मसालेदार हिवाळा

हिवाळा हा साधारणपणे सगळ्यांना आवडणारा ऋतू. या काळात वातावरणात थंडी वाढलेली असते.
Winter
Wintersakal

- डॉ. मालविका तांबे

हिवाळा हा साधारणपणे सगळ्यांना आवडणारा ऋतू. या काळात वातावरणात थंडी वाढलेली असते. बाहेर थंड वातावरण असल्यामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त असतो, पचन व्यवस्थित होते, भूक छान लागते, या काळात कुठल्याही गोष्टीची चव ज्या प्रमाणात आवडते तशी कदाचित दुसऱ्या अन्य ऋतूत आवडत नाही.

एवढेच नव्हे तर या काळात खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली गेली तर या ऋतूत पुढच्या संपूर्ण वर्षासाठी शक्ती साठवून ठेवता येते, रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. या सगळ्यालाच मदत म्हणून निसर्गसुद्धा या काळात खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवत असतो. काळात अनेक प्रकारची फळे, भाज्या, कंद, मुळे आपल्याला निसर्गाकडून मिळत असतात. चटकदार, मसालेदार खाण्याचा ऋतू हा हिवाळाच असतो.

चटकदार, मसालेदार म्हटले की लोकांना आठवते ते फक्त लाल तिखट, कांदा व लसूण. पण भारतीय पाककलेचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारे विविध प्रकारचे मसाले. या काळात हे मसाले वापरणे अत्यंत उत्तम असते आणि शरीराला पोषकही ठरते. आज आपण हिवाळ्यात आवर्जून वापरण्यासारखे काही मसाले बघणार आहोत.

1) हळद : हळद ही भारतीय पाककलेतील सगळ्यात महत्त्वाची व प्रसिद्ध वनस्पती आहे. चांगल्या प्रतीची सेंद्रिय हळद कुष्ठघ्न (त्वचाविकार कमी करणारी), कंडुघ्न (खाज कमी करणारी), कृमिघ्न (शरीरातील कृमीदोष, विषाणूसंक्रमण – मायक्रोबिअल इन्फेक्शन यांना लांब ठेवणारी), शिरोविरेचन (मानेवरच्या भागातील दोषांचे हरण करणारी), शरीरातील कफाचे संतुलन करणारी असते.

या काळात चांगल्या प्रतीचे तूप खायला सांगितलेले आहे. फोडणी करत असताना तुपात चांगल्या प्रतीची हळद व्यवस्थित परतून घेतली तर त्या पदार्थाचे पचन जास्त चांगल्या प्रकारे होऊन सगळे फायदे मिळू शकतात. कफ कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्थिपणे तयार केलेले हळदीचे दूध लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना या काळात घेता येऊ शकते. इतर वेळी हळदीचे दूध काही लोकांना गरम पडते. पण थंडीच्या ऋतूत हळदीचे दूध प्रत्येकाला थोडया प्रमाणात चालू शकते.

हळदीचे दूध करण्याची संपूर्ण माहिती माहिती डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओमध्ये दिलेली आहे. गरम दुधात कच्ची हळद एक चमचा टाकून दूध घेणे याला हळदीचे दूध म्हणत नाहीत. त्वचाविकारांकरता थंडीच्या दिवसांत संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले तेल लावले तर त्यात वापरलेल्या हळदीचा फायदा मिळतो. स्नानाच्या वेळी सॅन मसाज पावडर दुधात मिसळून संपूर्ण शरीराला लावल्याचाही फायदा होतो. हळद हा सॅन मसाज पावडरचा महत्त्वाचा घटक आहे.

2) आले व सुंठ : आपल्या स्वयंपाकघरात ताजे आले व सुकविलेल्या आल्याची पूड म्हणजे सुंठ हे दोन्ही वापरण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. आले अन्नात रुची उत्पन्न करणारे, दीपन (पचनशक्ती वाढविणारे, वृष्य (वीर्यवृद्धी करणारे), हृद्य (हृदयाला उत्तम), शोफहर ( शरीरात असलेली सूज कमी करणारे), कफहर (कफ कमी कणारे. म्हणून सर्दी, खोकला, दम लागणे वगैरे त्रासांमध्ये आल्याचा उपयोग सांगितलेला आहे. विबंध व आनाह यांत उपयोगी असते म्हणजे आले पोट साफ व्हायला मदत करते, तसेच पोट फुगल्यासारखे वाटत असले तर ते कमी व्हायला मदत करते. आले श्र्वासहर, कफहर सांगितलेले आहे.

सर्दी-खोकल्याच्या त्रासात आल्याचा फायदा होतो. आल्याचा रस, किसलेले आले, सुंठ पूड या सगळ्यांचा वापर स्वयंपाक करताना करता येतोच, पण जेवणाआधी आल्याचा रस, लिंबाचा रस व मध एकत्र करून घेतल्यास पचनाला मदत मिळते.

3) दालचिनी : सध्याच्या काळात दालचिनीला फार महत्त्व दिले जात आहे. हिला सध्या wonder herbम्हणून प्रमोट केले जात आहे. पण खरे तर आयुर्वेदातील सगळ्याच वनस्पतीwonder herb सारख्याच आहेत. कारण शरीरात जाऊन त्यांचे कार्य करण्याची प्रणाली पाहिली की आश्र्चर्यच वाटते. पण तरी एकाच वनस्पतीला खूप जास्त महत्त्व देणे चुकीचे होय. कुठल्याही वनस्पतीची मात्रा व ती शरीरात घेण्याची पद्धत याचाही विचार करावाच लागतो.

दालचिनी शरीरात विषद्रव्ये कमी करणारी, हृदय व बस्तीच्या ठिकाणी असलेले जंतू कमी करणारी अर्थात हृदय, फुप्फुसे व बस्ती या तिन्ही महत्त्वाच्या अवयवांना मदत करणारी असते. दालचिनी डोके दुखणे कमी करते, तसेच मूत्रविसर्जनासंबंधी दोष असल्यास कमी करणारी, कंठशुद्धीकर (स्वर सुधारायला मदत करणारीव घसा दुखणे कमी करणारी) आहे. थोडक्यात काय तर दालचिनी सर्दी, खोकला अरुची, अंगाला सुटणारी खाज, सांधे दुखणे, शुक्रदोष, पाळीसंबंधित विकार कमी करायला मदत करते.

दालचिनीची पूड करून ठेवल्यास कुठल्याही मसाल्यांमध्ये वापरणे शक्य होते. चहा करताना १-२ चिमूट दालचिनीची पूड टाकता येते. ज्यांना दालचिनी स्वयंपाकात वापरण्याची इच्छा नसेल त्यांना सकाळी थोड्या मधात दालचिनीची पूड घेता येते, किंवा दालचिनीचा छोटा तुकडा तोंडात धरून चघळता येतो. फळाच्या रसात दालचिनीची पूड टाकता येते, यामुळे फळांचा रस अधिक चविष्ट होतो.

4) कलौंजी : म्हणजे कांद्याच्या बिया. काही लोक याला काळे छोटे जिरे वगैरे सुद्धा म्हणतात. या बिया अन्नाची रुची वाढवतात, तोंडाची दुर्गंधी कमी करतात, आर्तवशुद्धी व आर्तववृद्धीसाठी मदत करतात म्हणजे पाळीमधील रक्तस्राव वाढायला मदत होते. कलौंजी मेध्य (मेंदूसाठी चांगल्या), ज्वर कमी करणाऱ्या, वृष्य (वीर्यवृद्धी करणाऱ्या), पोटफुगी, उलट्या, आव वगैरे कमी करणाऱ्या, नाडीसंस्थान म्हणजे मज्जासंस्थेसाठी उत्तम समजल्या जातात. कलौंजीॲण्टिऑक्टडंट आहेत त्यामुळे यांचा hepatotoxicity व nephrotoxicity मध्ये फायदा होतो.कलौंजी कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात.

कलौंजीचा वापर सहसा कमी केला जातो, कारण त्या उष्ण गुणाच्या असतात. तसेच मासिक पाळीत अंगावरून जास्त प्रमाणात जात असल्यास किंवा गरोदरपणात यांचा वापर खूप सावधानीपूर्वक करावा लागतो. त्यामुळे हिवाळा हा असा एक ऋतू आहे ज्यात इतर मसाल्यांबरोबर कलौंजीचा वापर करणे चालू शकते. कलौंजी वापरल्यास पदार्थांना एक वेगळी चव व वास येतो. भाजी-आमटीची फोडणी करताना कलौंजीचा वापर करता येतो.

5) तीळ : तीळ वीर्याने उष्ण व कफ-पित्ताचे शमन करणारे असतात. तीळ अत्यंत स्निग्ध असतात त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्निग्ध व्हायला मदत करतात. तीळ त्वचा व केसांकरता उत्तम, शरीरात बल वाढविणारे, हाडांना दृढ करणारे, रसायन व वाजीकरणासाठी उत्तम सांगितलेले आहेत.

तीळ स्वयंपाकात तर वापरता येतातच, बरोबरीने थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलाचा अभ्यंगशरीराला करणे उत्तम मानले जाते. त्यामुळे संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले तेल संपूर्ण अंगाला नियमित लावावे.

6) केशर : केशर चवीला कडवट, वीर्याला उष्ण, त्रिदोषशामक, शरीराची कांती वाढविणारे, अन्नात रुची उत्पन्न करणारे, विषनाशक, शिरोरुजा (डोके दुखणे कमी करणारे) असते.

केशराचा उपयोग थंडीच्या दिवसात नियमितपणे करावा, कुठलीही पाककृती करताना केशराचा थोड्या प्रमाणात वापर करता येतो. किंवा शुद्ध केशर वापरून केलेले संतुलन अमृतशर्करासारखे रसायन घालून केलेले पंचामृत थंडीच्या दिवसात रोज घेणे स्वास्थ्यासाठी उत्तम ठरते.

तसेच या काळात हिंग, लसूण, पुदिना, ओवा, लवंग, मिरी इत्यादी मसाले नियमित वापरात ठेवलेले बरे. जशी आपल्याला थंडीच्या दिवसांत ऊब हवी असते तसे मसाले थंडीच्या दिवसांत आपल्या शरीरातील अग्नीला मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात मसालेदार म्हणजे चमचमीत नव्हे तर आरोग्याला मदत करणारे मसाले वापरणे इष्ट ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com