सोहम ध्यान

‘सोहम’ शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती नसतो. त्यामुळे ‘हे ध्यान मला शक्य नाही’ अशी ठाम समजूत निर्माण होते. प्रत्येक माणसाला ‘सोहम’चं अस्तित्व अनुभवण्याची सोय निसर्गाने अगदी सहजसोपी करून ठेवली आहे.
soham meditation
soham meditation Sakal

- मनोज पटवर्धन

‘सोहम’ शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती नसतो. त्यामुळे ‘हे ध्यान मला शक्य नाही’ अशी ठाम समजूत निर्माण होते. प्रत्येक माणसाला ‘सोहम’चं अस्तित्व अनुभवण्याची सोय निसर्गाने अगदी सहजसोपी करून ठेवली आहे.

कसं करायचं ‘सोहम ध्यान’?

जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात काही प्रश्न हे कधीतरी येऊन जातात. ‘मी नक्की कोण आहे? कुठून आलो? कुठे जाणार?’ श्रुतींनी (वेद, उपनिषदं) या प्रश्नावलीला, शोधाला ‘स: + अहम् = सोहम’ म्हणजेच ‘ते (ईश्वरीतत्त्व) मी आहे’ असं उत्तर दिलेलं आहे.

योगसाधनेचा अत्युच्च पातळीचा अनुभव ब्राह्ममुहूर्तावर (पहाटे साडेतीन) मिळतो. अर्थात ही साधना इतर कोणत्याही वेळी केली, तरी हा अनुभव काही प्रमाणात मिळेलच. मात्र, आपल्याला जेवढं शक्य आहे, तेवढं सकाळी लवकर उठावं. या वेळेला आपण अगदी एकटे, पूर्णपणे स्वतःचे असतो.

  • मांडी घालून बसावं.

  • शरीर शिथिल सोडावं.

  • श्वसन संथ होऊ द्यावं.

  • शरीराची शिथिलता, श्वसनाची संथता साधली, की मन आपोआपच शांत होतं.

मन निश्चल, शांत करण्याचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात तुमचा श्वासोच्छ्वास संथ व्हायला लागेल. या क्रियेकडे लक्ष द्या. श्वसनाची क्रिया नैसर्गिकरीत्या चालूच असते. या क्रियेकडे पाहताना तिच्यावर अनुसंधान (त्या क्रियेबरोबर राहणं) करणाऱ्याला अखंड, सूक्ष्म ध्वनीचा प्रत्यय येतो. श्वास आत घेताना ‘सो’ आणि बाहेर सोडताना ‘हं’ असा (सुस्कारा सोडल्यासारखा) ध्वनी जाणवतो.

सोऽऽऽऽहम्

श्वासोच्छ्वासाची तालबद्ध, लयबद्ध क्रिया आणि तिच्याबरोबर होणारा हा अखंड सूक्ष्म ध्वनी यांच्याशी एकतानता साधल्यावर, तो सतत चालणारा ध्वनी ‘सोहं’ आहे हे कळून यायला वेळ लागत नाही. व्यक्तीची बाहेरच्या विश्वाशी साधली जाणारी समरसता म्हणजेच आपलं श्वासोच्छ्वासमय जीवन.

‘सोहं’ हा नैसर्गिक सूक्ष्म ध्वनी आपल्याला जाणवतो, त्याचा अर्थ ‘तो मी आहे’. ‘तो’ कोण? याचं ज्ञान व दर्शन दोन्हीही त्यातच सामावलेलं आहे.

श्वासोच्छ्वासाच्या प्रत्येक क्रियेबरोबर ‘अनंत अशा ईश्वरी तत्त्वाचं सुश्राव्य, नादरूप दर्शन घडत राहावं’ हीच त्या निर्मिती-निपुण निसर्गाची योजना आहे.

‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी म्हण आहे. एखादी ‘अमूल्य गोष्ट’ आपल्या अगदी जवळ असल्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं. ‘स’ आणि ‘हं’ यांच्या संयोगात विराजमान असलेला ‘तो’ म्हणजे ‘ॐ’ आहे. ‘ॐ’ अक्षराला आलेलं महत्त्व हे बुद्धिमानांच्या तत्त्वचिंतनांतून निर्माण झालेलं नाही. ते उपजत, नैसर्गिकच आहे. मानवाच्या करंटेपणामुळे त्याला स्वतःजवळच असलेला हा ‘आत्मरूपाचा ठेवा’ दिसत नाही. उलट त्याच्या शोधासाठी, बोधासाठी तो जीवनभर वणवण फिरत रहातो.

‘ॐ’ या प्रतीकरूप आत्मरूपाचं, परब्रह्माचं सम्यक ज्ञान हीच ती ‘सोऽहम’ सिद्धी.

मनात निर्माण झालेल्या या प्रश्नाचा एरवी बुद्धीच्या मार्गानेच शोध घेतला जातो. बुद्धीला हे उत्तर पटलं, तरी समाधानकारक वाटत नाही. या बुद्धीच्याही पलीकडे, आकलनाची, जाणिवेची जी पातळी आहे, तिला योगशास्त्रानं ‘प्रज्ञा’ असं नाव दिलं आहे. ध्यानाच्या माध्यमातून सोहमचा बोध हा त्या प्रज्ञेमध्ये मुरतो, विस्तारतो. हा बोध एकदा प्रज्ञेत मुरला, ठसला, की साधकाच्या मनात उलटसुलट विचार, गोंधळ निर्माण होत नाहीत.

‘सोहम’च्या अर्थाची जाणीव मनात निर्माण करत ध्यान करावं. त्यामुळे हा भाव प्रत्येक पेशीच्या जाणिवेत खोलपणे मुरतो. या ध्यानाच्या सरावामुळे, आपलं मन आपल्या खऱ्याखुऱ्या अस्तित्वाविषयी अधिकाधिक सूक्ष्म, तरल, सखोल, जाणीवक्षम होत जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com