आराधना सूर्याची

सूर्य आहे म्हणूनच जग आहे. पहाटे जाग आली तरी अजून उजाडले नाही या कारणास्तव माणसे झोपून राहतात. पण सूर्य उगवलाच नाही तर काय माणसे उठणारच नाहीत, झोपूनच राहतील?
Sun
Sun

सूर्य आहे म्हणूनच जग आहे. पहाटे जाग आली तरी अजून उजाडले नाही या कारणास्तव माणसे झोपून राहतात. पण सूर्य उगवलाच नाही तर काय माणसे उठणारच नाहीत, झोपूनच राहतील? कदाचित पहिल्या दिवशी थोडा जास्त वेळ झोपून राहतील पण हळूहळू खरोखर असे होऊ शकेल की सर्व जग अंधारात बुडून कायमचे झोपी जाईल.

सूर्याचा प्रकाश असल्यामुळे आपल्याला समोरचे जग केवळ दिसते, पण त्यावर मनाने प्रकाश टाकल्यामुळे ते समजते, पण शेवटी प्रकाश लागतोच आणि सर्व प्रकाशाचे स्रोत असतात सूर्यदेव. शेकोटीजवळ बसल्यावर थोड्या वेळाने आपण आपोआप वळून शेकोटीकडे पाठ करून बसतो कारण शेकोटीमुळे शरीर तापते ते फार वेळ सहन होत नाही.

तसेच अधिक सूर्यप्रकाश मिळण्याच्या हेतूने पृथ्वी जर एकाच ठिकाणी थांबली तर सर्वच जळून जाईल. त्यामुळे एकदा पोटाकडून, एकदा पाठीकडून अशा तऱ्हेने प्रकाश, उब मिळण्याच्या हेतूने पृथ्वी सूर्याभोवती घिरट्या घालत राहते, प्रदक्षिणा करत राहते. जीवनाचा विकास सर्व बाजूंनी व्हावा हा सुद्धा हेतू यात असतो. दिवस-रात्रीचं चक्र तयार होते ते यातूनच!

सूर्य शक्ती देतो व नंतर परत खेचून घेतो. उष्णतेने पाण्याची वाफ करून आकाशात ओढतो व पुन्हा ते पाणी पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पाठवतो. असे हे संपूर्ण जीवनाचे चक्रसुद्धा सूर्यच चालवतो. जमिनीत रोवलेले बीज बघता बघता अंकुरते, झाडात रूपांतरित झाले की पुन्हा त्यावर फळे येतात, नंतर ती फळे परत पृथ्वीच्या पोटात जाऊन, पुन्हा वृक्ष तयार होतात व फळा फुलांनी डवरतात.

हे सगळे करण्यात निसर्गामध्ये दिसून येणारा उत्साह सूर्यामुळेच मिळतो. म्हणून सूर्याला ‘मित्र’ म्हणतात. सूर्याच्या आत उफाळून येणारी सुप्त शक्ती असल्याने सूर्याला ‘हिरण्यगर्भ’ म्हणतात. घेणे-देणे या गुणामुळे त्याला ‘आदित्य’ही म्हणतात. सूर्यच सर्व जगाची निर्मिती करून आपल्याला सर्व जगाचे ज्ञान देतो, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून त्यावर ज्ञानरूपी प्रकाश टाकतो म्हणून त्याला ‘भास्कर’ म्हणतात.

अशा तऱ्हेने सूर्याची सर्व शक्ती आपल्याला नाना तऱ्हेने आणि अनेक ठिकाणी दिसते. फुलाला सुगंध देणारा सूर्यच असतो, पण त्याच सुंदर फुलाचे हजारो वर्षांनंतर वेगवेगळ्या शक्तीत म्हणजे एखाद्या धातूत किंवा खनिजात किंवा रत्नात रूपांतर करण्याचे काम सूर्यच करतो.

सूर्य हा सदासदासाठी तरुण आहे व हे तारुण्य काळात मोजलेले नाही, त्याच्या अस्तित्वाला किती वर्षे झाली यावर त्याचे तारुण्य अवलंबून नाही तर तो सतत तरुणच असतो. म्हणून तर ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत्’ म्हणजे आरोग्याचे दान सूर्याकडून मागायचे असते. तरुणांनी सूर्याकडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

सूर्याच्या सर्व कला व सूर्याचे सर्व स्वभाव ज्याच्यात असतील, तो तरुण. सूर्याला आपण मित्र म्हणतो खरे पण त्याच्याशी जवळीक करून त्याच्याकडून आपण जर काही शिकलो, त्याच्यापासून शक्ती मिळवली तरच आपले तारुण्य, आपले आरोग्य टिकून राहील.

म्हणून सूर्याची शक्ती मिळवायची असेल तर सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर उठून आसन, प्राणायाम, कपालभाती, उपासना, ध्यान वगैरे करतात; उषेची चाहूल लागल्यावर स्नान वगैरे आटोपून सूर्याच्या स्वागतासाठी हातात अर्घ्य घेऊन मंडळी उभी असतात. सूर्यनमस्कार हा तर जवळ जवळ सर्व आसनांचा राजा. सूर्यप्रकाशामुळे शरीराला आवश्‍यक असणारी अनेक द्रव्ये मिळतात.

मेंदूच्या मध्यभागी शरीरातील सूर्याचे स्थान असते व त्या सूर्याला जर शक्ती मिळाली तरच शरीराचे सर्व व्यवहार व्यवस्थित चालतात. म्हणून भारतीय तत्त्वज्ञानाने गायत्री देवतेची संकल्पना सांगितली, गायत्री देवता संपूर्ण मेंदूमय-ब्रह्ममय आहे. तिला चार डोकी असून तिच्या सोनेरी केसातून विविधरंगी प्रकाशकिरणे बाहेर फाकत असतात.

असा हा मेंदूचा कॉर्टेक्स हा भाग, ज्यात या तऱ्हेचे प्रकाशाचे जाळे असते, ज्याद्वारे सूर्यापर्यंत माहिती पोचवली जाते व तेथून पुढे ती माहिती मेरुदंडामार्फत सर्व शरीरभर पसरून शरीरावर अंकुश ठेवण्याचे किंवा शरीराकडून काम करून घेण्याचे कार्य होत असते. असे हे ज्ञान जी सूर्याला देते त्या गायत्रीची उपासना सूर्याबरोबरच केली जाते.

तेव्हा स्वर्गातील सूर्याचे स्थान मेंदूच्या मध्यभागी असते. पृथ्वीवरचे सूर्याचे स्थान नाभीच्या ठिकाणी असणाऱ्या मणिपूर चक्रात असते. शरीराची उष्णता, यकृत, प्लीहा, अग्न्याशय हे सर्व या मणिपूर चक्राच्या आधिपत्याखाली येतात. शरीराचे पित्त की ज्यामुळे मनुष्य शौर्य व धडाडी दाखवतो, रागावतो वा शृंगारासाठी प्रवृत्त होतो ते पित्त या ठिकाणच्या सूर्यामार्फत शरीरावर सत्ता गाजवते.

सूर्याला ग्रहण लागले किंवा सूर्य अंधारात गेला तर पचनसंस्था नीट चालत नाही, म्हणूनच आयुर्वेदामध्ये सकाळी लवकर उठून लवकर झोपायचे, सूर्यास्तानंतर वा रात्री अंधार असताना फार जेवायचे नाही, असे नियम बनवले गेले. बाहेर सूर्य नसताना शरीरातलाही सूर्य कमी काम करतो, म्हणून असे नियम केलेले असतात.

सर्व प्रकारच्या श्र्वसनक्रिया, प्राणायाम, कपालभाती किंवा ॐकारजप करताना नाभीस्थानाला मध्य धरून, आकुंचित होणाऱ्या पोटापासून ऊर्जेला वर सरकवून मेंदूकडे ऊर्जा पाठविण्यासाठी योजना केलेली असते.

‘ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजानसंन्निविष्टः । केयूरवान्‌ मकरकुण्डलवान्‌ किरीटी हारी हिरण्मय वपुर्धृतशंखचक्रः ॥’

या श्र्लोकात केलेले सूर्याचे वर्णन अगदी समर्पक आहे. हा सूर्य केवळ आकाशात दिसणारा वा डोळ्यांसमोर अंधारी आणणारा तेजस्वी सूर्य नव्हे तर सात रंगांच्या सात शक्ती व सात घोड्यांच्या रथात स्वार होऊन संपूर्ण विश्र्वाला ज्ञान, शक्ती व समृद्धी प्रदान करणारा तो सूर्य असे अत्यंत समर्पक वर्णन यात केलेले आहे. रोज या श्र्लोकाच्या पठण-श्रवणामुळे शरीरातील सूर्याचे संदीपन होऊ शकते, सृजनशक्ती, उत्साह वाढण्यास मदत मिळू शकते.

पौष महिन्यात सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस मकरसंक्रांत नावाने ओळखला जातो. तसे पाहिले तर सूर्य पूर्ण वर्षात कधी ना कधी उर्वरित अकरा राशींमधे प्रवेश करतच असतो पण मकर राशीलाच इतके महत्त्व का?

तर मकर राशीत असताना सूर्याचा प्रभाव कमी होत असतो म्हणून आणि त्यामुळे काळे कपडे घालणे असो, तिळाचे सेवन करणे असो, पतंग उडवण्याच्या निमित्ताने आकाश ध्यान करणे असो, सूर्यशक्तीला आकर्षित करण्याचाच प्रयत्न केलेला दिसतो. सूर्याकडून मिळणाऱ्या उबेत येणारी कमतरता नात्यातील उबेत दुरावा उत्पन्न करू नये यासाठी अगोदरच गोड बोलण्याची भारतीय संस्कृती किती अचूक आहे !

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com