esakal | रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती?
sakal

बोलून बातमी शोधा

blood pressure checking

Blood Pressure: रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

- डॉ. विनय कुमार बहल, कार्डिओलॉजिस्ट, प्रिन्सिपल डायरेक्टर, मॅक्स हॉस्पिटल, नवी दिल्ली, माजी डीन आणि हेड - एआयआयएमएस, नवी दिल्ली.

रविवारी सकाळी माझ्या एका रुग्णाचा फोन आला. वय ५० वर्षे, पुरुष आणि पेशाने बँकर, चिंताग्रस्त आवाजात ते बोलत होते. 'डॉक्टर, मला वाटतं मला हाय बीपीचा अटॅक आलाय, माझा अपर नंबर (सिस्टोलिक) १६० येतोय!' मला त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची कल्पना असल्यामुळे माहित होते की त्यांना सौम्य हायपरटेन्शन आहे जे नियंत्रणात आहे. मी त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा समजले की, ते नुकतेच धावून आणि सात मजल्यांचे जिने चढून आले होते, त्यांना दम लागला होता. त्यामुळे काळजी वाटून त्यांच्या पत्नीने घरी असलेल्या डिजिटल बीपी मशीनवर त्यांचे ब्लड प्रेशर तपासले. मी त्यांना धीर दिला की व्यायाम करताना ब्लड प्रेशर वाढणे ही एक सामान्य बाब आहे आणि खूप जास्त व्यायामामुळे सिस्टोलिक २०० एमएमएचजीपर्यंत देखील पोहोचू शकते.

असे घडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. 'खूप जास्त' रिडींग आल्याचे सांगणारे कॉल्स मला याआधी देखील आले होते. दुर्दैवाने हायपरटेन्शनने ग्रस्त लोकांची संख्या भारतात खूप वाढली आहे आणि नोकरी-व्यवसाय करत असलेल्या युवा पिढीमध्ये याचे प्रमाण सर्वात जात आहे. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील जवळपास २६% भारतीय वयस्क आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ३२% व्यक्तींना हायपरटेन्शनचा त्रास असतो. दीर्घकाळपर्यंत अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे रक्तपेशींचे नुकसान होते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, एनयूरीसम (रक्तपेशींच्या बाजूंना सूज येणे आणि त्यामुळे त्या कमजोर पडणे), हृदय निकामी होणे, किडनीचे नुकसान होणे, दृष्टी जाणे आणि परिधीय धमनी (पेरिफेरल आर्टरी) आजार हे देखील उद्भवू शकतात. २०१९ मध्ये जगभरातील कोरोनरी हृदयरोग (हृदयातील धमन्यांचा आजार), स्ट्रोक आणि हृदय निकामी होण्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त केसेसचे कारण हायपरटेन्शन हे होते आणि हायपरटेन्शनने १०० लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले. भारतात स्ट्रोकमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ५७% केसेसमध्ये आणि कोरोनरी हृदयरोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २४% केसेसमध्ये उच्च रक्तदाब कारणीभूत असतो. उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनला 'सायलेंट किलर' असे म्हणतात. याचे कारण म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या ३०% हून जास्त लोकांना त्याची जाणीवच नसते. म्हणूनच हायपरटेन्शनवर उपचार केले जाणे, त्याचे व्यवस्थापन आणि त्यावर नियंत्रण ठेवले जाणे खूप महत्त्वाचे आहे.

हायपरटेन्शनच्या व्यवस्थापनामध्ये एका महत्त्वाच्या पैलूकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते, ते म्हणजे बीपी मोजण्याची योग्य पद्धत. हे महत्त्वाचे आहे कारण बीपी किती नियंत्रणात आहे यानुसार त्यावरील औषधोपचार ठरवले जातात. आधी रुग्ण दवाखान्यात येऊन डॉक्टरकडून आपला रक्तदाब तपासून घेत असत. डिजिटल बीपी तपासणी उपकरणे सहज मिळू लागली आणि त्यांच्या किमती देखील माफक आहेत, त्यामुळे आजकाल बहुतांश लोक घरीच, स्वतः स्वतःचा रक्तदाब तपासतात. बीपी तपासणी ही एक सामान्य प्रक्रिया आहे, पण जर ती अयोग्य पद्धतीने केली गेली तर चुकीचे रीडिंग्स मिळू शकतात. चुकीच्या तंत्राचा वापर केल्याने बीपी तपासणीमध्ये चुका होऊन चुकीचे निदान केले जाते, इतकेच नव्हे तर उपचार देखील चुकीचे केले जाऊ शकतात.

हेही वाचा: Fruits For High BP: उन्हाळ्यात हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर

बीपी तपासणी करत असताना पुढील बाबींचे पालन नक्की करावे, जेणेकरून अचूक रीडिंग्स मिळण्यात मदत होईल:

- व्यक्तीचे मन शांत असेल अशावेळी, शक्य असेल तर सकाळी लवकर बीपी तपासणी करावी.

- ज्यांची बीपी तपासणी करावयाची आहे, त्या व्यक्तीने बीपी तपासणी करण्याच्या आधीच्या कमीत कमी अर्ध्या तासात धूम्रपान, काहीही खाणे, व्यायाम किंवा कोणत्याही कॅफिनेटेड द्रव्याचे सेवन इत्यादी केलेले नसावे.

- बीपी तपासणी करण्याच्या आधी खुर्चीवर बसा आणि पाच मिनिटे शांत रहा.

- मूत्राशय रिकामी असणे खूप महत्त्वाचे आहे, मूत्राशय भरलेले असल्यास बीपी रीडिंग्स जास्त येण्याची शक्यता असते.

- बीपी रीडिंग्स घेत असताना रुग्ण आणि डॉक्टर/केअरटेकर यांनी बोलणे टाळावे.

- बीपी कफ योग्य मापाचा असावा.

- बीपी कफ हाताच्या कोपराच्या वर, उघड्या त्वचेवर घट्ट बांधावा. कपड्यांच्या वर बीपी कफ बांधल्यास रिडींग जास्त येऊ शकते.

- ज्या व्यक्तीची बीपी तपासणी केली जात आहे त्या व्यक्तीने सरळ, ताठ बसावे, पाठीला आधार दिलेला असावा, पाय एकावर एक ठेवलेले असू नयेत, पावले जमिनीवर सपाट टेकलेली असावीत आणि श्वसन सामान्य गतीने करावे.

- हाताला हृदयाच्या पातळीला आधार दिलेला असावा.

- जेव्हा बीपी तपासणी केली जात असेल तेव्हा त्या व्यक्तीने हालचाल करू नये.

- घरी बीपी तपासणी करत असाल तर तीन रीडिंग्स घ्या आणि शेवटच्या दोन रीडिंग्सची सरासरी हे तुमचे ब्लड प्रेशर रिडींग म्हणून घ्या.

- बीपी तपासणीच्या दैनंदिन नोंदी ठेवा.

घरी बीपी तपासणीच्या संदर्भातील अजून एक बाब म्हणजे मनगट आणि बोटावर लावून बीपी मॉनिटरिंग करणारी स्मार्ट डिव्हायसेस खूप लोकप्रिय बनली आहेत. मनगट आणि बोट यांपासून हृदयाच्या धमन्या जास्त लांब असतात त्यामुळे या डिव्हायसेसच्या बाबतीत अपर (सिस्टोलिक) आणि लोअर (डायस्टोलिक) प्रेशर यामध्ये खूप मोठा फरक येऊ शकतो.

वर नमूद करण्यात आलेल्या साध्या व सोप्या सूचनांचे पालन केल्यास आणि नीट तयारी केल्यास क्लिनिक आणि घरी देखील योग्य बीपी तपासणी केली जाऊ शकते. महामारीमुळे टेलिकन्सल्टिंगचे प्रमाण वाढत आहे, उपचारांच्या प्रभावावर लक्ष ठेवण्यासाठी घरी बीपी तपासणी करणे हे आता एक महत्त्वाचे साधन बनले आहे, त्याचा वापर करून डॉक्टर्स हायपरटेन्शनवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकतात आणि आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

loading image
go to top