आरोग्यासाठी आवश्यक ताकद

भारतीय परंपरेत जीवनमूल्यांना खूपच महत्त्व दिले आहे. नुसते जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर जीवनमूल्यांना जपत, जीवन सुशोभित करून, जीवन एक उत्सव समजून जगण्याचा आनंद घेणे हेच खरे ‘जीवन’.
Strength required for health
Strength required for healthsakal

भारतीय परंपरेत जीवनमूल्यांना खूपच महत्त्व दिले आहे. नुसते जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर जीवनमूल्यांना जपत, जीवन सुशोभित करून, जीवन एक उत्सव समजून जगण्याचा आनंद घेणे हेच खरे ‘जीवन’. अर्थात आसुरी आनंद व सात्त्विक आनंद असे आनंदाचे प्रकारही असू शकतात.

परंतु उच्च अभिरुची, संस्कृती व निर्भेळ सृजनात्मक आनंद ही कल्पना अभिप्रेत असलेला आनंद म्हणजे त्या जीवनाचे सत्त्व. म्हणून आपण सर्व वस्तूंत जीवनसत्त्व शोधतो. वस्तूतील वीर्य-ओज हेच त्यातले खरे जीवन-सत्त्व आहे. प्रत्येक वस्तूत उपलब्ध असलेल्या वीर्यावर त्या वस्तूचे श्रेष्ठत्व व किंमत ठरत असते.

एखाद्या वेळी एखाद्या कामासाठी मनाची तयारी झाली की, शरीरात एक प्रकारचा उत्साह संचारतो. मनाची एवढी ताकद निश्र्चितच असते. किंबहुना प्रसन्न मन हे सर्वांत मोठे ताकदीचे औषध आहे. परंतु त्याबरोबरीने शारीरिक तयारी नसली किंवा तेवढी ताकद शारीरिक पातळीवर नसली तर मग उत्साह टिकून राहत नाही, पुढे पुढे कायमच निरुत्साही स्वभाव बनायला लागतो आणि मग उत्साह व ताकद वाढवण्याच्या मागे सारखे धावावे लागते.

छान आकर्षक वाटले तरी ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ म्हणतात. काही द्रव्यघटक असे असतात की, जे शरीराला तात्पुरते प्रोत्साहन देतात, तात्पुरती ताकद एकवटतात. नशेत असलेला मनुष्य भलताच शौर्याचा आव आणून बोलू लागतो तसेच काहीसे याबाबतीतही होते. तथापि थोड्याशा कालावधीपुरता उत्साह म्हणजे काही खरी ताकद व खरी शक्ती नव्हे.

उत्साह सतत असावा व मनोधारणा तशी असावी. शारीरिक आरोग्य व स्फूर्ती असेल त्यावेळी मनाचाही उत्साह असतो व आनंद घेण्याची क्षमता वाढलेली असते. तसेच मन ज्यावेळी प्रसन्न किंवा आनंदी असते त्यावेळी ते शरीरामध्ये स्फूर्ती वाढवण्याचे काम करते, हेही आपल्या सर्वांच्याच अनुभवाचे आहे.

अनुत्साह प्रत्येक वेळी मानसिक पातळीवरच असतो असे नाही तर तो शारीरिक अशक्तपणामुळेही प्रतीत होऊ शकतो. अशक्तपणा कुठल्या धातूत, कुठल्या मर्यादेत आहे व कुठल्या कामासाठी आहे याचा विचार आयुर्वेद करतो. एखाद्या पहिलवानाशी कुस्ती खेळ, असे म्हटल्यानंतर माझ्यात एवढी ताकद नाही असे एखादा मनुष्य जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच्यात ताकदच नाही असा अर्थ नसतो, तर ज्याच्याशी कुस्ती करायची त्याच्या ताकदीच्या तुलनेत ताकद नाही व त्या कलेचे ज्ञान नाही असे त्याला म्हणायचे असते.

अशक्तपणा कसला आहे, कुठल्या धातूचा आहे, रसधातूचा, रक्तधातूचा की वीर्यधातूचा हे अभ्यासून आयुर्वेदात उपाय सुचवलेला असतो. रसधातू हा पहिला धातू सर्व अवयवांना तृप्ती देण्याचे काम करतो. झाडाच्या मुळाला व्यवस्थित पाणी मिळाले की जसे संपूर्ण झाड बहरते, झळाळते तसेच रसधातूची ताकद वाढली की सर्व शरीर रसरशीत होते.

रसधातू अशक्त झाला तर त्वचा कोरडी पडते, घशाला कोरड पडते, श्रम सहन होत नाहीत, आवाज सहन होईनासा होतो. अशा वेळी दूध, सर्व प्रकारच्या फळांचा रस, ताजी द्राक्षे, शहाळ्याचे पाणी, लाह्यांचे पाणी या गोष्टी तसेच कोरफड, सारिवा, कमळ, अभ्रकभस्म वगैरे औषधे रसधातूसाठी टॉनिकरूप असतात.

रक्तधातू हा दुसरा धातू, जो साक्षात प्राणाचे स्थान असून त्वचेच्या आरोग्यासाठी निरोगी असावा लागतो. अशक्त रक्तधातुमुळे त्वचा फिकट निस्तेज होते, छातीत धडधडते, चक्कर येते, भूक लागत नाही. यावर सुके अंजीर, खजूर व तूप, काळ्या मनुका, सफरचंद, केशर वगैरे गोष्टी तसेच केशर, आमलकी, गुडूची, मंडूर भस्म वगैरे द्रव्ये रक्तधातूसाठी टॉनिकस्वरूप असतात.

मांसधातू हा सर्व हालचालींसाठी व शरीरबांध्यासाठी आवश्‍यक धातू असतो व तो अशक्त झाला तर वजन उतरते, गाल बसतात, हाडे दिसायला लागतात, गळून जायला होते. लोणी, खजूर-तूप, खारीक-दूध, काजू, गोडांबी, तसेच अश्‍वगंधा, शतावरी, गोक्षुर, बला अशा वनस्पती या धातूसाठी टॉनिकप्रमाणे असतात. वजन वाढवण्यासाठी कपभर दुधात चमचाभर खारकेची पूड, खडीसाखर व अर्धा कप पाणी टाकावे व पाणी उडून जाईपर्यंत उकळून नंतर प्यावे. याने अंग धरते, स्टॅमिना वाढतो.

मेदधातू शरीराला उचित प्रमाणात स्निग्धता देण्याचे तसेच शरीरबांधा प्रमाणबद्ध ठेवण्याचे काम करत असतो. हा धातू अशक्त झाला तर अंग कोरडे होते, स्निग्धता कमी झाल्याने सांधे दुखू लागतात, फारसे परिश्रम न करताही थकायला होते, डोळे निस्तेज होतात. दूध, खवा, पनीर, लोणी वगैरे गोष्टी मेदधातूसाठी टॉनिकप्रमाणे काम करतात तर कांचनार, खदिर, किराततिक्त वगैरे वनस्पती मेदधातू प्रमाणात ठेवण्यास मदत करतात.

अस्थीधातू शरीराचा साचा तयार करत असून उंची व एकंदर शरीराची ठेवण अस्थींवर अवलंबून असते. हा धातू अशक्त झाला तर हाडे ठिसूळ होतात, दुखतात, दातांची झीज होते, नखे तुटतात, केस गळतात. खारीक, बाभूळ तसेच धावड्याचा डिंक, नाचणीसत्त्व, दूध वगैरे द्रव्ये तसेच अर्जुन, गुग्गुळ, प्रवाळभस्म, मोतीभस्म वगैरे गोष्टी अस्थीधातूला टॉनिकप्रमाणे असतात.

मज्जाधातूमुळे मेंदू, मेरुदंड व संपूर्ण शरीरातील संवेदना ग्रहण करणाऱ्या चेतातंतूंचे कार्य घडत असते. व त्याच्या अशक्ततेमुळे हाडे-सांधे दुखतात, तुटतात, शुक्रक्षय होतो, दौर्बल्य प्रतीत होते. अक्रोड, तीळ, पंचामृत, भिजवलेले बदाम, जर्दाळू, तूप, चांदीचा वर्ख व रौप्य भस्म या गोष्टी मज्जाधातूसाठी टॉनिक आहेत.

सर्व धातूंमधील शेवटचा शुक्रधातू, जो पुनरुत्पादनास, झीज भरून काढण्यास समर्थ असतो, हा धातू अशक्त झाला तर निस्तेजता, म्लानता येते, सर्व अंग ढिले पडते, श्रम न करताही थकवा जाणवतो, पुनरुत्पादन शक्ती राहत नाही, मैथुनाची इच्छा होत नाही, जीवनातला जणू रसच नाहीसा होतो.

त्यासाठी दूध, तूप, पंचामृत, तसेच शतावरी, विदारीकंद, गोक्षुर, कपिकच्छू, सुवर्ण वर्ख, सुवर्ण भस्म वगैरे गोष्टी शुक्रधातूवर टॉनिकप्रमाणे कार्य करतात. रोज सकाळी ताजे बनवलेले पंचामृत घेणे हेही शुक्रधातूसाठी एक उत्तम आयुर्वेदिक टॉनिक आहे.

यामुळे हृदय, मेंदूसारख्या अतिमहत्त्वाच्या (व्हायटल) अवयवांना ताकद मिळते; बुद्धी-मेधा, प्रज्ञा वाढते; त्वचा उजळते; डोळे, नाक, कान वगैरे सर्व इंद्रियांची कार्यक्षमता वाढते; उत्साह वाढतो; वीर्यशक्ती, शुक्रशक्ती वाढते; गर्भधारणेस मदत होते; रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच लहान मुले, नवदांपत्ये, तरुण, वृद्ध अशा सर्वांनीच पंचामृत घेणे चांगले असते.

एक गोष्ट निश्‍चितच की मनुष्य सर्वांबरोबर राहणारा, मिळून मिसळून वागणारा, सर्वांच्या आनंदात-दुःखात सहभागी होणारा असल्यामुळे त्याला समाजाची, आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्यावीच लागते. जरासे बरे वाटत नाही किंवा आज थकलोय, या कारणाने एखादी गोष्ट टाळताही येत नाही, पण त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल अशी कुठलीतरी गोळी, औषधे वा व्हिटॅमिन्स न घेणेच बरे.

त्यासाठीही आयुर्वेदाने बरेच उपाय सुचवले आहेत की, ज्यामुळे त्यावेळेचे काम तर भागेलच पण शरीराचे नुकसान न होता आरोग्यप्राप्ती होऊन आपल्याला अन्नातील सत्त्वांची, मिळणाऱ्या उत्साहाची जाणीव पूर्णतः मिळून सात्त्विक जीवनाची वाटचालही चांगली होईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com