
Childhood Arthritis : बालकांची कार्यक्षमता कमी करणारा संधिवात बरा होतो का ?
मुंबई : आर्थरायटिस म्हणजेच संधिवात हा आजार ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने होत असल्याचे आढळले आहे. परंतु बालकांमध्येही आर्थरायटिस होत असून याबाबत मात्र अनेक समज-गैरसमज आहेत. याविषयी सांगत आहेत मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या हाडांच्या विभागाचे प्रमुख डॉ. दीपक गौतम.
आर्थरायटिस म्हणजे काय ?
आर्थरायटिस म्हणजे सांध्यात येणारी सूज अथवा होणाऱ्या वेदना. हा आजार म्हणजे सांध्याशी निगडित असलेल्या अनेक आजारांशी जोडलेला आहे. ऑस्टिओआर्थरायटिस हा प्रामुख्याने आढळणारा आर्थरायटिसचा प्रकार असून वयानुसार होणाऱ्या सांध्याच्या झीजेमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींमध्ये आढळतो.
परंतु आर्थरायटिस हा फक्त वयस्कर व्यक्तींमध्ये होतो हा गैरसमज आहे. बालकांनाही आर्थरायटिस होऊ शकतो आणि याचे प्रमाणही जास्त आहे. बालकांमधील आर्थरायटिसला ज्युवेनाईल आयडिओपॅथिक किंवा चाईल्डहूड आर्थरायटिस असे म्हटले जाते.
बालकांमध्ये आढळणारा आर्थरायटिस हा शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शरीरातील पेशी आणि ऊतींवर उलट परिणाम करायला लागल्यामुळे होतो. काही जणांमध्ये अनुवंशिकतेनेही होतो. प्रत्येक देशानुसार बालकांमधील आर्थरायटिसचे प्रमाण दर लाखांमध्ये २३ ते १.०६ इतके आहे. अमेरिकेमध्ये एक हजार बालकांमध्ये एका बालकाला आर्थरायटिस होत असल्याचे आढळले आहे. हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
हेही वाचा: Arthritis : मान, कंंबर, खांदे, गुडघे यांतील वेदनेमुळे येऊ शकतो heart attack
बालकांमध्ये या आजाराचे महत्त्व
बालकांमधील आर्थरायटिसच्या लक्षणांकडे वेळेत लक्ष न दिल्यास सांधे निकामी होणे किंवा सांध्यांची वाढ नीट न होणे असे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुले जसजशी वाढत जातात, तसतसे हाडांची लांबी देखील वाढते. याचा परिणाम सांध्यावरही होत असतो.
बालकांमधील आर्थरायटिसचे वेळेत निदान आणि उपचार न केल्यास या आजाराची तीव्रता वाढून सांध्यांना कायमची दुखापत होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त मुलांच्या हाडांची वाढीमध्ये अडथळे येणे आणि सांध्याची कार्यक्षमता कमी होण्याचीही धोका असतो.
बालकांमध्ये हा आजार काही महिन्यापासून ते काही वर्षापर्यत अस मर्यादित काळापुरता असतो. काही जणांमध्ये आयुष्यभऱही हा आजार राहू शकतो. बालकांमधील या आजाराबाबत पुरेशी जनजागृती नसल्यामुळे वेळेत निदान केले जात नाही. बहुतांश वेळा मुले मोठी झाल्यावर म्हणजे १८ वर्षानंतरच याचे निदान होते.
हेही वाचा: Joint Pain : हिवाळ्यात वृद्धांना का जाणवते सांधेदुखी ? अशी असतात लक्षणे
लक्षणे
बालकांमध्ये आर्थरायटिसची लक्षणे गुडघा, घोटा आणि कंबरेच्या दुखण्यापासून सुरू होतात. तीव्र वेदना, सूज किंवा आखडणे ही या आजाराची सुरुवातीची काही लक्षणे आहेत. १६ वर्षाखालील बालकांमध्ये एकापेक्षा जास्त सांध्यामध्ये सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने तपासण्या करून घ्याव्यात. शरीराच्या सांध्याच्या प्रकारानुसार बालकांमधील आर्थरायटिसचे विविध प्रकार आहेत.
बालके यातून बरी होतात का ?
हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा नाही. परंतु याचे वेळेत निदान झाल्यास तीव्रता निश्चितच कमी करता येते. अत्याधुनिक औषधे आणि उपचारांमुळे हा आजार नियंत्रणात ठेवणे, याची वाढ होऊ न देणे शक्य आहे.
उपचारामध्ये प्रामुख्याने तीव्र वेदना कमी करणे, सूज कमी करणे, सांध्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि सांध्यांना होणारी इजा कमी होण्यास प्रतिबंध करणे यावर भर दिला जातो.
विकसनशील देशांमध्ये बालकांमधील आर्थरायटिसचे निदान खूप उशिरा केले जाते, तोपर्यत आजाराची तीव्रता आणि सांध्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली असते. बहुतांश वेळा सांध्यांमध्ये संसर्ग झाल्याचे निदान करून उपचार केले जातात. परंतु बराच काळाने आर्थरायटिस असल्याचे निदान होते.
त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमधील अगदी २० ते ३० वर्षांतील व्यक्तींमध्ये सांधे रोपणाच्या शस्त्रक्रिया होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे बालकांमध्ये गंभीर स्वरुपाचा आर्थराटिस होणे टाळण्यासाठी वेळेत निदान आणि उपचार करण्याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.