रामरक्षा अवयव ध्यान

सध्या सगळीकडे अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार, व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांच्या मनावर ताण आहे. या सर्वांसाठी योगाभ्यासातलं ‘रामरक्षा अवयव ध्यान’ उपयोगी ठरतं.
ramraksha avayav dhyan
ramraksha avayav dhyansakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

सध्या सगळीकडे अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार, व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांच्या मनावर ताण आहे. या सर्वांसाठी योगाभ्यासातलं ‘रामरक्षा अवयव ध्यान’ उपयोगी ठरतं.

‘प्रभू श्रीराम’ सगळ्यांचं आवडतं दैवत. बुधकौशिक ऋषींच्या सुंदर रचनेतून चौथ्या श्‍लोकापासून नवव्या श्‍लोकापर्यंत रामरायांनी डोक्यापासून पायापर्यंत (आपादमस्तक) सर्व अवयवांचं रक्षण करावं,  अशी प्रार्थना केलेली आहे.

रा आणि म ही अक्षरं, 'रॉं' या अग्निबीजापासून निर्माण झालेली आहेत. रॉं या उच्चारामुळे शरीरातल्या नाभीचक्राला (सूर्याचं स्थान) प्रेरणा, चेतना मिळते. नाभीचक्राचा (मणिपूरचक्र) बीजमंत्र 'रं' आहे.

हे ध्यान कसं करायचं? : सहजस्थितीत बसावं. शरीर शिथिल, श्वसन संथ, मन शांत झालंय अशी जाणीव निर्माण करावी. ‘रामरक्षेतली अवयव ध्यान संकल्पना मी अनुभवणार आहे’ हा भाव धारण करावा.

एकवीस  अवयवांचं रक्षण करण्याची प्रार्थना रामाला केलेली  आहे. प्रत्येक  अवयवासाठी विशेषण असलेलं  रामनाम, रामायणातील घटना यांचा अनुक्रम आहे. श्‍लोक, अर्थ आणि त्या अवयवाचं ध्यान अशा क्रमाने एकेका अवयवाला मनाने स्पर्श करावा.

शिरो मे राघवः पातु : रघूकुळात उत्पन्न झालेल्या श्रीरामप्रभूंनी माझ्या मस्तकाचे रक्षण करावे.

भालं दशरथात्मजः : दशरथपुत्र कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु : कौसल्यापुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो.

विश्वामित्रप्रियः श्रुती। : विश्वामित्रांनी ‘श्रुती’द्वारे (कान) रामावर विद्यासंस्कार केले. विश्वामित्रांना प्रिय असलेले श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करोत.

घ्राणं पातु मखत्राता : मख म्हणजे यज्ञ, त्राता म्हणजे रक्षण करणारा. यज्ञाचे (मख) रक्षण (त्राता) करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत.

मुखं सौमित्रिवत्सलः॥ : सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे ते श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करोत.

जिव्हां विद्यानिधिः पातु : जीभेच्या टोकावर विद्येचं भांडार असलेले  राम माझ्या जिभेचे रक्षण करोत.

कण्ठं भरतवन्दितः। : भरताला वंदनीय राम माझ्या कंठाचे रक्षण करोत.

स्कन्धौ दिव्यायुधः पातु : दिव्य शस्त्रास्त्रे खांद्यांवर असलेले श्रीराम माझ्या खांद्यांचे रक्षण करोत.

भुजौ भग्नेशकार्मुकः॥ : दिव्य हातांनी शिवधनुष्याचा भंग करणारे श्रीराम (भग्न- भंग करणे, ईश– शंकर, कार्मुक– धनुष्य) माझ्या हातांचे रक्षण करोत.

करौ सीतापतिः पातु : सीतेचे रक्षण करणारे (पती) माझ्या हातांचे रक्षण करोत.

हृदयं जामदग्न्यजित्। : जमदग्निपुत्र परशुरामाला जिंकणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करोत.

मध्यं पातु खरध्वंसी : खर राक्षसाचा विध्वंस करणारे राम माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत.

नाभिं जाम्बवदाश्रयः॥ : जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत.

सुग्रीवेशः कटी पातु : सुग्रीवाचे देव माझ्या कंबरेचे रक्षण करोत.

सक्थिनी हनुमत्प्रभुः। : हनुमंताचे प्रभू दोन्ही जांघांचे रक्षण करोत.

ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ : राक्षसकुळांचा नाश करणारे, रघुकुळातले उत्तमपुरुष राम माझ्या मांड्यांचे रक्षण करोत.

जानुनी सेतुकृत् पातु : सेतू बांधणारे श्रीराम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत.

जङ्घे दशमुखान्तकः। : दहा तोंडी रावणाचा अंत करणारे श्रीराम दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण करोत.

पादौ बिभीषणश्रीदः : बिभीषणाला राज्य, संपत्ती देणारे श्रीराम माझ्या पावलांचे रक्षण करोत.

पातु रामोऽखिलं वपुः॥ : श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत.

विद्यार्थ्यांना झोपेत दचकणं, सतत आजारपण असे त्रास असतील, तर या ध्यानाचे श्लोक रोज ऐकवावेत. श्लोक मनात म्हणताना लक्ष एकेका अवयवावर एकाग्र होतं. ध्यानाची स्थिती निर्माण होते. मन निर्विचार व्हायला लागतं. ध्यानसरावानं मनातली भीती निघून जाते. मन निरभ्र आकाशासारखं हलकं, प्रसन्न होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com