Health : ताणतणावांपासून दूर नेणारे ‘स्लीपिंग टुरिझम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleeping

Health : ताणतणावांपासून दूर नेणारे ‘स्लीपिंग टुरिझम’

पुणे : कोरोनाकाळात ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढलेले काम...ऑफिसमधून काम सुरू झाल्यानंतर घरी परतताना वाहतूक कोंडीमुळे होणारा मानसिक ताण...त्यामुळे होणारी चिडचिड. या सर्वांचा थेट परिणाम आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या विश्रांतवाडी येथील २८ वर्षीय अमरिंदर सिंह यांच्यावर झाला आहे. त्यामुळे हल्ली त्यांना कमी झोप येत असल्याची समस्या जाणवू लागली आहे. चांगली झोप होत नसल्यामुळे त्यांचे कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. या तणावातून बाहेर पडण्यासाठी ते पुढील आठवड्यात ‘स्लिपिंग टुरिझम’साठी रवाना होणार आहेत.

इतर क्षेत्रांसह पर्यटनातदेखील कोरोनानंतर अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे होत असलेला त्रास दूर करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात नवनवीन पॅकेज उपलब्ध होत आहेत. त्यातच आता ‘स्लिपिंग टुरिझम’चा एक नवा ट्रेंड

सुरू झाला आहे. हा ट्रेंड आहे झोपण्यासाठी केल्या जाणाऱ्या पर्यटनाचा. पाश्चात्त्य देशांमध्ये पर्यटनाचा हा प्रकार रुजलेला असून हळूहळू भारतातही याची सुरुवात होत आहे. अद्याप याबाबत बहुतांश लोकांना माहिती नसली तरी आयटी क्षेत्रात याला प्रतिसाद मिळू लागला आहे.

काय आहे संकल्पना?

वाढती स्पर्धा, त्यातून होणारी दगदग आणि नोकरी-व्यवसायामुळे वाढत असलेला दैनंदिन कामाचा ताण यामुळे अनेकांना झोपण्याची समस्या जाणवत आहे. त्यांच्या नियमित झोपेचे वेळापत्रकदेखील बिघडले आहे. सात तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांची संख्या यामुळे वाढत आहे. परिणामी, कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आपल्या नियमित झोपेच्या वेळापत्रकाला पूर्ववत करण्यासाठी स्लिपिंग टुरिझमचा पर्याय निवडला जातो. कोरोनाकाळात अनेकांना झोपेशी निगडित समस्या उद्‍भवल्या आहेत. त्यामुळे आरोग्य टुरिझमची एक शाखा असलेल्या या पर्यटन ट्रेंडला कोरोनानंतर काहीसा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

या अनोख्या पर्यटनामध्ये चांगल्या झोपेवर लक्ष केंद्रित केले जाते. ही संकल्पना हळूहळू देशात येत असून, अशा पर्यटनाची सेवा पुरविणारी हॉटेल, पर्यटनस्थळे उपलब्ध होत आहेत. स्लिपिंग टुरिझम ही काळाची गरज असून, त्याला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्राद्वारे प्रयोग केले जात आहेत.

- नीलेश भन्साळी, संचालक,ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, पुणे

निवडले जाणारे स्थळ

यासाठी शक्यतो शांत ठिकाणांची निवड केली जाते

शहरातील गर्दीपासून लांबच्या ठिकाणांना पसंती

हिमालयातील खोऱ्यामध्ये हा ट्रेंड सुरू आहे

गावांमध्ये ‘होम स्टे’देखील केला जातो

पुण्यात मुळशी, भोर परिसरातील ‘बॅकवॉटर’ला पसंती