- डॉ. मालविका तांबेगेल्या काही वर्षात परदेशातून येणारी भारतीय किंवा अभारतीय मुळाची सत्तरीच्या सुमारास असलेली मंडळी स्मृतिनाश हा त्रास वरचेवर सांगायला लागली आहे. स्मृतिनाशाची सुरुवात ही छोट्या छोट्या गोष्टींपासून होते..उदाहरणार्थ, आपल्या रोजच्या भेटणाऱ्या लोकांची नावे लक्षात न राहणं, काही मिनिटांपूर्वी केलेली काही गोष्ट असली तरी ती डोक्यातून पूर्णपणे निघून जाणे, कोणी साधी सोपी गोष्ट करायला सांगितलेली असली की त्यातली काही माहिती विसरून जाणे आणि नंतर पुढे संपूर्णपणे विस्मृती होणे; अर्थात स्वतःचे नाव लक्षात न राहणं, स्वतःच्या लोकांना ओळखू न शकणे, स्वतःची ओळख संपूर्णपणे विसरून जाणे इथपर्यंत आपल्याला ही लक्षणे दिसतात..बाहेरच्या देशांमध्ये तर अशा विस्मृती झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकरिता वेगळे केंद्रसुद्धा सध्या सुरू झालेले आहेत. स्मृती किंवा बुद्धी हे आयुर्वेदाप्रमाणे मज्जाधातू संबंधित असतात. आधुनिक शास्त्राप्रमाणेसुद्धा स्मृती ही मेंदूतल्या कॉर्टेक्स भागात साठवली जाते. आरोग्याची काळजी घ्यायची म्हटली की सगळ्यांना जास्त लक्षात येते हृदयाची काळजी; पण त्यापेक्षाही सर्वांत महत्त्वाचा भाग हा मेंदू असून तो संपूर्ण शरीराच्या सगळ्या प्रक्रियांची काळजी घेत असतो..त्याचा विचार मात्र कोणीही करत नाही. मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे हळू हळू मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते आणि त्यातून वेगवेगळे रोग आपल्याला उत्पन्न होताना दिसतात. स्मृतिनाश हा साधारणपणे अल्झायमर्स, पार्किन्सन्स डिमेंशिया मोटर न्यूरॉन डिसीज इत्यादी सारख्या रोगांमध्ये खूप प्रामुख्याने लक्षण स्वरूपात दिसतो.आयुर्वेदामध्ये कुठल्याही रोगाची मुळात सुरुवात होऊ नये याचा प्रयत्न आधी करायला सांगितलेला आहे आणि त्यातल्या त्यात मेंदू अर्थात मज्जाधातू यांच्यात होणारे कुठलेही रोग सुधारणं अवघड असतं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे खरं तर प्रत्येकाने सुरुवातीपासूनच मेंदूची योग्य ती काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आयुर्वेदामध्ये तर लहानपणापासूनच मेंदूची योग्य काळजी कशी सुरू करावी, याबद्दलसुद्धा मार्गदर्शन मिळतं..जन्म झाल्या झाल्या तान्ह्या बाळाला आईच्या दुधाच्या आधी सुवर्णप्राशन संस्कार करायला सांगितलेलं आहे. सुवर्ण हा स्मृती, बुद्धी याकरिता अगदी उत्तम रसायन आहे. जन्माच्या पहिल्या दिवसापासून लहान मुलांना संतुलन बालामृत सारखं सुवर्णप्राशन रसायन देणं अत्यंत उत्तम ठरतं. तसेच घरातल्या प्रत्येक सदस्याने न चुकता संतुलन अमृत शर्करा घालून मेंदूला पोषक असे पंचामृत करून खाणे उत्तम.पंचामृत करताना एक चमचा अमृत शर्करा, एक चमचा दही, दोन चमचे तूप, एक चमचा मध आणि साधारण पाच ते सहा चमचे दूध हे मिश्रण सकाळी नाश्त्यात घेतलेले उत्तम. अमृत शर्करामध्ये असलेले सोने आणि केशर हे तर मेंदूला पोषक असतातच; पण त्याच बरोबरीने आयुर्वेदाच्या मान्यतेनुसार तूप, मध व साखर हीसुद्धा मेंदूला पोषक असते..आहार - रसायनसध्याच्या काळात आपण पाहिलं तर यातल्या बहुतांशी गोष्टी आपल्या आरोग्याकरिता चांगल्या नाहीत असं सांगून त्यांना कालबाह्य केलेलं आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला सगळीकडे मज्जाधातू संबंधित विकार जास्त प्रमाणात आढळत असावेत. मज्जाधातूचे कार्य व्यवस्थित व्हावे, त्याच्याकरिता वातदोषाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते.त्यामुळे आहारामध्ये सात्विक ताजे गरम व रसरशीत आहार ठेवावे. फार कोरडे किंवा न पोषक असलेले आहार घेणे हे मदत न करता अहितकारक ठरू शकेल. सध्या शरीराला ‘झीरो फिगर’मधे ठेवण्याकरिता बरेचसे टोकाचे डायट केले जातात. ज्याच्यामध्ये सॅलेड इत्यादींसारखे जेवढे कोरडे अन्न पोटात जाईल तेवढं बारीक राहायला मदत मिळेल, असा विचार असतो..हा कदाचित मज्जा धातूचा ऱ्हास व्हायला कारणीभूत असावा. तूप, दूध, लोणी, बदाम, अक्रोड हे मज्जातंतूकरिता पोषक ठरू शकतील. त्याचबरोबरीने ब्राह्मी, अश्वगंधा, शंखपुष्पी, जटामांसी, कमळ, वेखंड, वचा, हळद, कमळ इत्यादींसारखे, वातशामक व मज्जाधातू, पोषक वनस्पतींचासुद्धा वापर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नक्की केला पाहिजे.आयुर्वेदामध्ये या सगळ्या वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप किंवा तेल नक्की वापरात असावे, असे सांगितलेले आहे. उदाहरणार्थ, रोज सकाळी संतुलन ब्रह्मलीन घृत आयुर्वेदिकरीत्या संस्कारित तूप, एक चमचा सकाळी अनशापोटी घेतले तर त्याचा फायदा होऊ शकतो..वातशमनरात्री झोपताना संतुलन ब्रह्मलीन तेलासारखे तेल टाळूवर लावल्याससुद्धा फायदा मिळू शकेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यामध्ये सिद्ध तेल किंवा संतुलन नस्यसनसारखे आयुर्वेदिकरीत्या सिद्ध केलेलं तूप घालून नस्य करणेसुद्धा उत्तम ठरू शकेल.कुठल्याही व्यक्तीला जर का जाणवत असलं की त्याची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे, तर त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला तर घेणं आवश्यक आहेच, पण त्याच बरोबरीने आयुर्वेदोक्त शास्त्रोक्त पंचकर्मसुद्धा करवून घेण्याचा फायदा होताना दिसतो..उदाहरणार्थ शिरोधारा, नस्य, बस्ती, शिरोधारा, बस्ती असे उपचार जर स्मृती वर्धक वनस्पतींनी सिद्ध घृत किंवा तेलाने केले तर त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो. डोक्याला नियमित तेल लावणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं; पण सध्याच्या काळात कोणीही डोक्याला तेल लावायला तयार होत नाही.एवढेच नव्हे तर पूर्वीच्या काळात लहान बाळाला डोक्यावर पिचू अर्थात कुठल्यातरी स्नेहामधे कापसाचा बोळा बुडवून टाळूवर ठेवण्याची पद्धत होती. ती सुद्धा सध्याच्या काळामध्ये संपूर्णपणे थांबवलेली दिसते. याच्यामुळे बऱ्याचदा लहान मूल व्यवस्थित झोपत नाही. चिडचिड खूप करतात. स्मृतिनाशाचा त्रास दिसायला लागल्यावर मोठ्या व्यक्तींमध्येसुद्धा पिचू ठेवण्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो..पुरेशी झोपमेंदूची कार्यक्षमता नीट राहावी, याकरिता वेळेवर, व्यवस्थित व पुरेशी झोप होणंसुद्धा आवश्यक असतं. आठवडाभर काम केल्यावर वीकेंडला जसा आपण स्वतःच आरामाचा विचार करतो, तसंच त्या मेंदूलासुद्धा आराम देणं अत्यंत गरजेचं असतं.वीकेंडला रिलैक्सेशनकरिता बऱ्याचदा रात्रीची जागरणं किंवा मित्रांबरोबर मिळून मद्यपान व तसेच चुकीचे आहार घेण्याची पद्धत सध्या जास्त प्रमाणात दिसते. मद्यपान हे मेंदूच्या सेल्सकरिता अत्यंत चुकीचं असतं आणि आत्ता बरीचशी संशोधने आहेत की जे याचे दुष्परिणाम मेंदूच्या एकूण कार्यक्षमतेवर ती फार खोलपर्यंत होतात असं दर्शवतात..प्राणायाम, ध्यान, योग, संगीत...मेंदूला सतत ऑक्सिजन अर्थात प्राणशक्तीचा पुरवठा होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. नियमितपणे दीर्घ श्वसन, प्राणायाम, कपालभाती इत्यादींसारख्या श्वसनक्रिया करण्याचासुद्धा फायदा होत असतो. तसेच योगासने करणं, चालायला जाणे यानेसुद्धा मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित राहायला मदत मिळते. नियमितपणे ध्यानधारणा केल्यानेसुद्धा मेंदूला शांत व्हायला मदत मिळते.तसेच संगीताचा आणि विशेष करून स्वास्थ्य संगीताचा उपयोग मेंदूची कार्यक्षमता वाढवायला होऊ शकतो, असं प्रयोगातूनसुद्धा सिद्ध झालेलं आहे. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की, रात्री झोपताना योगनिद्रा ऐकणं, दिवसा स्पिरिट, हार्मनी एकवी याच बरोबरीने स्तोत्र मंत्र पठण, एखाद कोडं सोडवणं, स्मृतीशी निगडित असलेले काही खेळ खेळणं हे सुद्धा मेंदूच्या कार्यक्षमतेकरिता उत्तम असतं..म्हणूनच आपल्या घराघरांमध्ये पूर्वापारपासून पद्धत आहे की घरातल्या वडीलधारी व्यक्तींनी लहानपणी मुलांना दिवेलागणीच्या वेळेला तसेच सकाळी पूजेच्या वेळेला एकत्र बसून स्तोत्र मंत्र इत्यादीचा पाठ करायचा. याने लहान मुलांच्या बुद्धीवर तर चांगला फायदा होतोच, पण त्याच बरोबरीने मोठ्या व्यक्तींचीसुद्धा मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित राहायला मदत मिळू शकते.सध्याच्या काळामध्ये बऱ्याचदा थायरॉईड ग्रंथीचे व्यवस्थित काम न होणं, घराण्यात मधुमेह असणं, विटामिन बी १२ आणि विटामिन डी ३ इत्यादीसारख्या कुठल्या तरी महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सची कमतरता असणं. शरीरामध्ये गरजेच्या असलेल्या फॅटीअसिडची कमतरता असणं तसेच आधुनिक समाजामध्ये एकलकोंडेपणा वाढल्यामुळे नैराश्याचा त्राससुद्धा वाढताना दिसतोय..या मधल्या एक किंवा अनेक कारणांमुळेसुद्धा स्मृतिनाश किंवा मज्जाधातू संबंधित विकार जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. काही कारण असल्यास त्याच्यावरसुद्धा व्यवस्थित उपचार करणं आवश्यक ठरतं.एकूणच काय तर रोग होऊ नये, याकरिता प्रयत्न करणं कधीही उत्तम असतं, पण रोग झालाच तर त्याची लक्षणांची तीव्रता आटोक्यात राहावी, त्रास फार प्रमाणात वाढू नये व तसंच जे आयुष्य आहे ते चांगल्या व उत्तम पद्धतीने जगता यावे यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. हेही प्रत्येकाने त्यांच्या स्मृतीत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.