TB Patient : लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TB
TB Patient : लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण

TB Patient: लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण

मुंबई : कोविड संसर्गाच्या काळात अन्य रुग्णांची संख्या काही प्रमाण घटल्याचे दिसून आले. मात्र मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत राबवलेल्या विशेष उपक्रमामध्ये लॉकडाऊनदरम्यान जवळपास ४३ हजार ४६४ क्षयरोग झालेल्या रुग्णांचे निदान झाले आहे. कोविड काळात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून टेलि-कन्सलटेशनद्वारे सल्लामसलत, वारंवार पाठपुरावा करणे यांसारख्या विशेष उपक्रमांमुळे क्षयरोग बाधितांचा शोध घेतला. त्यात क्षयरोग असलेल्या रुग्णांचे निदान झाले.

महापालिकेतर्फे सर्व क्षयरोग संशयितांसाठी १३६ सूक्ष्मदर्शी केंद्रे, २८ सिबीनॅट (जीनएक्सपर्ट) केंद्रे व ४० सिबीनेंट मशिन, ५ कल्चर डीएसटी प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान करण्यात येते. वाडिया रुग्णालय व टाटा रुग्णालय येथे खासगी लॅबद्वारे सिबीनेंट चाचणी करण्यात येते. याशिवाय सीएसआर अंतर्गत प्राप्त झालेल्या पाच मशीन कार्यरत आहेत. कस्तुरबा रुग्णालय, केईएम कल्चर आणि डीएसटी प्रयोगशाळा कार्यरत असून जीटीबी रुग्णालय येथे कल्चर आणि डीएसटी प्रयोगशाळा लवकरच कार्यरत होणार आहे. (TB Patient: 43,000 new TB patients during lockdown)

हेही वाचा: मुंबईतील क्षयरोग हद्दपार करण्यासाठी महानगरपालिकेचा करार

क्षयरोगाची लक्षणे-

सक्रिय क्षयरोगाची लक्षणांमध्ये दोन आठवड्यांचा खोकला, एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त असलेला ताप, बेडक्यामध्ये/थुंकीमध्ये कधीही रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, रात्री घाम येणे, छातीत दुखणे, सूज व गाठी येणे याचा समावेश आहे.

दोन नवीन औषधे-

गेल्या ३० वर्षांनंतर दोन नवीन औषधे क्षयरोग आजारातून क्षयमुक्त करण्याकरीता बेडाक्युलीन आणि डीलामीनाईड ही औषधे मुंबईत उपलब्ध करण्यात आली आहेत. ही औषधे विनामूल्य उपलब्ध असून आतापर्यंत ७२२७ रुग्णांना बेडाक्युलीन व ६१७ रुग्णांना डीलामीनाईड औषधे देण्यात आली आहेत.

हेही वाचा: कोरोना काळात क्षयरोग प्रसाराला लगाम!

क्षयरोगावरील उपचार-

औषध संवेदनशील क्षयरुग्णांना मुंबईतील सुमारे १८६ महापालिका दवाखाने, २११ आरोग्य केंद्रे, सर्वसाधारण रुग्णालये व महाविद्यालये येथे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत एफडीसी स्वरूपात ६ महिने मोफत सुविधा दिली जाते. रुग्णांना मुंबई शहरामध्ये सुरू केलेल्या सुमारे २२ औषध प्रतिरोधी उपचार केंद्रामार्फत सर्व चाचण्या झाल्यावर उपचार सुरू करण्याचा सल्ला श्वसन व क्षयरोग विशेषज्ञामार्फत दिला जातो. सर्व चाचण्या व औषधे पूर्ण कालावधीकरीता विनामूल्य दिले जातात. एम.डी.आर बाल क्षयरुग्णांसाठी वाडिया बाल रुग्णालय व जेजे रुग्णालय येथे विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे बाल क्षयरुग्णांसाठी उपचार सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय हिंदुजा रुग्णालय येथे खासगी क्षय रुग्णांकरीता डीआर टीबी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्वोदय रुग्णालय, सोमय्या रुग्णालय, युनिसन डीआर टीवी ओपीडी व डॉ. फॉर यु येथे खासगी औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Tb Patient 43000 New Tb Patients During Lockdown

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top