True greatness does not come from the desire to be special. Sadhguru explains how moving beyond “What about me?” can expand our perspective, unlock our capabilities and transform the way we live.
sakal
महान होण्याची आकांक्षा ही मुळात अत्यंत क्षुद्र मनातून निर्माण होते. स्वतःला विशेष बनवण्याची आकांक्षा ही नेहमीच एका सामान्य मनाची असते. महान होण्याची किंवा विशेष ठरण्याची आकांक्षा बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जीवनाचे लक्ष आणि व्याप्ती ही ‘तुम्ही कोण आहात’ या चिंतेच्या पलीकडे नेली, जर तुम्ही तुमच्या जीवनातून ‘माझे काय?’ हा एकच हिशेब काढून टाकला, तर तुम्ही आपोआपच एक महान व्यक्ती ठराल. तुम्ही किती महान ठराल आणि समाजात तुम्हाला कितपत मान्यता मिळेल, हे तुमच्या क्षमतांवर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या परिसरात किंवा घरात महान व्यक्ती असू शकता किंवा तुम्ही तुमच्या देशात किंवा जगातही महान व्यक्ती बनू शकता. हे अनेक परिस्थितींवर अवलंबून असते. त्यातील एक घटक म्हणजे परिस्थिती - तुम्ही इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर आहात. कदाचित, अनेक महनीय व्यक्ती आजच्या काळात असत्या, तर आज त्या त्या काळाइतक्या प्रसिद्ध झाल्या नसत्या, कारण त्या वेळी एक विशिष्ट ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झाली होती. योग्य वेळी योग्य प्रकारची चेतना प्रकट झाली आणि गोष्टी घडल्या. ते आजच्या राजकीय परिस्थितीत असते, तर कदाचित निवडूनही आले नसते. त्यांच्याकडे महानता आली ती त्यांनी महान होण्याचा प्रयत्न केला म्हणून नव्हे, तर जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ‘माझे काय?’ या विचाराच्या खूप पलीकडे होता म्हणून.