पाठदुखी - कंबरदुखी

काही चांगले काम केले की पाठ थोपटायची पद्धत असते, तसेच आत्मियतेची, मित्रत्वाची थापही पाठीवरच असते.
Back Pain
Back Painsakal

काही चांगले काम केले की पाठ थोपटायची पद्धत असते, तसेच आत्मियतेची, मित्रत्वाची थापही पाठीवरच असते. हात, पाय, तोंड वगैरे अवयव काम करतात, पण केलेल्या कामाची शाबासकी मात्र मिळते पाठीला. असे का असावे? याचे साधे, सोपे कारण असे आहे की शरीरात घडणाऱ्या सर्व घटना, शरीराने केलेल्या सर्व हालचाली, इंद्रिये करतात, ते सर्व काम मुख्यतः पाठीलाच करावे लागते.

पाठीवरच्या थापेमुळे पाठीतील ताणाला व दुखण्याला बरे वाटते. पाठ म्हणजे मुख्यतः मेरुदंड. शरीरात अनेक अंतरेंद्रिये व बहिरेंद्रिये काम करत असतात, परंतु पाठीच्या आत असलेल्या मज्जारज्जूचे संरक्षण करण्यासाठी जेवढी काळजी घेतलेली दिसते, त्याभोवती जेवढे मजबूत कवच दिलेले दिसते तेवढे संरक्षण शरीरातील कुठल्याही अवयवाला दिलेले दिसत नाही.

मज्जारज्जूचे संरक्षण करणाऱ्या मेरुदंडाची रचना खूप गुंतागुंतीची असते. शरीर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागे, पुढे कुठेही वाकवावे लागते, त्यामुळे मेरुदंडाची विशेष रचना केलेली दिसते. संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरुवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे या दृष्टीने पुढील उपचार करता येतात.

  • मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल, उदा. संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल लावता येते.

  • नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते.

  • रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही, आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्‍यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते.

  • आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे - किमान ४-५ चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे, हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते.

  • मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे - खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

  • मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, ॐकार गुंजन यासारखे उपाय करता येतात.

  • पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज ३० मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्यांची, मणक्यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो. याखेरीज ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

  • मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे याप्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्या सुद्धा करता येतात.

  • प्राणायाम, दीर्घश्‍वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गूंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्‍यक असते. प्राणशक्तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यासारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान १०-१५ मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल. खरे तर या उपायांनी पाठदुखी, कंबरदुखी उद्‌भवणारच नाही, मात्र पाठ दुखायला लागली तर त्यावर वातशमनाच्या दृष्टीने पाठीचा विशेष मसाज, शेक, बस्ती यांसारखे उपचार करता येतात.

यातील मसाजमध्ये मसाजच्या तंत्राएवढेच मसाजचे तेल उत्तम असावे लागते. उत्तम वीर्याच्या, शक्तीने पूर्ण अशा बला, अश्‍वगंधा वगैरे वातशामक व मणक्यांना व नसांना पुनर्जीवित करू शकणाऱ्या वनस्पतींबरोबर अनेक तास अग्निसंस्कार करून सिद्ध केलेल्या संतुलन कुंडलिनी तेलासारखे तेलच या कामी आवश्‍यक असते.

अशा तेलाने फक्त वेदनाशमनच होत नाही तर आतील झीज भरून यायला मदत होते, वाताचे शमन होते, मणके व डिस्क लवचिक राहण्यास मदत मिळते. अशा तेलाचा मसाज (उदा. कुंडलिनी मसाज) प्रशिक्षित मसाजिस्टकडून मिळणे हा पाठदुखीवरचा उत्कृष्ट उपचार असतो, मात्र असे तेल नियमित पाठीवर जिरवण्यानेही खूप चांगला उपयोग होताना दिसतो.

स्नेहनाबरोबर ‘स्वेदन’ हा वातावरील दुसरा प्रभावी उपचार होय. पाठीला तेल लावून नंतर शेकल्यानेही कंबर दुखायची कमी होते. हा शेक एरंड किंवा निर्गुडीच्या पानांनी करता येतो किंवा वातशामक द्रव्यांच्या वाफेने घेता येतो किंवा वातशामक द्रव्ये शिजवून, तेलासह परतून त्याची पुरचुंडी बांधून त्या पुरचुंडीने मसाज व शेक देता येतो तसेच ‘स्पाईन पोटली’ हा उपचारही करता येतो.

बस्ती फक्त पोट साफ होण्यासाठी असते हा एक गैरसमज आहे. आयुर्वेदिक पद्धतीने दिलेली सिद्ध तेलाची बस्ती कंबरेमधील वाताचे संतुलन करते, मणक्यांना उचित स्निग्धता, लवचिकता प्रदान करते आणि कंबरदुखी खऱ्या अर्थाने बरी होण्यास मोलाची मदत करते. इथेही तेल कच्चे असून चालत नाही तर ते दशमूळ, एरंडमूळ सारख्या वातशामक औषधांनी संस्कारित केलेले असणे आवश्‍यक असते.

याशिवाय पाठदुखीसाठी वातशामक, मणक्यांची ताकद वाढवणारी, नसांचे पुनर्जीवन करणारी औषधे देता येतात, योगराजगुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, गोक्षुरादी चूर्ण, दूध साखरेसह संतुलन प्रशांत चूर्ण, शतावरी घृत वगैरे औषधांनी उत्तम फायदा होताना दिसतो.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com