Knee Pain : गुडघेदुखीमागे खरंच वाढतं वजन कारणीभूत? हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Knee Pain

Knee Pain : गुडघेदुखीमागे खरंच वाढतं वजन कारणीभूत? हे वाचाच

स्थूल आणि अतिरिक्त वजन असलेल्या रुग्णांमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण वाढू लागले आहे. एका निष्कर्षानुसार ८० टक्के रुग्ण लठ्ठपणामुळे गुडघेदुखीच्या समस्येने ग्रस्त आहेत.

आहार आणि व्यायामाव्यतिरिक्त बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेच्या मदतीने वजन कमी करण्यात येत असले, तरी स्थुलत्व येऊच नये यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण अशी त्रिसूत्री पाळण्याची नितांत गरज असल्याचे मत डाॅक्टरांनी व्यक्त केले आहे. (How do get rid of weight gain which causes of knee pain )

लठ्ठपणामुळे हाडे आणि सांध्यांच्या समस्या, अस्थिभंग आणि शेवटी ऑस्टियोआर्थरायटिस (गुडघेदुखी) होतो. अशा रुग्णांना गुडघा बदलण्याचा शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात येतो. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे वजन कमी होत असल्याने गुडघेदुखी दूर होत असल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष आहे.

‘आस्था बॅरिअॅट्रिक्स’चे मुख्य बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. मनीष मोटवानी सांगतात, की लठ्ठपणात गुडघेदुखी सर्वाधिक आढळणारा आजार आहे. शरीराचे अतिरिक्त वजन वाढल्याने सांध्यांवर हानिकारक भार पडतो. मात्र, फक्त १० टक्के वजन कमी केल्याने संधिवाताच्या वेदना निम्म्याने कमी होऊ शकतात.

एखाद्याचा बीएमआय ३० च्या वर असेल; तर बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया चांगला पर्याय असू शकतो; पण रुग्णांनी वजन कमी ठेवणे, दररोज व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Weight Loss : थंडीत वजन वाढतंय ? हे उपाय करा

तासन् तास काॅम्प्युटरसमोर काम करणे, टीव्हीसमोर ठाण मांडून बसणे, चालण्याची सवय नसणे, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन आणि कमी होत चाललेल्या शारीरिक हालचालींमुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजार बळावतो आहे. गुडघ्याच्या समस्यांमुळे आयुष्यभराकरिता अंथरुणाला खिळून राहावे लागू शकते.

शारीरिकबरोबरच मानसिक आरोग्यही धोक्यात

लठ्ठ व्यक्तींकडे समाज नकारात्मक भावनेने पाहतो. कमी इच्छाशक्ती असलेल्या व्यक्ती म्हणून नेहमीच त्यांची टर उडवली जाते. वजन आणि शरीराच्या आकारावरून त्यांना अवास्तव सल्ले दिले जातात. परिणामी त्यांच्यात नैराश्य येऊ शकते.

पुरुषांपेक्षा स्त्रियांना लठ्ठपणाशी संबंधित नैराश्याचा धोका अधिक असतो. लठ्ठपणाचे शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही होत असलेले दुष्परिणाम वेळीच ओळखणे गरजेचे असल्याचा सल्ला डाॅक्टर देतात.

हेही वाचा: Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट

भारतीयांमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण अधिक

शरीराच्या वजनाचा अतिरिक्त ताण हाडांवरच येतो आणि त्यातूनच सांध्यांचे कार्टिलेज फाटू लागते. म्हणूनच लठ्ठ व्यक्तींना तरुणपणीच संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.गुडघ्यावर वजनाचा अधिक आघात होतो. कारण गुडघा शरीराचा सर्वाधिक भार सोसत असतो.

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, जपान आणि स्वित्झर्लंडच्या तुलनेत झीज होऊन सांधे दुखणे आणि सुजण्याचे प्रमाण भारतात अधिक आढळते. लठ्ठपणामुळे उच्च कोलेस्टेरॉल, टाइप 2 मधुमेह, पित्ताशयाचा आजार आणि गुडघेदुखी होऊ शकते. लठ्ठपणा एखाद्याचे आयुर्मानही कमी करते.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ब्रेन स्ट्रोकसह इतरही अनेक समस्या येऊ शकतात. वजन वाढल्याने हृदयविकाराची शक्यताही वाढते. हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोकाही वाढतो. हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताही वाढते.