
डॉ. मालविका तांबे
झोप ही निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. जोपर्यंत झोप व्यवस्थित व शांत व लागते तोपर्यंत तिची किंमत केली जात नाही. रात्र झाली, दमणूक झाली, मस्त पोटभर जेवण झाले की आपण छान गादीवर जाऊन पडतो व झोपतो, झोप पूर्ण झाली की उठतो. पण हीच झोप इच्छा असेल तेव्हा येत नसली, आली तरी अशांत असली तर तिचे महत्त्व लक्षात यायला लागते.
आयुर्वेदात झोपेला एवढे महत्त्व दिलेले आहे की आरोग्याच्या तीन मुख्य आधारांपैकी झोप एक आहे असे सांगितलेले आहे. आरोग्य सांभाळण्यासाठी आहारासारखीच तिची काळजी घेतली पाहिजे असे सांगितलेले आहे. त्यामुळे झोप काय असते कशी येते, तिचे आरोग्यासाठी काय फायदे असतात, झोपण्याचे काय नियम असतात, हे एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेतले तर जास्त उत्तम होईल. आचार्य चरकांच्या मतानुसार निद्रा ही एक अशी अवस्था आहे जेथे मन संपूर्णपणे इंद्रियांपासून वेगळे झालेले असते. आचार्य वाग्भटांच्या मतानुसार जेव्हा कफ व तमोदोष आपल्या सर्व स्रोतसांना आवृत्त करतात किंवा आपली इंद्रिये दमून गेलेली असतात, तेव्हा निद्रा येते.