आरोग्यमंत्र : हृदयाच्या झडपेचे आजार : निदान आणि उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart

हृदयाच्या झडपेच्या आजारांचे निदान करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात.

आरोग्यमंत्र : हृदयाच्या झडपेचे आजार : निदान आणि उपचार

हृदयाच्या झडपेच्या आजारांचे निदान करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात.

  • ईसीजी : यामध्ये झडपेच्या आजारामुळे झालेल्या गुंतागुंतीविषयी कल्पना येते. ॲट्रियल फिब्रिलेशनसारखा अरिथमिया यामध्ये दिसू शकतो. याव्यतिरिक्त या आजाराची करणे काय आहेत त्याविषयी आपल्याला अंदाज येतो.

  • २-डी इकोकार्डियोग्राफी : ही सगळ्यात उपयुक्त चाचणी आहे. यामध्ये अल्ट्रासाऊंडच्या द्वारे हृदयाच्या झडपांचे कार्य आणि त्यांची झालेले अरुंदपणा (स्टेनोसिस) किंवा गळती (रेगुर्जिटेशन) याविषयी अभ्यास करता येतो. कलर डॉपलर तपासणीद्वारे रक्ताच्या गटामधील अडथळे आणि त्याचा दाब याविषयी अंदाज येतो. झडप अरुंद झाली असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती आहे आणि गळण्याचे प्रमाणदेखील प्रमाणित करता येते. झडपेवर काही जंतूसंसर्ग झाला असेल, तर तेदेखील यामध्ये दिसते. यामध्ये गरज असल्यास ३-डी इकोकार्डिओग्राफीसुद्धा केली जाते. यामधून शल्यचिकित्सकाला आवश्यक बहुमूल्य माहिती मिळते. याच उपयोग त्यांना शस्त्रक्रिया करताना आणि त्याची प्लॅनिंग करताना होतो.

  • छातीचा एक्सरे : यामध्ये हृदयाचा वाढलेला आकार , फुफुसांमधील साचलेले पाणी याविषयी कल्पना येते.

  • याव्यतिरिक्त हृदयाचा एमआरआय, एक्सरसाईज टेस्ट आणि कार्डियाक कॅथेटरायझेशन इत्यादी चाचण्याही सांगितल्या जाऊ शकतात.

हृदयाच्या झडपेच्या आजारांचे उपचार

झडपेचे आजार हे हृदयाच्या संरचनात्मक गोष्टीचे आजार असल्याने त्यांच्यासाठी औषधे मर्यादितरीत्या वापरली जातात. ती मुख्यत्वेकरून लक्षणे कमी करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये लघवी होण्याची ड्युरेटिक्स, डिजिटॅलिस, एस इनहिबिटर इत्यादी औषधांचा समावेश होतो. ही औषधे शरीरातील पाण्याचा संचय कमी करून हृदयावरील ताण कमी करतात आणि लागत असलेला दम कमी करवितात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधे ही काही कायमस्वरूपी उपचार नव्हेत. कायमस्वरूपी उपचारांसाठी शस्त्रक्रियेचा अवलंब करावा लागतो.

हृदयाच्या झडपेच्या शस्त्रक्रिया

  • मेट्रल स्टेनोसिस : यामध्ये हृदयाच्या मेट्रल झडपेचे क्षेत्रफळ कमी होते. ते वाढवण्यासाठी ३ प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येतात.

  • मेट्रल रेगरजिटेशन : यासाठी झडप दुरुस्त करणे किंवा ती बदलून नवीन बसविणे हा पर्याय असतो.

  • बलून मेट्रल वाल्वयुलोप्लास्टी : ही एक जास्त चिरफाड न करता केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. यामध्ये रुग्णाच्या मांडीमधून एक फुगा हृदयाच्या उजव्या बाजूमधून डाव्या कप्प्यामध्ये घातला जातो. हा फुगा मेट्रल झडपेच्या मधोमध नेऊन फुगविला जातो. यामुळे अरुंद झालेली झडप मोठी होते. शक्य असेल, तिथे प्राथमिक शस्त्रक्रिया म्हणून या शस्त्रक्रियेचा अवलंब केला जातो. यामध्ये छाती उघडावी लागत नाही व रुग्णालयामध्ये राहण्याचा आणि बरे होण्याचा वेळही जलद असतो. परंतु, ही शस्त्रक्रिया सर्व रुग्णांना करता येते असे नाही. ज्यांची झडप अशा प्रक्रियेसाठी योग्य आहे अशा रुग्णांनाच ही प्रक्रिया करता येते.

  • क्लोज्ड आणि ओपन मेट्रल वाल्वयुलोटोमी : यामध्ये छाती उघडून अथवा बंद ठेवून शस्त्रक्रियेद्वारे झडप मोठी केली जाते. ही एक इन्व्हेसिव्ह प्रक्रिया आहे. यामध्ये तुलनेने जास्त वेळ रुग्णालयामध्ये राहावे लागते. गुंतागुंत होण्याची शक्यताही जास्त असते.

  • व्हॉल्व्ह प्रत्यारोपण शस्त्रक्रिया : यामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया करून खराब झालेली झडप काढून टाकून त्याजागी नवीन झडप शिवली जाते. या झडपा धातूच्या किंवा चरबीच्या असतात. धातूच्या झडपा जास्त वर्षे टिकतात; पण त्यासाठी आयुष्यभर वार्फरीन नावाचे औषध रक्त पातळ ठेवण्यासाठी घ्यावे लागते. चरबीच्या बायोप्रोस्थेटिक झडपांना हे औषध घेण्याची आवश्यकता नसते. रुग्णाचे वय, लिंग, आर्थिक क्षमता इत्यादींचा विचार करून कोणत्या प्रकारची झडप बसवायची ते ठरवितात. या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे ८-७दिवस रुग्णालयात ठेवावे लागते .

  • मांडीतून झडप प्रत्यारोपण (TAVR) : ही एक अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. ती मुख्यत्वेकरून ॲऑर्टिक व्हॉल्व्हसाठी वापरली जाते. यामध्ये छाती ना उघडता मांडीतील रक्तवाहिनीद्वारे कृत्रिम झडप हृदयात नेऊन बसविली जाते. तुलनेने ही अतिशय खर्चिक शस्त्रक्रिया आहे. ज्या रुग्णांना ओपन शस्त्रक्रिया शक्य नाही अथवा इतर गुंतागुंत आहे किंवा खूप जास्त वय आहे अशांसाठी ती राखीव आहे.