भावातीत ध्यान

पाश्चात्य देश हे भौतिकदृष्ट्या नेहमीच जगात अग्रणी राहिले आहेत. मात्र, विकासाच्या या कथित सर्वोच्च टप्प्यावर पोचताना, यातून अपरिहार्यपणे चंगळवाद, भोगवाद निर्माण झाला.
yoga
yoga sakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

पाश्चात्य देश हे भौतिकदृष्ट्या नेहमीच जगात अग्रणी राहिले आहेत. मात्र, विकासाच्या या कथित सर्वोच्च टप्प्यावर पोचताना, यातून अपरिहार्यपणे चंगळवाद, भोगवाद निर्माण झाला. त्यानं तिथल्या आबालवृद्धांचं मानसिक सुख, स्वास्थ्य, शांतता हिरावून घेतली ती कायमचीच. गेल्या शतकात भारतातल्या अनेक योगी पुरुषांनी पश्चिमेकडील देशांत जाऊन तिथल्या लोकांना योगिक ध्यानातून मनःशांती देण्याचा प्रयत्न केला.

महर्षी महेश योगी हे असेच इथून अमेरिकेत गेलेले योगी. सन १९९३मध्ये त्यांनी ध्यानाचे अप्रत्यक्ष परिणाम दाखवणारा एक अभूतपूर्व असा प्रयोग तिथं केला. त्यांनी त्यांच्या चार हजार ध्यानशिक्षकांना वॉशिंग्टन शहरात बोलवून एक महिना ध्यानाची साधना करायला सांगितलं. एक महिन्यानंतर वॉशिंग्टनमधे घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण, संख्या यांचा अभ्यास केला. यातून पुढे आलेल्या निरीक्षणानं अमेरिकन नागरिक चकित झाले.

हा अभ्यास केल्यानंतर वॉशिंग्टन शहरातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी होत तब्बल पन्नास टक्क्यांनी घटलं. महर्षीनी तिथल्या शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केल्यानं, शास्त्रज्ञांनी या घटनेला ‘महर्षी इफेक्ट’ असं नाव दिलं. ध्यानामध्ये आश्चर्य वाटावं इतकी ताकद आहे, हेच या संशोधनानं जगाला दाखवून दिलं.

महर्षी महेश यांनी भावातीत ध्यान (ट्रान्सिंडेंटल मेडिटेशन) ही अतिशय सोपी आणि सुटसुटीत ध्यानपद्धती जगापुढे ठेवली. संपूर्ण अमेरिकेला ध्यानस्थ करणारे महेश योगी यांचं व्यक्तिमत्त्व कसं असेल याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. एखादा योगीपुरुष म्हटलं, की उंच, धिप्पाड, गोरापान, धारदार नाक, गंभीर चेहऱ्याचा साधूपुरुष डोळ्यासमोर येतो.

महर्षी मात्र अगदी याउलट होते. बेताची उंची, चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य, बोलताना स्वतः मिश्किलपणे हसत दुसऱ्याला हसत ठेवणारं असं त्यांचं एकंदरीत आनंददायी व्यक्तिमत्त्व होतं. म्हणूनच परदेशी लोकांनी त्यांचं नाव प्रेमानं ‘गिगलिंग गुरू’ असं ठेवलं होतं.

त्यांचं हे भावातीत ध्यान नक्की कसं होतं ते आपण पाहूया. या योगिक ध्यान प्रकारात, स्वतः महर्षी, किंवा त्यांचे प्रशिक्षक, हे साधकाला एक विशिष्ट मंत्र देत. या मंत्राच्या अर्थाकडे अजिबात लक्ष न देता, फक्त त्याच्या ध्वनीकडे लक्ष द्यायचं. ध्यान करताना हा मंत्र, किंवा ध्वनी हा सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. हे अनुभवत मन त्याच्या अतिसूक्ष्म अवस्थेचा अनुभव घेत, शुद्ध जाणिवेच्या अवस्थेत पोचतं. या स्थितीत मंत्र, त्याचा ध्वनी आणि विचार यांचा पूर्णपणे लय झालेला असतो.

हे ध्यान करणाऱ्या लक्षावधी साधकांच्या वेळोवेळी वैद्यकीय पद्धतीने चाचण्या, मोजमापं घेतली गेली. या केलेल्या शास्त्रोक्त तपासण्यांतून खाली दिलेले निष्कर्ष पुढे आले -

  • ध्यानापूर्वी नाडीचे ठोके प्रती मिनिट ७५ ते ८० होते. ते ध्यानात ६५ ते ६८ इतके कमी झाले.

  • वाढलेला रक्तदाब कमी झाला.

  • मेंदूत अल्फा लहरी उत्पन्न झाल्या.

  • त्वचा प्रतिरोध (स्किन रेझिस्टन्स) १५० ते ३०० किलो ओहम्स इतका वाढला. त्यामुळे ताण, चिंता कमी होते.

  • ऑक्सिजनचा वापर १६ टक्के इतका कमी होतो.

महर्षी महेश योगीप्रणित भावातीत ध्यानामुळे आजार, व्याधी बऱ्या होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते, हेच या सगळ्या निरीक्षणातून ठळकपणे स्पष्ट झालं.

स्वित्झर्लंड देशातल्या सिलीसबर्ग इथं महेश योगींनी भव्य आश्रम उभारून अनेक वर्षं ध्यानाचा उत्कृष्टरीत्या प्रसार, प्रचार, संशोधन केलं. भारतीयांच्या दृष्टीनं ही अतिशय अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com