Diabetes Causes India: पाश्चिमात्य देशांमधील तज्ज्ञांनी तेथील मधुमेहींवर केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आशियातील विशेषत: भारतातील मधुमेह रुग्णांसाठी लागू केले होते. पण, बरेचदा हे निष्कर्ष चुकीचे ठरत गेले. याच पार्श्वभूमीवर भारतातील मधुमेहींसाठी चेन्नईत असलेले जागतिक आरोग्य संघटन केंद्राच्या वतीने प्रख्यात मधुमेह वैज्ञानिक डॉ. ए. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील मधुमेहाची कारणे आणि उपाय यावर सखोल संशोधन करण्यात आले. यात असे दिसून आले आहे की, आपल्या देशात मधुमेहाचे सुमारे 3.50 कोटी रुग्ण आहेत. यातही भीषण वास्तव असे आहे की, किमान 13.3 कोटी रुग्ण मधुमेहाचे संशयित असून, त्यांची वैद्यकीय चाचणी अद्याप झालेली नाही.