जीवनसत्व ‘ड’ची निर्मिती, लाल रक्तपेशी वाढवण्याचे कामही करतात. जीवनसत्व ‘ड’मुळे हाडांना मजबुती मिळते. मूत्रपिंडे निकामी होण्यास मधुमेह अन्‌ उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत.

World Kidney Day : तुमच्या किडनीची अशी घ्या काळजी, नाही तर होऊ शकतो हा त्रास...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मूत्रपिंडांचे आरोग्य सांभाळा, शरीर सुदृढ बनवा, असे सांगत गुरूवार (ता. १२) जागतिक मूत्रपिंड दिवस साजरा होत आहे. जो मूत्रपिंडे जपतो, त्याचे आरोग्य चांगले राहते. मूत्रपिंडे शरीरातील पाण्याचा आणि क्षारांचा समतोल राखण्याचे काम करतात.

मधुमेह, उच्च रक्तदाबामुळे ७० टक्के विकार; दुर्लक्ष करणे घातकच

शरीरातील हजारो विषारी घटक बाहेर काढण्यासह रक्तदाब नियंत्रण, जीवनसत्व ‘ड’ची निर्मिती, लाल रक्तपेशी वाढवण्याचे कामही करतात. जीवनसत्व ‘ड’मुळे हाडांना मजबुती मिळते. मूत्रपिंडे निकामी होण्यास मधुमेह अन्‌ उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. ७० टक्के मूत्रपिंडाचे विकार हे मधुमेह, उच्च रक्तदाबामुळे होतात. शिवाय संसर्ग, काही अनुवंशिक आजार, सातत्याने वेदनाशामक गोळ्यांचे सेवनांमुळे मूत्रपिंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. पर्यायी औषधे म्हणून अनेक जण भस्म आदीचे सेवन करतात; मात्र त्यातून पारा वगैरे विषारी धातू शरीरात शिरतात. किडनी निकामी होण्याचे कारण म्हणजे, कौटुंबिक इतिहास किंवा अनुवंशिकता; पण नियंत्रण करून आपल्या किडनीला होणारी इजा टाळू शकतो. ते म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिलठ्ठपणा, धूम्रपान, वेदनाशामक औषधे, मूतखडे, मूत्रमार्गाचे जंतुसंसर्ग. प्राथमिक अवस्थेत किडनी निकामी होण्याची लक्षणे कदाचित दिसत नाहीत. 

वाचा - व्हॉट्‌सॲपवरील त्या मेसेजमुळे मोडले तिचे लग्न...

मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, नियमितपणे वेदनाशामक औषधांचे सेवन करणारे, वारंवार मूतखडा होणारे आणि वारंवार मूत्रमार्गाचे जंतुसंसर्ग होणाऱ्या लोकांनी तपासून घ्यावे. प्राथमिक स्वरूपात किडनी रोग ओळखण्यासाठी रक्त आणि लघवीचे परिक्षण नियमितपणे करावे. मूत्रपिंडाकडे दुर्लक्ष करु नका. मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवा. मूत्रपिंड विकार असणाऱ्या व्यक्तिच्या पायावर, चेहऱ्यावर सूज येते. दम लागणे, भूक न लागणे, अशक्तपणा येणे, लघवीच्या तक्रारी, रक्तातील  हिमोग्लोबिनचे प्रमाणे कमी होणे. किडनी निकामी झालेल्या रुग्णासाठी दोनच पर्याय आहेत. ते म्हणजे, आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करणे अथवा किडनी रोपण करणे. किडनी रोपण हा उत्तम पर्याय असून त्यामुळे रुग्ण पूर्वीप्रमाणे जीवन जगू शकतो. किडनी रोपण करण्यासाठी निरोगी व्यक्ती, ज्याचा रक्तगट जुळणाऱ्या नातेवाईकाची गरज असते. किडनीदान करणाऱ्या व्यक्तीला उर्वरित आयुष्यामध्ये कुठलाही आरोग्याचा धोका संभवत नाही.  डायलेसिससाठी भरपूर पैसा खर्च होऊन कुटुंबावर आर्थिक दबाव येतो. किडनी प्रत्यारोपणामुळे रुग्ण आपले उर्वरित आयुष्य सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जगू शकतो.|

खबरदारीचे उपाय

  •  मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची नियमित तपासणी करा. 
  •  सिरम क्रिएटीनीन तपासणीमुळे किडनीची कार्यक्षमता तपासता येते.
  •  योग्य दिनचर्या, व्यायाम, आहारामुळे सर्व विकारांस प्रतिबंध करता येतो
  •  शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.
  •  वेदनाशामक गोळ्या तीन-चार दिवसांपेक्षा अधिक काळ घेऊ नका.
  •  प्रथिनयुक्त आहाराचे सेवन योग्य तितकेच घ्या.
  •  साखर, मीठ, मैदा आहारात कमीत कमी ठेवा.
     
loading image
go to top