Childhood Asthma | तुमच्या मुलांना दमा आहे हे कसं ओळखाल ? काय काळजी घ्याल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Childhood Asthma

Childhood Asthma : तुमच्या मुलांना दमा आहे हे कसं ओळखाल ? काय काळजी घ्याल ?

मुंबई : हिवाळ्यातील कोरडी हवा श्वसनात अडथळा निर्माण करते. दम्याच्या रुग्णांना श्‍वसनमार्गातील सूज ही फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात अडथळा निर्माण करते. कोरड्या हवेमुळे हा त्रास आणखी बळावतो.

या वातावरणामुळे हिवाळ्याच्या दिवसांत दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. श्‍वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्‍वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्‍वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छवास प्रक्रियेत अडचणी येतात.

अशा रुग्णांनी काय काळजी घ्यावी हे सांगत आहेत मदरहूड रुग्णालयाचे कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारेख. हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Vaginal Health : योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल ?

लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढले असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धाप देखील लागते. त्या मुलांच्या श्वसननलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात.

वयाबरोबर श्वासनलिकांचा आकार वाढला की त्यांचा दम लागण्याचा त्रास कमी होतो. व्हायरल इन्फेक्शन सोडून इतरवेळी ही मुलं बरी असतात आणि त्यांना दम लागत नाही. या आजाराला बालदमा असं म्हणतात.

मुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सतत शिट्टीसारखा आवाज येत असल्यास त्याला बाल दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. दमा असल्याचे निदान करण्याकरिता तपासण्या करण्याची तशी गरज नसते; परंतु काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स- रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणी केली जाते.

ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. श्‍वसननलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम फुप्फुसे करतात.

मात्र दमा या आजारात श्‍वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुप्फुसापर्यंत पोचण्यास आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो.

श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छवास करण्यास अडथळा निर्माण होतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. 

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात प्रदूषण पसरते आणि हे कण अॅलर्जीचे काम करतात. त्यामुळे हिवाळ्यात दम्याचा त्रास अधिक वाढतो.

हेही वाचा: Women Health : प्रसूतीपश्चात नैराश्याचे वेळीच निदान न केल्यास होतात गंभीर परिणाम

दम्याची लक्षणे

* दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
* श्वास घेताना घशात घरघर आवाज येतो.
* छातीत जडपणा जाणवणे.
* खोकल्यावर स्निग्ध कफ.
* शारीरिक परिश्रम केल्यानंतर दम लागणे.
* परफ्यूम, सुगंधित तेल, पावडर इत्यादींची ऍलर्जी.

दमेकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

हिवाळ्याच्या दिवसात घरच्या घरी व्यायाम करा. यामध्ये इनडोअर जिम, वर्कआउट कोर्स आणि चालणे, योगा यांचा समावेश होतो.

बाहेर पडताना स्कार्फचा वापर करा. त्यामुळे श्वसन संक्रमण टाळणे शक्य होईल तसेच थंड वाऱ्यापासून संरक्षण होईल. आहारात अधिकतः द्रव पदार्थांचे सेवन करा. आहारात गरम सुप, फळांचा रस यांचा समावेश करा.

घरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा. वेळोवेळी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. वैद्यकीय सल्ल्याने इनहेलर्सचा वापर करणे योग्य राहील. शरीर शक्य तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :child health