सोन्याहून पिवळे

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला अर्थात सुवर्णाला खूप महत्त्व दिलेले आहे. प्रत्येक भारतीय घरात सोने विकत घेण्याची पद्धत आहे.
Gold
Goldsakal

- डॉ. मालविका तांबे

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला अर्थात सुवर्णाला खूप महत्त्व दिलेले आहे. प्रत्येक भारतीय घरात सोने विकत घेण्याची पद्धत आहे. रोज शरीरावर काही सोन्याचे दागिने घातले जातातच, पण सणवार, समारंभ असले तर ठेवणीतील सोन्याचे दागिने बाहेर येतात. सोने दिसायला आकर्षक तर असतेच, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोने कधीही खराब होत नाही, त्याला गंज वगैरे लागत नाही, स्थिर असते.

अर्थात चमक-तेजस्विता, आकर्षकता व दीर्घायुष्य हे तिन्ही सोन्याला लाभलेले आहेत. म्हणूनच अनेकदा आपण सुवर्णाची उपमा वापरतो. सुंदर वर्ण असणाऱ्याची कांती सोन्यासारखी आहे, असे आपण म्हणतो. लहान बाळाला आवडीने सोनूला वगैरे म्हणतो. काही चांगले झाले वा उत्तम असले तर सोन्याहून पिवळे असे म्हणतो. सोन्याचे गुण पाहून आयुर्वेदाने सोन्याला खूप महत्त्व दिलेले आहे.

स्वादु हृद्यं बृंहणीयं रसायनं दोषत्रयापहं शीतं चक्षुष्यं विषसूदनं च ।...सुश्रुत सूत्रस्थान रुच्यचक्षुष्यायुष्करं प्रज्ञाकरं वीर्यकरं स्वर्यं कान्तिकरं च ॥...धन्वन्तरी निघण्टु

सुवर्ण रसाने मधुर, वीर्याने शीत असते. हृदयासही हितकर असते. सर्व शरीरधातूंचे पोषण करते, रसायनस्वरूप काम करते, वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांना संतुलित करते, शरीरातील विषद्रव्यांचा व अशुद्धींचा नाश करते, डोळ्यांची शक्ती वाढवते, आयुष्य वाढवते, प्रज्ञा संपन्न करते, वीर्यवृद्धी करते, स्वर सुधारते आणि त्वचा तेजस्वी व कांतियुक्त करते.

हे चवीला मधुर, किंचित कषाय रसप्रधान असते, शीतवीर्य असते. सोने उष्ण असल्यामुळे गर्भवतीने व लहान मुलांनी घ्यावे की नाही असा प्रश्‍न लोकांच्या मनात अनेकदा असतो. परंतु खरे तर सोने शीतवीर्य असते, स्निग्ध असते, लघू असते तसेच त्वचा तेजस्वी करायला मदत करते, कांतिवर्धक असते, वृष्य असते अर्थात शरीरात वीर्य वाढवते, त्रिदोषांचे शमन करते, विषघ्न (विषाला कमी करणारे), हृदयासाठी हितकर, रसायन अर्थात शरीरातील धातूंच्या पोषणाला मदत करणारे असते.

एवढेच नव्हे तर सुवर्ण सर्व रोगांचा नाश करते, सुख देते, इंद्रियांना सामर्थ्यवान बनवते, शुक्रधातूची वृद्धी करते, बल व तेज वाढवते, शरीराची पुष्टी करते तसेच कार्य करण्याची शक्ती वाढवते. अर्थातच सोन्याचे हे गुण सुवर्ण सेवन करण्यानेच मिळू शकतात, शरीरावर सोने धारण केल्याने सुवर्णाचा संस्कार वेगळ्या प्रकारे होतो.

सोने शरीरात घेणे एवढे सोपे नव्हे. कुठलाही धातू शरीरात जायचा असला तर त्याची एक विशिष्ट पद्धत असते. वाटीभर शिरा सहज खाता येतो, तथापि सुवर्णासारख्या धातूची गरज सूक्ष्म प्रमाणात असते. त्यामुळे सोने घेण्यापूर्वी खूप विचार करावा लागतो. आयुर्वेदाच्या रसशास्त्रात सांगितले आहे की, शुद्ध सोने गरम केल्यावर लाल होते, कापल्यावर पांढरे दिसते, कसोटीच्या दगडावर घासल्यावर केशरी रंग देते.

सोन्यात चांदी वा तांब्याची भेसळ नसावी, तसेच ते स्निग्ध, मृदू असावे. कडक, हलके, कोरडे, कसोटीच्या दगडावर घासल्यास व गरम केल्यावर पांढरट होत असेल, ज्यात इतर धातूंची भेसळ केलेली असेल ते सोने आरोग्यासाठी अहितकर असते. असे सोने वापरल्यामुळे बुद्धी, बल व आरोग्य बिघडते.

सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलर्धनम्‌ ।

आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्‌ ॥

मासात्‌ परममेधावी व्याधिभिर्न च धृष्यते ।

षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद्‌ भवेत्‌ ॥...काश्यपसंहिता

सोने चाटवण्याची क्रिया मंगलदायक व पुण्यकारक असते. यामुळे कोणत्याही प्रकारची ग्रहबाधा (पूर्वी पाहिल्याप्रमाणे यात निरनिराळ्या जिवाणू-विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचाही समावेश होतो) होण्यास प्रतिबंध होतो, असे काश्यपाचार्यांनी सांगितले आहे. महिनाभर नियमित सोने चाटवल्यास बालकाची आकलनशक्ती वाढते आणि त्याला सहसा कोणताही रोग होत नाही, तसेच सहा महिन्यांपर्यंत नियमित चाटवल्यास बालक एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल इतके हुशार होते, असेही ते पुढे सांगतात.

आयुर्वेदशास्त्राने जन्म झाल्याबरोबर बालकाला सुवर्णाचे रसायन वापरायला द्यायला सांगितलेले आहे. सुवर्ण हे रसायन आहे, बरोबरीने ते वाजीकरही आहे म्हणजे सुवर्ण शरीरामध्ये बलसुद्धा वाढवते. त्यामुळे बाळ व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांनी गर्भधारणा होण्यापूर्वी सोन्याचे रसायन म्हणून उपयोग करायला सांगितलेले आहे.

अनेक पुंसवन कर्मांसाठी, गर्भाशयाला ताकद मिळावी, गर्भाला ताकद मिळावी, पुरुषांचे वीर्य ताकदवान व्हावे यासाठी सुवर्णाचा संस्कार सांगितलेला आहे. इतकेच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुवर्णप्राशनाचे महत्त्व आयुर्वेदात सांगितलेले आहे. आचार्य कश्यप यांनी बाळाला सुवर्णप्राशन लेपनाच्या स्वरूपात करायला सांगितलेले आहे. दगडी सहाणेवर थोडे तूप व मध घेऊन त्यात शुद्ध २४ कॅरेट सोने उगाळून बाळाला जन्मानंतर लगेच द्यायला त्यांनी सांगितलेले आहे.

असे सोने दिल्याने बाळाची बुद्धिमत्ता वाढते, पचन सुधारते, चयापचय क्रिया व्यवस्थित होते, बाळाला बल मिळते, दीर्घायुष्याचा लाभ होतो, बालक समृद्ध व ताकदवान होते व ते कुठल्याही नकारात्मकतेपासून लांब राहते. नियमित एक महिना बालकाला असे सुवर्णप्राशन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि असे सुवर्णप्राशन सहा महिने केल्यास बाळ एकदा ऐकलेले सगळे लक्षात ठेवते. यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.

लहान मुलांमध्ये सुवर्णप्राशन देताना काही गोष्टींकडे लक्ष ठेवावे याकडे लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे असते.

1) सुवर्णाची शुद्धी सर्वांत महत्त्वाची आहे. ते २४ कॅरेटचे असावे.

2) सुवर्ण किती प्रमाणात पोटात गेले पाहिजे याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते, अर्थात सोन्याची मात्रा महत्त्वाची असते.

3) सुवर्णप्राशन वेगवेगळ्या वनस्पतींबरोबरही करता येते.

संतुलन गर्भसंस्कारांमध्ये बालकांना जन्माच्या पहिल्या दिवसापासून संतुलन बालामृत द्यायला सांगितले जाते. मुलांमध्ये बुद्धीचा विकास साधारणपणे पाचव्या वर्षापर्यंत होत असतो. संतुलन बालामृतमधील मुख्य घटक आहे शुद्ध सोने तसेच त्यात शुद्ध काश्मिरी केशर व बालकाच्या स्वास्थ्यासाठी उत्तम असलेल्या अन्य वनस्पतीही असतात. मुख्य म्हणजे बालामृत बनविताना उपरोक्त तिन्ही निकषांचे पालन व्यवस्थितपणे केलेले असते.

सुवर्णप्राशनाबद्दल बऱ्याच गैरसमजुती असलेल्या दिसतात.

एक महिना सुवर्णप्राशन करणे पुरेसे असते अशी अनेकांची समजूत असते. परंतु सुवर्णप्राशन हे संपूर्ण आयुष्यभर करणे योग्य ठरते. वयाच्या बारा-सोळा वर्षांपर्यंत मुलांचा विकास होत असतो. किमान या वयापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुवर्णप्राशन व्हायलाच पाहिजे.

आपल्या शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये पुष्य नक्षत्राला महत्त्व दिलेले दिसते. पुष्य नक्षत्र शुभ असल्यामुळे या नक्षत्रावर नवीन गोष्टी सुरू केल्या जातात. सोने विकत घेण्यासाठी गुरुपुष्ययोग महत्त्वाचा समजला जातो. म्हणूनच की काय, सुवर्णप्राशन पुष्य नक्षत्रावर करावे असा समज पसरलेला आहे. परंतु सुवर्णप्राशन ही नियमित करायची गोष्ट आहे. घरच्या घरी रोज नियमितपणे सुवर्णप्राशन घेणे उत्तम असते.

आयुर्वेदात सुवर्णयोगाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. उदा. सुवर्णवर्ख, सुवर्णभस्म. सोने व मध तुपाबरोबर शरीरात गेले तर ते अधिक व्यवस्थितपणे शोषले जाऊ शकते व त्याचे कार्य अधिक व्यवस्थितपणे होऊ शकेल. म्हणून डॉ. बालाजी तांबे अमृतशर्करायुक्त पंचामृत (दूध, तूप, दही, मध व अमृतशर्करा) घेण्याचा आग्रह धरत असत. लहान वयापासून अमृतशर्करायुक्त पंचामृत दिले तर रसायनाचे वर सांगितलेले सर्व फायदे मिळू शकतात.

तसेच सुवर्णप्राशनाचा छोटेखानी प्रयोग म्हणता येईल असे सुवर्णसंस्कारित जल प्रत्येक घरी करायला हरकत नाही. सुवर्णसंस्कारित जल करताना वापरलेल्या सोन्याचे वजन कमी होत नाही, त्याचा पाण्यावर फक्त संस्कार होतो.

सुवर्णसंस्कारित जल पचायला चांगले असते व त्यामुळे सोन्याचे फायदे काही प्रमाणात तरी मिळू शकतात. सध्या सोन्यावर अनेक प्रकारचे संशोधन सुरू आहे. त्यातून हे सिद्ध झालेले आहे की, सोने प्रतिकारशक्ती वाढवते, बुद्धिवर्धनासाठी, पोषणासाठी व एकूणच संपूर्ण स्वास्थ्याच्या दृष्टीने उपयोगी असते.

सुवर्णाचे अशा प्रकारचे अनेक फायदे पाहता सुवर्णकवच संपूर्ण कुटुंबासाठी वापरणे उत्तम. असे केल्याने आपले आयुष्य सोन्याहून पिवळे होऊन झळाळू लागेल, यात संशय नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com