चांगले छंद : ध्यानाची पूर्वतयारी

ध्यानाविषयी उत्सुकता असणाऱ्यांना, ‘ध्यान म्हणजे नक्की काय?’ हा प्रश्न पडतो. याचं उत्तर एका गोष्टीतून जास्त चांगलं समजेल.
Good hobbies
Good hobbiessakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

ध्यानाविषयी उत्सुकता असणाऱ्यांना, ‘ध्यान म्हणजे नक्की काय?’ हा प्रश्न पडतो. याचं उत्तर एका गोष्टीतून जास्त चांगलं समजेल. पूर्वी राजे-महाराजे राजवाड्यात राहत असत. त्यांना मार्गदर्शन करणारे गुरू, ऋषिमुनी मात्र अरण्यात राहायचे. एक चक्रवर्ती सम्राट आपल्या गुरूंच्या आश्रमात प्रथमच गेला होता. ध्यानविद्येच्या बाबतीत गुरूंचा नावलौकिक होता.

राजा पहिल्यांदाच आलेला असल्यामुळे गुरुजी स्वत: राजाला आश्रमातल्या जागा दाखवत होते. बराच वेळ हा कार्यक्रम चालला होता. राजा मात्र अस्वस्थ होत चालला होता. राजाची ही चलबिचल गुरुजींच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यांनी विचारलं, ‘‘राजा, तू बेचैन दिसतो आहेस. तुला काही विचारायचं आहे का?’’

‘गुरुवर्य, आश्रमात धनुर्विद्या, वेदाध्ययन करण्याच्या जागा पाहून मी प्रसन्न झालो. क्षमा असावी; पण एक ठिकाण दाखवायचं राहून गेलं असावं असं वाटतं. ध्यानविद्येमध्ये आपण पारंगत आहात. या आश्रमातली ‘ध्यान करण्याची सर्वांत सुंदर जागा’ अजून आपण मला दाखवली नाहीत.’ राजाच्या बेचैनीचं कारण ऐकून ऋषींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं.

‘राजा तुझा प्रश्न योग्यच आहे. आश्रमात कृतीतून काही गोष्टी ‘करायच्या’ म्हणून काही जागा निर्माण केलेल्या आहेत, त्या मी तुला दाखवल्या. मात्र ‘शरीरानं, मनानं काहीही न करणं म्हणजे ध्यान’. मग जिथे काहीच केलं जात नाही, ती जागा मी कशी दाखवणार बरं तुला?’ हजारो शब्दांतून ध्यान म्हणजे काय हे सांगून समजलं नसतं.

गुरुजींनी ते एका दॄष्टांतात समजावलं. हे चक्रवर्ती सम्राटाला लक्षात आलं. त्यानं गुरुजींच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं. ही गोष्ट वाचल्यावर, ‘काहीही न करणं म्हणजे ध्यान’ ही व्याख्या नक्कीच लक्षात राहील. मात्र, ‘काहीही न करणं’ ही मन:स्थिती हळूहळूच जमायला लागते.

एकानं मला विचारलं, ‘‘छंद जोपासणं हा ध्यानाचाच प्रकार आहे का? मला बागेला पाणी घालायला आवडतं. एरवी मन पाच दहा मिनिटंही जागेवर बसू देत नाही; पण पाणी घालत असताना, झाडं पाणी पिऊन तॄप्त होतायत, या भावनेनं मन शांत होतं. मग वेगळं ध्यान करायला हवं का?’’ ध्यानाची पूर्वतयारी म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात आपण आपल्या आवडत्या छंदात रममाण होऊन मनाला स्थिर, शांत ठेवू शकतो का, हे पाहणं महत्त्वाचं असतं.

योगाच्या भाषेत बोलायचं, तर चांगल्या छंदात मन रमणं, हे मनाच्या सात्त्विकतेचं लक्षण आहे. ध्यानात आपल्याला अधिकाधिक सात्त्विकतेकडेच जायचं आहे. मन शांत करण्याचा सराव नसेल, तर चांगला छंद जोपासणं हे ध्यानाची पुढची पायरी शिकण्यापूर्वी उपयोगी ठरतं. छंद जोपासल्यानं विचार कमी होतात. यातूनच पुढे ध्यानाचे साधे सोपे प्रकार शिकून मन पूर्णपणे शांत झाल्याचा अनुभव घेता येईल.

काही काळानं मन निर्विचार स्थितीतही जाऊ लागेल. त्यामुळे, छंद जोपासणं आवश्यक आहे. एका अर्थाने ती ध्यानाची पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या आधारानं मन शांत करून मग ध्यानाला सुरुवात करणं हे उपयुक्त ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com