शरीरशास्त्र : प्रतिबंधक आरोग्य तपासणीचे फायदे व तोटे

लोकांच्या मनात बऱ्याचदा शंका असते, की आपण दरवर्षी आपल्या आरोग्याची तपासणी करावी की नाही? याबाबतीत काही लोकांचे मतभेद असू शकतात.
Health Cheaking
Health Cheakingsakal

- डॉ. अजय कोठारी, डॉ. सिंपल कोठारी

लोकांच्या मनात बऱ्याचदा शंका असते, की आपण दरवर्षी आपल्या आरोग्याची तपासणी करावी की नाही? याबाबतीत काही लोकांचे मतभेद असू शकतात. उगाचच काही दोष आढळल्यास डॉक्टर अजून तपासण्या सांगतील. औषध लिहून देणार व कायमची घ्यावी लागू शकतात. त्यापेक्षा नकोच करायला तपासणी. आपल्याला काही त्रास नाही तर मग कशाला करावी?

खरे म्हणजे प्रतिबंधक आरोग्य तपासणीमुळे आपल्याला बरेच फायदे होतात.

1) रोगाचे निदान लवकर होते. वेळेवर उपचार घेतल्यास त्याला लवकर आटोक्यात ठेवता येतो. उदा. मधुमेह, रक्तदाब, हाडांची झीज (ऑस्टिओपेनिया-ऑस्टीओपोरोसिस), थायरॉईड, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आदी.

2) आरोग्यात सुधारणा जाणवतात. काही लोकांना आपले आरोग्य उत्तम आहे, असे वाटते. परंतु रक्त व लघवी तपासणी केल्यावर उलट प्रश्न विचारल्यावर त्यांना काही लक्षणे असल्याचे जाणवते. तेव्हा आपणास कळून चुकते की आपल्या आरोग्यात काहीतरी बिघाड आहे व त्यावर उपाययोजना केली पाहिजे.

3) आर्थिक दृष्टिकोनातूनही हे परवडण्यासारखे आहे. कारण आरोग्याची समस्या जलद ओळखतात. ज्यामुळे नंतर खर्चाची आवश्‍यकता कमी होते. उदा. एखाद्याला रक्तदाबाचे निदान झाले व त्या व्यक्तीने वेळेवर औषधे घेतली तर रक्तदाबाने होणारे इतर अवयवांवरील नुकसान रोखण्यास मदत होते. याउलट रक्तदाबांवर काहीही उपाययोजना किंवा नियमित तपासण्या केल्या नाही तर त्याचा इतर अवयवांवर हळूहळू परिणाम होतो व कधीकधी तातडीने दवाखान्यात दाखल व्हावे लागते व औषधे देऊनसुद्धा रक्तदाब खाली येत नाही.

4) मानसिकदृष्ट्या लोकांना तपासण्या केल्यानंतर एक समाधान मिळते. प्रतिबंधात्मक तपासण्या म्हणजे एक प्रकारचा तुमच्या शरीराचा व कार्य करणाऱ्या अवयवांचा तपशील कळतो.

तपासण्या काय व कधी कराव्यात?

प्रतिबंधक आरोग्य तपासण्या सर्वांनी करायला हवेत. यासाठी लिंग, वय यांचे बंधन नाही. परंतु कोणत्या व किती वारंवार कराव्यात ते तुमची लक्षणे, कुंटुबीय इतिहास, जीवनशैली व इतर जोखीम घटकांवर अवलंबून असते. तरी सामान्यतः खालीलप्रमाणे तुम्ही करू शकतात.

1) मुलांना आणि किशोरांना (१८ वयाखालील) बालपणापासून किशोरांपर्यंत नियमित आरोग्याची तपासणी करावी लागते. त्यात वाढ, वजन आणि विकास कसा झाला आहे याची डॉक्टर नोंद करतात. शिवाय प्रतिबंधात्मक लसीची नोंदणी करणे आवश्‍यक आहे. कान व दृष्टी, दंत समस्याचे वेळेवर निदान करणे व त्यांचे वारंवार स्क्रिनिंग करणे गरजेचे आहे.

2) युवा वयस्क (१८ ते ३०) लोकांना नियमित मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लैंगिक संक्रमित रोगांसाठी स्क्रिनिंग करावी. नियमित दंत तपासणी, कर्करोग, हाडांची व नेत्र तपासणी करावी.

3) मध्यम वयाचे लोकांनी (३० ते ५० वयोगटापर्यंचच्या) मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, कर्करोग (स्तन व आतड्यांचे) प्रोस्टेट कर्करोग (पुरुषांसाठी) हृदयाची स्ट्रेसद्वारे तपासणी करावी.

4) वृद्ध वयस्क - वरीलप्रमाणे तपासणी याशिवाय हृदयरोग (२डी इको) श्रवण व दृष्टी तपासणी, ऑस्ट्रिओपोरोसिस, मानसिक मूल्यांकन कराव्या लागतात.

या व्यतिरिक्त एखाद्या अवयवाचे लक्षणे असल्यास त्याप्रमाणे विशेष तपासणी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणे आवश्‍यक आहे.

आरोग्य तपासणीचे तोटे

1) तपासणीचा दर्जा व्यवस्थित नसेल तर कधी कधी चुकीच्या रिपोर्टमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणून तपासणीची निवड करताना समजूतीपूर्वक विचार करून तपासण्या करायला पाहिजेत.

2) वेळेची कमतरता - आरोग्य तपासणी करताना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.

3) खर्च - काही तपासण्या खर्चिक व अनावश्यक असू शकतात. आपण आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com