‘सर्वे सन्तु निरामयाः’

सर्वांनी सुखी व्हावे असे म्हटल्याबरोबर महत्त्वाचे माध्यम, शरीर निरामय असावे हे लगेचच म्हणावे लागते.
Healthy Life
Healthy Lifesakal

सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्‍यन्तु मा कश्र्चित्‌ दुःखमाप्नुयात्‌॥

म्हणजे सर्वांनी सुखी व्हावे असे म्हटल्याबरोबर महत्त्वाचे माध्यम, शरीर निरामय असावे हे लगेचच म्हणावे लागते. दुःख कोणालाच नको हे म्हणण्यापूर्वी सर्वांचे कल्याण व सर्व ठिकाणी चांगले पाहण्याचा संकल्पही करावा लागला. दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा पहिला प्रश्‍न, ‘कशी काय आहे तब्येत?’ हाच असतो.

मुले-बाळे दूर राहत असतील तेव्हा त्यांच्या तब्येतीची काळजी वडीलधाऱ्यांना व वृद्ध मात्यापित्यांच्या प्रकृतीची काळजी मुलांना असते. म्हणजेच काय की निरामय आरोग्य व सुदृढता हेच सर्वांचे पहिले लक्ष्य असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ असे जे म्हटले जाते ते उगाच नाही.

कारण जीवनाची सर्व सुखे शरीर नसले तर उपभोगणार कशी? समाधान जरी मानसिक असले तरी मनाला बरेचसे शरीरस्वास्थ्यावरच अवलंबून राहावे लागते. एखादी व्यक्ती भेटल्यावर ‘तुझी तब्येत छान दिसत आहे’, असे म्हटले म्हणजे खूप आनंद होतो. अर्थात या छान दिसण्यात निरामयता, सृदृढता व ओज या गोष्टी अवलंबून असतात.

पण त्या उलट जर कोणी ‘वा, फार छानच झाली आहे तब्येत’ असे म्हटले तर हा शेरा वाढलेल्या पोटावर व बेढबपणावर दिलेला आहे हे लक्षात येते. मनुष्य बुटका, उंच, किडकिडीत, जाड कसाही असला तरी तो सुदृढ व निरामय असावा. म्हणजे त्याचे शरीर लवचिक, वळणदार, तेजःपुंज असून, तो स्वतःची सृजनशक्ती दाखविण्यास अर्थात सर्व दैनंदिन व्यवहार करण्यास समर्थ असायला हवा.

पित्ताचा रजोगुण घेतल्याशिवाय काम करण्याची इच्छा व स्फूर्ती मिळणारच नाही. पण या पित्ताच्या असंतुलनातून शरीरात उरलेला आंबट, चिकट तेज-अम्ल गुणधर्माचा पदार्थ साठत राहतो. रोज पोट साफ झाले, मूत्रविसर्जन व्यवस्थित झाले तरी प्रत्येक आठवड्यात एकदा विशेष दक्षता घेऊन हे आमद्रव्य शरीराबाहेर काढावे लागते.

तसेच विशिष्ट वयानंतर कधीतरी अधिकच कडक उपाय योजून विधिपूर्वक सर्व दोष शरीराबाहेर काढावे लागतात, अन्यथा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे साध्य, कष्टसाध्य, असाध्य रोग होतात. आणि म्हणूनच सुदृढ शरीराची अपेक्षा धरणाऱ्याला प्रथम निरामय शरीराची व्यवस्था ठेवावी लागेल.

खाणे-पिणे, योग, व्यायाम एवढ्यावरच शरीर निरामय व सुदृढ ठेवता येत नाही. योगसूत्रात पण प्रथम यम-नियमासारख्या गोष्टींना महत्त्व दिलेले सापडते. मनात एकदा का क्रोध, द्वेष, हट्टीपणा वगैरेंनी घर केले की सर्व आरोग्य बिघडून जाते. मानसिक ताण हा तर आमच्या संचयाचे एक महत्त्वाचे कारण आहे.

सदाचार, सद्‌वृत्ती, सामाजिक स्वास्थ्य, ध्यान, ईशचिंतन या गोष्टीही निरामयतेसाठी आणि चांगल्या शरीर व व्यक्तिमत्त्वासाठी अत्यंत आवश्‍यक असतात. केवळ आयुर्वेदाचा ‘पंचाक्षरी मंत्र’च आपल्याला संपूर्ण निरामयता आणि सर्व प्रकारचे सुख देऊ शकतो.

आरोग्याच्या नव्या व्याख्येप्रमाणे शरीर व मनाबरोबरच सामाजिक आरोग्य आणि आत्मिक (आध्यात्मिक आरोग्य) ही कल्पना जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारलेली आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व व सुदृढ शरीर असलेला मनुष्य जर माणूसघाणा असला किंवा अशिक्षित असला तर त्याला महत्त्व राहणार नाही. निरामयता केवळ शरीरापुरती मर्यादित न ठेवता मानसिक व आध्यात्मिक शरीराला पण लागू करावी लागेल.

दुसऱ्याची बाजू समजावून न घेणे, रागावल्याने काम बिघडते हे समजून घेणे, ईर्ष्या व द्वेष करण्यामुळे स्वतःची प्रगती थांबेल हे लक्षात घेणे अशी मनाची निरामयता, चारचौघांबरोबर जमवून घेऊन टीमवर्क हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे समजून वागणे, समाजाने आपल्याला बरेच दिले आहे, तेव्हा सामाजिक नियमांचे पालन, बंधन स्वीकारून समाजालाही काहीतरी देणे ही सामाजिक निरामयता आणि शरीर हे जरी नश्‍वर असले तरी सत्कृती मागे उरणार हे ध्यानी घेऊन काहीतरी कार्य करणे, सर्वांभूती आत्मभाव पाहून प्रेम वाढविणे, चांगल्या कार्यासाठी अदृश्‍य शक्ती कायमच मदत करत असते हे समजून घेऊन त्या शक्तीप्रती कृतज्ञ राहणे आणि स्वतःमधील व अशा परमशक्तीवरील विश्‍वास वाढविणे ही आध्यात्मिक निरामयता.

‘सर्वे सन्तु निरामयाः’ ही प्रार्थना प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्मसुद्धा महत्त्वाचे होय. पंचकर्म म्हणजे वमनादि कर्मे असे समीकरण रूढ झाले असले तरी पंचकर्माचा खरा अर्थ ‘पंचमहाभूतांची शुद्धी’ असा आहे. पृथ्वी व जल महाभूताची शुद्धी वमनाने; जल व तेज महाभूताची शुद्धी विरेचन व रक्तमोक्षणाने; वायू महाभूताची शुद्धी बस्ती व नस्याने; आकाश महाभूताची शुद्धी योग, स्वास्थ्यसंगीत व ध्यानाने करून संपूर्ण पंचकर्म करता येते. अशा पंचकर्माचा उपयोग शरीराबरोबरच मन व आत्म्याचे संतुलन होण्यासही होताना दिसतो.

आयुर्वेदीय तत्त्वांना अनुसरून योग्य प्रकारे केलेले पंचकर्म रोगाच्या मुळावरच काम करत असल्याने विविध रोगांतही एक उत्तम उपचार म्हणून करतात. सांधेदुखी, पाठदुखी, त्वचाविकार, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, पॅरालिलिस, हॉर्मोनल असंतुलनामुळे होणारे विकार, हृदयरोग, मानसिक विकार वगैरे सर्व विकारांवर पंचकर्माचा यशस्वी उपयोग होताना दिसतो. रोग बरा करण्यासाठी जेव्हा पंचकर्म केले जाते, तेव्हा पंचकर्मानंतर काही विशेष औषधे सुचवली जातात, त्यांचीही रोग मुळापासून बरा होण्यास मोलाची मदत मिळते.

शरीरशुद्धीसाठी पंचकर्म; मानसिक, आध्यात्मिक संतुलनासाठी योग, स्वास्थ्यसंगीत, ॐकार गूंजन आणि प्रकृतीनुरूप आहार-विहार, व्यायाम, चालणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास ‘सर्वे सन्तु निरामयाः’ प्रत्यक्षात आणणे अवघड नाही.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com