माझी नात तीन वर्षांची आहे. तिच्या वेळच्या गरोदरपणात सर्व गर्भसंस्कार डॉ. बालाजी तांबे यांच्या पुस्तकाप्रमाणे केले. तिची सर्व प्रगती उत्तम आहे, ती जेवण व्यवस्थित करते, तिचे पोट रोज साफ होते, पण तिची शाळा सुरू झाल्यापासून काही दिवसांपासून तिचे डोके गरम असते व ती रात्रीची शांत झोपत नाही. यासाठी काही उपाय सुचवाल का?...
- सौ. मंजिरी चंद्रा, सोलापूर
उत्तर : शाळेत जायला सुरुवात झाली की लहान मुलांच्या आजूबाजूच्या वातावरणात एकदम बदल झाल्यासारखा होतो. ती किती तास शाळेत जाते, तिचा वर्ग कशा जागेवर आहे, वर्ग हवेशीर आहे की नाही या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. शरीरात उष्णता वाढल्यावर अशा प्रकारे डोके गरम लागणे, झोप कमी येणे असा त्रास दिसू शकतो. सध्या तरी तिला रोज रात्रभर भिजवलेल्या काळ्या मनुकांचे पाणी शाळेत जाण्यापूर्वी द्यायला सुरुवात करावी. तसेच तिला जेवणानंतर छोटी वाटी ताक जिरे पूड व मीठ घालून द्यावे. दिवसातून एकदा तिच्या तळपायांना संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने पादाभ्यंग करावे. रात्री झोपताना तिच्या डोक्याला ब्रह्मलीन तेल लावावे. जमल्यास तिला संतुलन प्रवाळ पंचामृत गोळी सकाळ संध्याकाळ १-१ द्यायला हरकत नाही. शाळेत सर्व व्यवस्थित आहे ना, तिला कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही ना, याची तिच्या वर्गशिक्षकांशी बोलणे करून खात्री करून घेतलेली बरी.