वाढता वाढता वाढे (उत्तरार्ध)

आनुवंशिक स्थौल्य अनेक घराण्यांमध्ये स्थौल्याचा इतिहास असतो. अशांनी सुरुवातीपासून जागरूक राहून व्यायाम करणे, खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक असते. वजन वाढले तर कमी होणे अवघड असते, तसेच क्रॅश डाएटिंग वगैरे केल्यास ताकदही कमी होते.
healthy diet weight loss fat burning exercise india
healthy diet weight loss fat burning exercise indiaSakal

- डॉ. मालविका तांबे

आनुवंशिक स्थौल्य अनेक घराण्यांमध्ये स्थौल्याचा इतिहास असतो. अशांनी सुरुवातीपासून जागरूक राहून व्यायाम करणे, खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक असते. वजन वाढले तर कमी होणे अवघड असते, तसेच क्रॅश डाएटिंग वगैरे केल्यास ताकदही कमी होते. वजन बेताचे राहील हाच प्रयत्न करणे जास्त श्रेयस्कर. तसेच भारतीय वंशाच्या व्यक्तींमध्ये पोट व मांड्या स्थूल असण्याची प्रवृत्ती आढळते.

चाळिशीनंतर वजन वाढणे

आपल्या शरीरात प्रकृतीनुसार व दोषांनुसार वेगवेगळे बदल वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असतात. साधारण चाळिशीनंतर महिला व पुरुष या दोन्हींमध्ये नैसर्गिकपणे वजन वाढलेले दिसते.

विशेषतः स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात व पुरुषांमध्ये ५०-५५च्या सुमारास थोडे वजन वाढणे व थोडे पोट वाढणे स्वाभाविक असते. परंतु ‘मी तिशीत असल्यासारखा दिसायला हवे,’ असा चाळिशीतील स्त्री वा पुरुषाने अट्टहास धरणे निसर्गनियमांच्या विरुद्ध असते.

वेगवेगळ्या जाहिराती पाहून, सिनेतारका, सिनेतारक पाहून आम्ही असे का दिसत नाही? असा प्रश्‍न लोकांना बऱ्याचदा पडतो. परंतु मेकअप न करता किंवा कुठल्याही प्रकारचे अनैसर्गिक उपचार न घेता कोणीच चाळिशीत तिशीसारखे दिसू शकत नाही. वय वाढणे व त्यानुसार शरीरात बदल होणे हे एक अटल सत्य आहे. त्यामुळे याबाबतीत अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत. वजन किती असणे स्वास्थ्याच्या दृष्टीने बरे? याला काय मोजमाप आहे?

बीएमआय

कोणीही समोर आले की आकर्षणातील एक महत्त्वाचा भाग असतो बांधेसूदपणाचा. उंची व वजन हे प्रमाणात असले तर व्यक्ती आकर्षक दिसते. उंची व वजन या संबंधाला बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) असे नाव दिलेले आहे.

परंतु खरे पाहिले तर उंची साधारण १७-१८ व्या वर्षानंतर वाढत नाही. १७-१८ व्या वर्षापर्यंत साधारण सगळेच सडसडीत असतात. वय वाढत जाते, चाळिशीकडे झुकू लागते तसे नैसर्गिकपणे शरीर थोडे वजन साठवायला लागते, कारण शरीराची तयारी सुरू असते पुढे येणाऱ्या म्हातारपणासाठीची.

तर ‘बीएमआय’ सूत्रात वयाचा विचार का बरे केला जाऊ नये? त्यामुळे वजनाचा विचार करताना उंचीबरोबर वयाचाही विचार करणेही आवश्यक आहे. आपले वजन ‘बीएमआय’च्या सूत्रात बसत नसले तरी काळजी करण्याची गरज नाही कारण तुमचे स्वास्थ्यपूर्ण वजन वेगळे असू शकेल.

साधारणपणे दिनक्रम व्यवस्थित पाळता येईल, काम करताना, व्यायाम करताना थकवा येणार नाही, धाप लागणार नाही, शरीर चपळ असेल असे वजन साधारणपणे स्वाभाविक असू शकेल. अर्थातच प्रत्येक व्यक्तीचे आदर्श वजन वय, उंची, प्रकृती, व घराण्यातील इतिहास यांनुसार वेगवेगळे असू शकते.

वजन वाढलेले असेल तर त्यासाठी कोणते उपचार करता येतात ते पाहू.

१. वजन वाढण्याची कारणे आपण मागच्या भागात पाहिली होती. त्या कारणांपासून लांब राहणे, आहारामध्ये यव, सर्व प्रकारची तृणधान्य (मिलेट्स), मूग, उडीद, कुळीथ, मसूर वगैरेंचा समावेश ठेवावा. तसेच आहारात ताक, मध, गरम पाणी, तूप, तिळाचे तेल यांचाही वापर नक्की करावा. कुठलाही आहार जास्त प्रमाणात तसेच पोटभर खाऊ नये.

२. लंघन अतिस्थौल्यामध्ये महत्त्वाचे ठरते. अर्थातच आहारपोषणाच्या सर्व गरजा पूर्ण व्हायला हव्यात, परंतु आहार फार स्निग्ध वा तृप्त करणारा नसावा.

३. रोज सकाळी एक छोटा ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध घालून प्यावे.

४. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे उत्तम. चालायला जाणे, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम यांचा दिनचर्येत समावेश नक्की करावा.

५. दुपारची झोप पूर्णपणे टाळावी.

६. आठवड्यातून २-३ वेळा तरी शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेल्या तेलाचा संपूर्ण शरीराला अभ्यंग करावा. त्यानंतर सॅन मसाज पावडरसारख्या एखाद्या वनस्पतीज उटण्याने उद्वर्तन करावे.

७. एक चमचा त्रिफळा चूर्ण ग्लासभर पाण्यात उकळायला ठेवावे. अर्धे झाल्यावर गाळून घेऊन ते पाणी दिवसातून कधीही घ्यावे.

८. शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे वजन कमी करायला मदत करू शकते. वमन, विरेचन तसेच बस्ती हे उपचार वजन कमी करण्यासाठी निश्‍चित मदत करू शकतात.

९. काही लोकांमध्ये अनावश्यक ताण असल्यामुळे हॉर्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे वजन वाढलेले दिसते. अशा वेळी शिरोधारा करण्याचा फायदा मिळू शकतो.

१०. त्रिफळा गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ वगैरेंसारखे गुग्गुळाचे कल्पही घेण्याचा फायदा मिळू शकतो.

११. आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून प्रकृती तपासून घेऊन प्रकृतीनुसार औषधयोजना करता येऊ शकते.

स्थौल्य या लक्षणाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर नंतर वजन कमी करणे फार अवघड असते. मनुष्य जितका अनुशासनप्रिय असेल, स्वतःची काळजी घेण्यासाठी इच्छुक असेल तेवढे या दुःष्चक्रातून बाहेर पडणे सोपे जाते.

पण थोडे दिवस नियमांत राहणे, पुन्हा काही दिवसांनी वजनाकडे लक्ष न देणे असे केल्यास वजन वाढत राहते. त्यामुळे जागरूकता व अनुशासन या दोन्ही गोष्टी वाढत्या वजनाला कमी करण्यात किंवा नियंत्रणात आणण्यात मदत करू शकतात, अन्यथा ते वाढता वाढता कधी सीमा पार करेल ते सांगता येणार नाही.

वजन कमी करण्यासाठी टिप्स

१. सकाळी सहाच्या आत उठणे.

२. सकाळी तीस मिनिटे चालणे.

३. सकाळच्या कोवळ्या उन्हात १० मिनिटे बसणे.

४. तहानेनुसार दिवसभर कोमट वा गरम पाणी पिणे.

५. आल्याचा वीस मिली रस एक लिटर पाण्यात टाकून दिवसभरात थोडे थोडे पिणे.

६. जेवण सुरू करण्याआधी थोडे कोमट पाणी पिणे किंवा आले, मध व लिंबू यांचे चाटण घेणे.

७. कॅलरी कमी करण्यासाठी न्याहारी किंवा जेवण चुकवू नये.

८. जेवण करताना टीव्ही वा मोबाईल पाहणे टाळणे.

९. रात्री सातनंतर काहीही खाणे टाळणे.

१०. नियमितपणे स्वेदन व अभ्यंग घेणे.

११. दिनचर्येचा व आहाराचा एक तक्ता बनवावा, व त्यात टिक मार्कस् कराव्या, जेणेकरून आठवड्यातून किती वेळा चुका झाल्या हे कळेल व अनुशासनासाठी सोपे होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com