पौगंडावस्थेतील अस्वस्थता आणि नैराश्य

प्रत्येकाला कधीतरी एकटं राहावंसं वाटतं. कोणी आपल्याशी बोलू नये, आपण कोणाशी बोलू नये, शांत राहावं, स्वमग्न राहावं असं वाटतं. असं राहताना शांत, स्वस्थ वाटत असल्यास ती स्वस्थ निरोगी अवस्था मानता येईल; परंतु अस्वस्थपणामुळे, कोणत्या तरी दडपणामुळे,
anxiety and depression in adolescence youth health affect
anxiety and depression in adolescence youth health affectSakal

- डॉ. विद्याधर बापट

प्रत्येकाला कधीतरी एकटं राहावंसं वाटतं. कोणी आपल्याशी बोलू नये, आपण कोणाशी बोलू नये, शांत राहावं, स्वमग्न राहावं असं वाटतं. असं राहताना शांत, स्वस्थ वाटत असल्यास ती स्वस्थ निरोगी अवस्था मानता येईल; परंतु अस्वस्थपणामुळे, कोणत्या तरी दडपणामुळे,

नैराश्यामुळे सतत एकटं राहावंसं वाटत असेल आणि ती अवस्था आठवडेच्या आठवडे तशीच राहत असेल, झोपेवर, खाण्यापिण्यावर विपरीत परिणाम झाला असेल, तर मात्र ती व्यक्ती कदाचित अस्वस्थतेच्या आजाराची किंवा नैराश्याच्या आजाराची शिकार असू शकते.

आजकाल तरुण मुलामुलींमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप वाढलंय. उमलणारी व्यक्तिमत्त्वं अचानक कोमेजून जातात. गेल्या काही वर्षांत त्यातूनच तरुणांच्या आत्महत्यांचं किंवा तसा प्रयत्न करण्याचं प्रमाण खूप वाढलंय.

यामागे तीव्र नैराश्याचा आजार हे प्रमुख कारण असू शकतं. हे आजार जितक्या लवकर लक्षात येतील, तेवढ्या परिणामकारकरीत्या त्यावर उपचार होऊ शकतात. यासाठी आजाराची लक्षणं समजून घेणं व वेळेवर तज्ज्ञांची मदत घेणं ही पालक, शिक्षक दोघांचीही जबाबदारी आहे.

पौगंडावस्थेत व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडत असतात, उत्साह खळाळून वाहत असतो; पण तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडत असतात, मनात घोंघावत असतात. उदाहरणार्थ, मी कोण आहे? इतरांपेक्षा माझ्यात काही कमी आहे का?

या सगळ्या जगरहाटीत माझं काय स्थान आहे? स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय व इतर लैंगिक प्रश्न. अशा परिस्थितीत नुसताच मूड अपसेट आहे, की अस्वस्थतेचा, नैराश्याचा आजार आहे यातील फरक फक्त तज्ज्ञ व्यक्तीच ओळखू शकते. बरं, ही मुलं निराश किंवा दु:खी दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे नैराश्याच्या आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणाही दिसू शकतो.

आजारातील लक्षणं

अस्वस्थपणा व चिडचिड, अपराधीपणाची; तसंच निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव किंवा पॅशन नसणं. एकाग्रतेचा अभाव. अतिहळवं होणं; तसंच लहानसहान गोष्टींवरून अश्रूपात/रडणं. विलक्षण कंटाळा, शारीरिक हालचाल मंदावणं, काही करूच नये असं वाटणं. लहान सहान गोष्टीवरून आक्रमक होणं.

जेवण्याच्या, झोपण्याच्या सवयींमध्ये बदल. भूक कमी होणं, अचानक वजन कमी होणं, निद्रानाश, झोप कमी होणं किंवा जास्त झोपणं. घरापासून लांब राहण्याची प्रवृत्ती. अति टीव्ही बघणं/अति कॉंप्युटर गेम्स खेळणं.

टीका अजिबात सहन न होणं व सतत दुखावलं जाणं. एकटं एकटं राहणं; सार्वजनिक/कौटुंबिक समारंभ टाळणं. शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही दोष न आढळूनही डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी. स्वतःला इजा करून घेण्याचे किंवा आत्महत्येचे विचार (हे लक्षण अतिशय गंभीर आहे. तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा). व्यसनांच्या आहारी जाणं.

वरील लक्षणं किती काळ व किती तीव्रतेनं जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रांनी जाणीवपूर्वक पाहायला हवं. पौगंडावस्था हा सर्वार्थानं स्थित्यंतरांचा कालावधी असतो, त्यामुळे काही वेळा ही लक्षणं नॉर्मलही असू शकतात, ज्याला ‘growing pains’ म्हणतात. मात्र, ती तशी आहेत, की ती आजाराचा भाग आहेत हे तज्ज्ञच ठरवू शकतात. बऱ्याचदा अतिउत्साही वागणं किंवा दुराग्रही बंडखोर वृत्ती ही आजाराची लक्षणं असू शकतात.

या वयातील  नैराश्याचे परिणाम

  • शाळेतील/कॉलेजमधील  प्रश्न : नैराश्यामुळे एकाग्रता कमी होते; तसंच energy level  कमी होते. अनुपस्थिती वाढायला  लागते . मार्कांमध्ये  घसरण होते. एकूणच पूर्वीच्या  हुशार असणाऱ्या  मुलाची  गुणवत्ता  घसरते. 

  • घरातून  पळून  जाणं : घरातून पळून जातात  किंवा तशी  भाषा  सुरू होते.

  • दुबळी आत्मप्रतिमा : अपयशाची, फोल पणा, अपराधाची  भावना   निर्माण होते. 

  • खाण्याच्या  सवयी   : अति खाणं, कमी खाणं, गरज नसताना सतत खात राहणं. 

  • इंटरनेटचं व्यसन : गरज नसताना व्यसन लागल्यासारखा इंटरनेटचा अतिवापर. सतत एकटं बसून इंटरनेट वापरणं, व्हिडिओ गेम्स  खेळत राहणं.

  • शारीरिक इजा : स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करणं.

  • बेभान वागणं : बऱ्याचदा अशी मुलं बेभानपणे वाहन चालवणं, सामाजिक नीतीनियम झुगारणं इत्यादी करताना आढळतात.

  • हिंसात्मक वर्तणूक  : नैराश्याच्या अवस्थेत स्वतःला त्रास देणं किंवा आत्मपीडन करून घेण्याची प्रवृत्ती असते, त्यावेळी शाळा वा महाविद्यालयात हिंसात्मक वर्तणूक घडते.

  • आत्महत्येचे विचार : नैराश्यापोटी आत्महत्येचे विचार करणं, तसं बोलून दाखवणं किंवा प्रत्यक्ष प्रयत्न करणं घडू शकतं.

हे नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. सगळं आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न राहणं चांगलं. सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमानं पाल्याशी बोलावं. त्याच्याविषयीची काळजी, प्रेम त्याला जाणवू द्या. विश्वासाचं वातावरण तयार करा. आवश्यक वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. पाल्याच्या वर्तनातले  बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे, हे तज्ज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळे असले, तरी पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीनं ते दुरुस्त व्हायला हवेत.

या आजाराला साह्यभूत ठरणारे घटक आणि उपाययोजना आपण पुढच्या भागात बघू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com