जपानी मंत्रध्यान

योगाची आवड असणाऱ्या मंडळींमध्ये नेहमीच नवनवीन योगासनं शिकण्याची उत्सुकता असते. ध्यानाच्या बाबतीतही हे घडतं.
yoga
yoga sakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

योगाची आवड असणाऱ्या मंडळींमध्ये नेहमीच नवनवीन योगासनं शिकण्याची उत्सुकता असते. ध्यानाच्या बाबतीतही हे घडतं. खरंतर ध्यानविद्येचे मार्गदर्शन करणाऱ्या जाणकार प्रशिक्षकांचं मत याहून पूर्ण वेगळं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, साधकानं सुरुवातीला नानाप्रकारे केल्या जाणाऱ्या ध्यानपद्धतींच्या बाबतीत जरूर चोखंदळ असावं.

मात्र, एकदा एखाद्या पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर त्यात बदल न करता, वर्षानुवर्षं तोच प्रकार अनुसरत राहावा. त्यात मिळणाऱ्या सूक्ष्म, तरल प्रत्ययांमध्ये अधिकाधिक खोल उतरत राहावं.

भारतात हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी तपाचरण करून सामान्य माणसासाठी ध्यानाच्या नानाविध प्रणाली विकसित केल्या. आशिया खंडातल्या तिबेट, जपान अशा देशातले लामा, बौद्ध धर्मगुरूही याबाबतीत मागे नव्हते. जपानमध्ये ‘नम् म्योहो रेंगे क्यो’ हे ध्यान असंच काहीशे वर्षांपूर्वी उदयाला आलं. आज जपानमधील लाखो साधक या सर्वोत्तम ध्यानाची प्रचिती घेत आहेत. त्याविषयी आज माहिती घेऊया!

शाक्यमुनींनी (म्हणजेच गौतम बुद्ध) बौद्ध साधकांच्या आध्यात्मिक विकासासाठी ‘कमलसूत्र’ (लोटससूत्र) या विचारपद्धतीची रचना केली. काळाच्या ओघात ती मागे पडली. तेराव्या शतकाच्या सुमारास जपानमध्ये अतिशय अशांतता माजली होती. त्यातून लोकांना सावरण्यासाठी निचिकेन गुरूंनी हे ‘कमलसूत्र’ पुनःप्रस्थापित केलं. तीच ही आजच्या काळातली जपानी ‘नम् म्योहो रेंगे क्यो’ मंत्र ध्यान पद्धत म्हणून प्रसिद्ध आहे.

‘नम् म्योहो रेंगे क्यो’ या नामाचा भावार्थ असा आहे : ‘कमळाच्या फुलाचं पावित्र्य, अलिप्तता माझ्या मनात धारण करून, अंतर्नाद अनुभवत मी ही सूक्ष्म ध्यानसाधना करत आहे.’

या नामातल्या शब्दांचे अर्थ असे आहेत : नम् - नमन, म्यो हो - गुप्त अथवा गूढ साधना, रेन् गे - कमळाचं फूल, क्यो - अंतर्नाद.

या प्रत्येक अक्षराचा, शब्दाचा अर्थ मनात धारण करून उच्चरण केल्यामुळे परिणाम अनेक पटींनी वाढतो.

आपल्या ऋषी पतंजलीचं ‘तद् जपस तद् अर्थ भावनम्’ हे सूत्रही हेच सांगतं. (जो मंत्र म्हणायचा, त्याच्या अर्थाची भावना मनात धारण करणं फार महत्त्वाचं आहे) भारतात आपण ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा उच्चार संथ, शांत हळुवार आवाजात, खर्ज स्वरात म्हणत ध्यान करतो. (दोन आठवड्यापूर्वी आपण ते कसं करायचं हे पाहिलंच आहे.)

‘नम् म्योहो रेंगे क्यो’ हा मंत्रही खाली दिल्याप्रमाणे म्हणून ध्यान करावं. ध्यानासाठी बसताना शरीराची स्थिती आरामदायी राहील अशा कोणत्याही आसनात बसावं. ‘नऽम् म्योऽऽहोऽऽऽ रेऽनगेऽऽ क्योऽऽ’ मंत्र म्हणत असताना, संपूर्ण लक्ष मंत्राच्या अर्थावर एकाग्र, केंद्रित करावं. शरीरात कुठेकुठे कंपनं, स्पंदनं निर्माण झाली आहेत, हे अनुभवत राहावं. साधकांच्या स्वभाव, प्रकृती, मनःस्थितीनुसार हा मंत्र किती वेळा म्हणायचा, ती संख्या बदलू शकते. मंत्राचं उच्चारण थांबवल्यावर, शक्य होईल तेवढा वेळ (किमान पाच-सहा मिनिटं तरी) कुठलीही बारीकसारीक हालचालदेखील न करता शांत बसावं.

जपानमध्ये प्राचीन काळापासून या मंत्राचं ध्यान केलं जातं. दार्जिलिंग, नेपाळ, थायलंडच्या दऱ्याखोऱ्यात, जपानमध्ये फिरताना तेथील प्रदेशांनुसार हे नाम घेण्याची रीत (चाल) कशी बदलते हे प्रत्यक्ष अभ्यासण्याची संधी मला मिळाली. एकाग्र होऊन या मंत्राची स्पंदनं अनुभवता येतात. त्यामुळे छातीपासून टाळूपर्यंत सगळं शरीर कंपायमान होत असल्याची अनुभूती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com