
Health Tips : कोणतं तूप खावं, गाईचं की म्हशीचं? शरीरासाठी कोणतं तूप योग्य ठरेल वाचा
Health Tips : तूप खाणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तुमच्या शरीरासाठी कोणते तूप योग्य ठरते ते तुम्हाला माहिती असायला हवे. गायीचं किंवा म्हशीचं तूप शरीरासाठी पौष्टिक असते आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी या तूपाचा वापर आपण करतो. मात्र या दोन्ही तूपांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. तेव्हा योग्य तूप कसं निवडावं ते जाणून घ्या.
योग्य तूप कसे निवडायचे?
तूप निवडण्यासाठी सर्वात आधी तुमच्या गरजा जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून बनलेले तूप खायला हवे. तसेच चरबी कमी करत बॉडी मास वाढवायचे असेल तर तुम्ही गायीचे तूप खायला हवे.
तुपाचा संबंध पचनक्रियेशी
जर तुम्हाला पचनाशी संबंधित काही त्रास असेल तर तुम्ही देशी गाईच्या दुधापासून तयार केलेल्या तूपाचे सेवन करावे. पण जर तुमचा मेटाबोलिक रेट जास्त असेल आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज पचत असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे.
जर तुम्हाला वाटत असेल की म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खाल्ल्याने तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने वाढते आहे, तर तुम्ही गाईचे तूप खाऊ शकता.
तूपाने मानसिक थकवा दूर होतो
नोकरीच्या ठिकाणी मानसिक थकवा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आहारात गायीच्या तूपाचा समावेश करा.
पण जर तुम्ही बॉडी बिल्डिंग किंवा खेळाशी संबंधित कोणत्याही व्यवसायात असाल तर म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
तुम्ही क्रिडा क्षेत्रातील कोणत्याही खेळाशी तुमचा संबंध असेल तर तुम्ही नियमित म्हशीचं तूप खायला पाहिजे.
हेही वाचा: Benefits Of Ghee: केसांना तूप लावण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
स्नायूंच्या वाढीसाठी कोणते तूप योग्य?
जर तुम्हाला फक्त तंदुरुस्ती आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी तुपाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही दररोज देशी गायीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे. तुम्ही जेवणात एक चमचा देशी तूप घेऊ शकता. गाईचे तूप चरबी वाढवत नाही परंतु स्नायू वाढण्यास मदत करते. तेव्हा अशांसाठी हे तूप आरोग्यदायी ठरेल.
डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.