आयुष्यातील गोडवा

गोडवा, माधुर्य, मिठास, गोडपणा ही विशेषणे आपण फक्त पक्वानांनाच नव्हे तर साहित्य, व्यक्ती, व्यवहारात लागणाऱ्या गोष्टी तसेच आयुष्यातील अनेक विषयांना वापरतो.
sweetness of life
sweetness of lifesakal

- डॉ. मालविका तांबे

गोडवा, माधुर्य, मिठास, गोडपणा ही विशेषणे आपण फक्त पक्वानांनाच नव्हे तर साहित्य, व्यक्ती, व्यवहारात लागणाऱ्या गोष्टी तसेच आयुष्यातील अनेक विषयांना वापरतो. कारण गोडवा आपल्या अनुभवाशी जोडलेला असतो. कुणालाही विचारा की अनुभव गोड हवा की कडू? तर अनुभव गोड हवा आहे, असे सगळेच म्हणतील.

आयुर्वेदात मधुर रस अर्थात हा एक चवीचा प्रकार सांगितलेला आहे. मुळात मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त व कषाय अशा सहा प्रकारच्या चवी असतात. मधुर रसाला स्वादू असेही म्हटलेले आहे. म्हणजेच आपण एखादी गोष्ट स्वादिष्ट आहे, असे म्हणतो तेव्हा तिच्यात मधुर रसाचे प्राधान्य असण्याची शक्यता जास्त असते. एवढेच नव्हे तर मधुर रसात सर्वांत जास्त ऊर्जा असते, सगळ्यांत कमी ऊर्जा कषाय रसात असते असे सांगितलेले आहे.

खरे पाहिले तर संपूर्ण आयुष्य ऊर्जेच्या आदान-प्रदानावर टिकलेले आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक ऊर्जा हवी असते व ती येते या गोडव्यातूनच. कुठलाही महत्त्वाचा सण-समारंभ असला किंवा कुणाचा तेरावा असला तरी गोड करणे ही आपल्याकडची परंपरा आहे. परंतु सध्या हा गोडवा आपल्याला पचत नाही. साखर खाल्ली की लगेच रक्तातील साखर वाढते, मधुमेह होतो. कुणी आपल्याशी गोड बोलले तर आपल्याला वाटते की, ‘अरे बाप रे, याला माझ्याकडून काय हवे आहे की, हा माझ्याशी एवढे चांगले वागत आहे.’

आधी गोडवा काय आहे हे आपण समजून घेऊ या. मधुर रस हा फक्त साखरेचाच असतो असे नव्हे. मधुर रस खाल्ला की, जिभेला स्वाद चांगला येतो तसेच आपल्या शरीराला व इंद्रियांना एक तृप्तीची भावना मिळते. उदा. आपल्या रोजच्या जेवणातील, भात, दूध, तूप, मूग, गहू, खोबरे, ज्वारी, बाजरी, जव, गोड फळे वगैरे सर्व गोष्टी मधुर रसात मोडतात.

तसेच गोड लागणाऱ्या डाळिंबात आंबट रसाचे प्राधान्य असते तर आंबट चवीचा आवळा पंचरसयुक्त असतो. म्हणून आवळा मिठाबरोबर खाल्ला की सहाही रस एकदम मिळतात. या सगळ्या रसांची आपल्या शरीराला व्यवस्थित पूर्तता व्हावी आणि ती बरोबर मात्रेत व्हावी यासाठी आपल्याकडे जेवणात भात-वरण-तूप, आमटी, भाजी, कोशिंबीर, चटणी, ताक, दही वगैरे पदार्थ खायची पद्धत आहे.

मधुर रस हा पृथ्वी व जल महाभूतापासून तयार झालेला असतो. दोषांवरचा परिणाम पाहिला तर वात व पित्त या दोन्ही दोषांचे शमन करायला मधुर रस मदत करतो. मधुर रस स्निग्ध, शीत, गुरू असतो. शरीरातील कुठल्याही चयापचय क्रियेमध्ये, जेथे आपल्याला नवीन ऊती (tissues) तयार होतात, तेथे मधुर रस वापरणे अपेक्षित आहे.

मी केवळ लवण रस म्हणजे मीठ खाऊन किंवा केवळ कडू रसाच्या गोष्टी खाऊन जगू शकेन शक्य नसते. पचनाचा विचार करताना कटू रसाचा, अन्नाची रुची व भूक वाढवायची असली तर आम्ल रसाचा, शरीरात स्रोतसांना अवरोध व कडकपणा असल्यास लवण रसाचा, दोषांशी वा जीवजंतूंशी सामना करायचा असला तर तिक्त रसाचा आणि शरीरात द्रवांचे संतुलन करण्यासाठी कषाय रसाचा फायदा होतो.

आयुष्य आरोग्यपूर्ण जगायचे असले तर आपल्या आहारात सगळ्या रसांचा योग्य प्रमाणात समावेश झाला पाहिजे. सध्या मधुररसप्रधान गोष्टींना आपल्या आहारातून वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जात आहे. अमुक गोष्ट शरीरात साखर वाढविणार आहे, वजन वाढवणार आहे, याचा ग्लायसेमिक इन्डेक्स जास्त आहे यामुळे या गोष्टी आहारात असू नयेत असा सल्ला दिला जातो.

आधुनिक दृष्ट्या विचार केला तर मधुर रसप्रधान गोष्टींमध्ये जवळजवळ सगळ्याच सामान्य आहारात येतात. साखर, फॅट व कर्बोदके या गोष्टी तर मधुररसप्रधान आहेतच, ज्यांना आपल्या ताटाबाहेर ठेवण्याचा सल्ला सध्या दिला जातो आहे, परंतु सध्या खूप प्रचलित असलेले प्रोटिन्स अर्थात अमिनो ॲसिडस् हेसुद्धा खरे तर मधुर रसातच मोडतात. आज आपण बाकीच्या गोष्टी टाळून प्रोटिन्स खातो आहोत, मात्र पुढे जाऊन कदाचित आपल्याला प्रोटिन्स पचले नाही तर तेही आपण ताटाबाहेर ठेवणार आहोत का? मग आपण काय खाणार आहोत? हवा?

एकूणच काय, हा मधुररस जो आपल्या शरीरात सगळ्या गोष्टी, एकूण सर्व शरीरच तयार करतो, त्याबद्दल आपण तिटकारा उत्पन्न केला तर त्याचे शरीरात पचन कसे होईल? मधुमेह झाला की आता तुम्ही गोड खाणे टाळा असे पूर्वी म्हटले जात असे, पण तुमच्या घरात मधुमेह असला तर गोड खाणे बंद करा, तुम्ही तुमच्या

स्वास्थ्याबद्दल जागरूक असला तर गोड खाणे बंद करा असा सल्ला सध्या दिला जातो. या सगळ्यांतून आपल्याला काय प्राप्त झालेले आहे? मधुमेह सध्या युवा पिढीत म्हणजे चाळिशीत होताना दिसतो. जन्म झाल्या झाल्या मुलांमध्ये मधुमेह दिसतो आहे, एवढेच नव्हे तर पोटात गर्भ असताना आईला मधुमेह होताना दिसतो आहे. मानसिकतेचा परिणाम आपल्या पचनावर होऊन आपण मधुररस पचवण्यास असमर्थ होतो आहोत.

पारंपरिकरीत्या पाहिले तर कुठलीही पाककृती करताना किंवा कुठल्याही सणाला या रसांचे नियोजन करण्याची पद्धत होती. आता गुढीपाडवा येतो आहे. या काळात दूध, दही, ताक वगैरे गोष्टी जास्त प्रमाणात वापरल्या जातात हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला गोड श्रीखंड करण्याची पद्धत रूढ झाली असावी. या दिवशी गोड श्रीखंडाबरोबर कडुनिंबाची चटणी खाण्याची पद्धत आहे.

आजच्या सिद्धांतांचा विचार केला तर श्रीखंड आरोग्यासाठी अत्यंत चुकीचे आहे, कडुनिंबाची चटणी उत्तम आहे; त्यामुळे कडुनिंबाची चटणी इच्छा असेल तेवढी खावी व श्रीखंड मात्र खाऊ नये. अशा आहारामुळे शरीरात असंतुलन तयार होणार हे नक्की.

शरीराला पोषण मिळण्याच्या दृष्टीने विचार केला तर वाटीभर श्रीखंडाच्या बरोबरीने बोराच्या आकाराएवढी कडुनिंबाची चटणी खाल्ली तर रसांचे संतुलन होऊन पचनालाही मदत होते, ज्यामुळे शरीरात बल व शुक्र वाढायला मदत मिळेल. गोडसाठी तयार झालेल्या रेझिस्टन्सबद्दल आपल्याला खोलवर विचार करण्याची गरज आहे. सध्या आर्टिफिशियल स्वीटनर्स टाकून बनविलेले पदार्थ खाण्याची पद्धत रूढ होते आहे.

स्टिव्हिया व अस्पार्टम् सारख्या गोष्टी टाकून बनविलेले गोड पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरावर किती दुष्परिणाम होत असतील याचा आपण विचार केला आहे का? अशा पदार्थांमुळे मूत्रपिंड, यकृत यांच्या कार्यक्षमेतवर परिणाम होतो, हॉर्मोन्सचे असंतुलन होते, पाळी लवकर येते, नसांसाठी घातक ठरते, असे कितीतरी त्रास होतात याबद्दल आपण विचार करत नाही.

आपण आहारातूनच तयार होतो. आहारातील गोडवा जसा जसा कमी होत चाललेला आहे तशी समाजात कटुता वाढत चाललेली आहे का? हा प्रश्न मला पडतो. एकूणच सहनशीलता, समाधान, शांती, हे सगळे सध्या समाजात कमी होते आहे. मधुररस शरीरात कफ वाढवतो. शरीरात कफ व्यवस्थित असला तर मनुष्याचे मन शांत राहायला मदत मिळते. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर गोडव्याचा समावेश होईल तेव्हाच संपूर्ण समाजात मिठास टिकून राहायला मदत मिळेल.

येत्या नवीन वर्षात आपण ठरविले पाहिजे की, कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण आपल्याकडे असलेल्या पारंपरिक आहाराच्या संकल्पनांचा अवलंब करण्यास सुरुवात करू या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com