आयुर्वेदिक जीवनशैली

जीवनशैलीमधील बदलांमुळे जुनाट आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे.
Ayurvedic lifestyle
Ayurvedic lifestylesakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

जीवनशैलीमधील बदलांमुळे जुनाट आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे आणि त्यामुळेच आपण आयुर्वेदिक दिनचर्येमधील काही सोपे, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरलेले आणि आधुनिक जीवनशैलीत सामावून घेता येतील असे प्रभावी उपाय आणि त्यांचे फायदे समजून घेऊ!

सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी किंवा सोबत उठावे. त्याचवेळी शरीरातील वात वाढतो आणि मल-मूत्र विसर्जित होण्यास मदत होते. शरीरातून सर्व waste products बाहेर पडणे खूप महत्त्वाचे आहे. हे नाही झाल्यास आपले पोट हे सर्व जुनाट आजार (रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादी) यांचे माहेरघर होऊ शकते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर मलासनामध्ये बसून कोमट पाणी प्यावे. चहा, कॉफी इत्यादी गोष्टींवर अवलंबून राहणे हितकारक नाही.

ऑइल पुलिंग आणि त्याचे फायदे अलीकडे फार प्रसिद्ध झाले. याला आयुर्वेदामध्ये गंडूष आणि कवल म्हटले आहे. नारळाचे किंवा तिळाचे १०-१५ मिलिलिटर तेल (१ चमचा) तोंडात घेऊन १० ते २० मिनिटे त्याने चूळ भरावी. तोंडातील सर्व भाग दात, हिरड्या, जीभ इत्यादी सर्व ठिकाणी तेलाचा स्पर्श होऊ द्यावा. दात पांढरे शुभ्र होतात, हिरडीची सूज कमी होते, दाताला कीड लागत नाही, कान, नाक, घसा आणि मस्तकाच्या भागातील दुखणे व त्रास कमी होतात, तोंडाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते.

दंतधावन

तुरट, कडू, तिखट चवीच्या कडुनिंब, आंबा, बाभूळ, जाई चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण, दालचिनी, लवंग, वेलची पूड मधात मिसळून दातांवर व जिभेवर घासणे. यामुळे तोंडातील जीवजंतूंचा नाश होतोच, दुखणे कमी होते, दात कमी प्रमाणात किडतात इत्यादी.

अर्धशक्त्या व्यायाम

व्यायामाचे फायदे सर्वांनाच माहिती; पण व्यायाम कधी थांबवावा आणि व्यायामाचेही दुष्परिणाम असतात हे सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये सांगितले गेले, त्यामध्ये अर्धशक्त्या व्यायाम अशी संकल्पना मांडली आहे. म्हणजे आपल्या शरीराच्या अर्ध्या क्षमतेचा व्यायाम करावा म्हणजेच आपल्याला दम लागला, तोंडाने श्वास घ्यावासा वाटला आणि घाम यायला लागेपर्यंतच व्यायाम करावा, याहून अधिक केला तर शरीरावर अतिरिक्त ताण येतो व नुकसानही होते. हे दररोज केल्यानंतर शारीरिक क्षमता वाढत जाते. पहिल्याच दिवसापासून भरपूर व्यायाम करायचा असा आपला गैरसमज असतो; पण हे शरीराला हानिकारक आहे.

अभ्यंग स्नान

दररोज स्नानापूर्वी खोबरेल तेल किंवा तीळ तेल कोमट करून त्याने शरीराचे मालिश करून घ्यावे. हे दररोज करणे कठीण असते, त्यामुळे किमान डोके, तळवे आणि कान या तीन ठिकाणचे मालिश फायद्याचे आहे. हे केल्याने शरीराची झीज भरून निघते, शरीर तरुण अवस्थेत राहण्यास मदत होते. त्वचा, नेत्र यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरातील वात आणि दाह कमी होतो, मानसिक तणाव कमी होऊन शांत आणि गाढ झोप लागते.

रात्रीचे भोजन सूर्यास्ताच्या आधी करावे. सूर्यास्त झाल्यावर निसर्गातील अग्नी मंदावतो, त्याच प्रकारे आपल्या शरीरातलाही जठराग्नी मंदावतो आणि पचनक्रिया व्यवस्थित पार पडत नाही. झोपण्याच्या आधी किमान दोन तास जेवण झालेले असावे.

साडेनऊ-दहाच्या सुमारास झोपावे, झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असे कोणतेही यंत्र हाताळू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com