Knee Pain : गुडघेदुखीवर उपचार

शरीराचा भार उचलणाऱ्या हालचालींमध्ये गुडघ्याचा सांधा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो
knee pain diagnosis treatment health bone
knee pain diagnosis treatment health bonesakal

डॉ. पराग संचेती

गुडघा हा मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयव असतो. तो सर्वात मोठा सांधा असतो. टीबिया (पायाच्या नडगीचे हाड) फिमर (मांडीचे हाड) तसेच पटेला (गुडघ्याची वाटी) या घटकांचा मिळून गुडघा तयार होतो. शरीराचा भार उचलणाऱ्या हालचालींमध्ये गुडघ्याचा सांधा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो.

चालणे, पळणे, उड्या मारणे अशा हालचालींमध्ये या सांध्यावर भार पडतो. गुंतागुंतीची रचना असणारा हा सांधा असल्याने याला इजा होण्याची शक्यता जास्त असते. अनेक अस्थिबंध एकत्र येऊन सांध्याला आधार दिला जातो.

गुडघ्याचे अस्थिबंध

अस्थिबंध म्हणजे छोटा पट्टीसारखा भाग असतो. कडक जाळीदार तंतूसदृश पेशींनी हा बनतो. अस्थिबंध दोन हाडांना एकत्र जोडते.

हाडांच्या अवतीभवतीसुद्धा त्याचे आवरण असते. दैनंदिन हालचाली करताना सांध्यांना बळकट करण्याचे प्रमुख काम गुडघ्याचे अस्थिबंध करतात.

गुडघ्याच्या सांध्यामध्ये चार प्रमुख अस्थिबंध असतात.

  • एसीएल ः एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट

  • पीसीएल ः पोस्टेरिअर कृशिएट लिगामेंट

  • एमसीएल ः मेडीयल कोलॅट्रल लिगामेंट

  • एलसीएल ः लॅटरल कोलॅट्रल लिगामेंट

अस्थिबंधला इजा होण्याची कारणे

काही वेळेला दैनंदिन कामे करताना पायाच्या हालचालींच्या दिशेत अचानक बदल होतो. हे अस्थिबंधला इजा होण्याचे प्रमुख कारण आहे. उडी मारल्यावर अयोग्य पद्धतीने खाली येणे, गुडघ्यावर थेट मार लागणे ही काही सामान्य कारणे आहे.

उदाहरणार्थ रस्त्याच्या अपघातांमध्ये किंवा फुटबॉल खेळताना गुडघ्यावर थेट आघात होणे. तुमचे स्नायू अशक्त असतील किंवा शरीराच्या अवयवांत समन्वयाचा अभाव असेल तर तुम्हाला गुडघ्याच्या अस्थिबंधला इजा होण्याची शक्यता अधिक आहे.

अस्थिबंधच्या इजेची तीव्रता

गुडघ्याचे अस्थिबंध लचकले किंवा त्याला इजा झाली तर त्याची तीव्रता गुडघ्यावर किती ताण पडला आणि अस्थिबंध किती प्रमाणात चिरले गेले यावर अवलंबून असते. इजेच्या तीव्रतेचे काही विभागात वर्गीकरण केले आहे.

माईल्ड - ग्रेड १

या अवस्थेमध्ये अस्थिबंधावर ताण येतो पण इजा होत नाही.

मॉडरेट ग्रेड – २

या स्थितीत अस्थिबंधच्या काही भागाला इजा पोचते किंवा चीर पडते.

सिव्हिअर ग्रेड - ३

या अवस्थेमध्ये संपूर्ण अस्थिबंधावर परिणाम होतो. अस्थिबंधाला चीर पडते.

एन्टेरिअर कृशिएट लिगामेंट म्हणजे काय? : गुडघ्याच्या चार अस्थिबंधांपैकी हे एक अस्थिबंध आहे. जे गुडघ्याच्या सांध्याला आधार देते. हे अस्थिबंध गुडघ्याचे प्रमुख अस्थिबंध समजले जाते. हे अस्थिबंध नडगीची मांडीपर्यंत पुढच्या दिशेला होणारी अतिरिक्त हालचाल नियंत्रित करते. तसेच सर्व बाजूंनी गुडघ्याला आधार करते.

क्रीडाप्रकारांमुळे होणारी ही इजा जगभरात सामान्य आहे. जगभरात साधारण दोन लाख प्रति वर्ष रुग्ण या दराने पुनर्रचना होऊन ही इजा रुग्णांना होत आहे. महिलांमध्ये साधारण १.४ ते ९.५ पटीने एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटची वाढ झाली आहे, हे निष्कर्ष अभ्यासातून समोर आले आहेत.

इजेची कारणे : क्रीडाप्रकारांमुळे गुडघ्याला होणारी एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटची इजा जगभरात सामान्य आहे. क्रीडाप्रकारांमुळे होणाऱ्या ‘एसीएल’पैकी साधारण ८० टक्के इजा इतर कोणाच्याही संपर्कामुळे होणाऱ्या नसतात.

म्हणजेच इतर कोणताही स्पर्धक या इजांना कारणीभूत नसतो. उदाहरणार्थ, फुटबॉल खेळताना होणारी इजा. उडी मारताना अयोग्य पद्धतीने जमिनीवर येणे किंवा आदळणे, यामुळे एन्टेरिअर कृशिएट लिगामेंटला चीर पडण्याची शक्यता असते. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये या ‘एसीएल’ला इजा पोचते.

एसीएलला इजा झाल्यास निदान करण्याच्या पद्धती : वैद्यकीय पद्धतीने गुडघ्याचे परीक्षण केले जाते. त्यानंतर डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट रुग्णांमध्ये एसीएलला इजा झाल्याची काही लक्षणे आढळतात का, याचे परीक्षण करतात.

याच्या निदानासाठी विशिष्ट चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये एसीएलवर ताण दिला जातो. त्यातून एसीएलला दुखापत झाली आहे का किंवा चीर गेली आहे का हे लक्षात येते. काही रुग्णांना एसीएलला दुखापत झाल्यास निदानासाठी एमआरआय करण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे एसीएलच्या दुखापतीबरोबर आणखी काही हानी असल्यास त्याचेही निदान होते.

(लेखक ‘इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्ट््स मेडिसिन’चे अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com