Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 08th May 2022 to 14th May 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope
साप्ताहिक राशिभविष्य (०८ मे २०२२ ते १४ मे २०२२)

साप्ताहिक राशिभविष्य (०८ मे २०२२ ते १४ मे २०२२)

नोकरीत भाग्योदयाची चाहूल

मेष : सप्ताहारंभी रवी-हर्षल युतियोगाचं फिल्ड राहीलच. ता. ८ व ९ मे हे दिवस तरुणांच्या व्यथांचेच राहतील. प्रेम प्रकरणात अडकू नका. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात शांत राहावं. नवपरिणितांनी सांभाळावं. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट नोकरीत भाग्योदयाची चाहूल देणारा.

व्यवसायात मोठा धनलाभ

वृषभ : राशीतील वक्री बुधाची विशिष्ट स्थिती आणि गुरू-शुक्राची साथ तरुणांना मुलाखती, स्पर्धा परीक्षा आणि वैयक्तिक कला, छंद वा इतर उपक्रमांतून झगमगाटी यश देईल. मात्र, उधार-उसनवारी सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक मोठा धनलाभ. बॅंकांची कामं होतील.

वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ

मिथुन : सप्ताहात वक्री बुधाच्या पार्श्‍वभूमीवर सहली-करमणुकी घडतील. गुरू-शुक्राची पार्श्‍वभूमी नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ देईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती चातुर्याने लाभ उठवतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी भातृचिंता. दुखापतीपासून जपा.

नवे व्यावसायिक पर्याय मिळतील

कर्क : पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक नवे पर्याय उपलब्ध होतील. सप्ताहाचा आरंभ घरात कार्यं ठरवणारा. पुत्रोत्कर्षातून आनंदोत्सव. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळभ्रमण उष्णताजन्य विकारांतून त्रासदायक. ता. ११ मेचा बुधवार एकूणच अशांत राहील. मित्रांशी टोकाचे वाद होऊ शकतात. राजकीय गुंडांपासून जपाच.

नोकरीत बढतीची शक्यता

सिंह : सप्ताहात मंगळ भ्रमणाच्या झळा पोचतील. विचित्र माणसं भेटतील. नवपरिणितांना वैवाहिक जीवनात गैरसमजातून त्रास. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी पथ्यं पाळावीत. बाकी सप्ताहात मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीचे सूतोवाच. ता. १२ व १३ हे दिवस मोठे व्यावसायिक लाभ देतील. पुत्रचिंता जाईल.

सरकारी धोरणातून लाभ

कन्या : सप्ताहातील वक्री बुधाची स्थिती आणि गुरू-शुक्राची साथसंगत व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढवतील. काहींना विशिष्ट सरकारी धोरणांतून लाभ. एकूणच उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक स्वास्थ्यात वाढ करणारं ग्रहमान. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ मेचा शुक्रवार सुवार्तांतून मौजमजेचा. स्त्रीचा गोड सहवास!

कागदपत्रांचे व्यवहार जपून करा

तूळ : सप्ताहारंभी रवी-हर्षल सहयोगाचं फिल्ड राहीलच. वक्री बुधाच्या पार्श्‍वभूमीवर संमोहन टाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी कागदोपत्रीचे व्यवहार जपून करावेत. स्वाती नक्षत्राच्या स्त्रीवर्गास घरातील लहान मुलांचे त्रास सतावतील. बाकी सप्ताहारंभ व्यावसायिक प्राप्तीत वाढच करेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची वसुली होईल.

तीर्थाटनाचा योग

वृश्‍चिक : सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना छानच ग्रहमान राहील. आजचा रविवार विशिष्ट शुभारंभाचा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांचीच कनेक्‍टिव्हिटी राहील. मार्केटिंग यशस्वी होईल. काहींना प्रेमाचे गुप्त संकेत मिळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचे योग. ज्येष्ठा व्यक्तींना ता. १० चा मंगळवार विचित्र जागरणाचा.

कायदेशीर बाबींमधल्या कटकटी संपतील

धनू : आपल्या राशीस एकूणच हा सप्ताह ग्रहयोगांतून मोठी ऊर्जा देईल. सप्ताहाची सुरुवात मोठी सुंदरच. नोकरीत अतिशय शुभसूचक. नोकरीत कौतुकाचा काळ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ व १३ हे दिवस विजयोत्सवाचे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींच्या कायदेशीर बाबींमधल्या कटकटी संपतील.

साडेसातीच्या झळा कमी होतील

मकर : साडेसातीच्या झळा कमी करणारा सप्ताह. व्यावसायिक आर्थिक कोंडी निश्‍चितच फुटेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी उत्तम दिलासा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ व १३ हे दिवस मोठे चमत्कार घडवणारे. तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात थट्टामस्करी टाळावी!

वास्तुविषयक व्यवहारांना गती

कुंभ : सप्ताह कौटुंबिक पार्श्‍वभूमीवर छानच राहील. वास्तुविषयक व्यवहारांना गती येईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट जुन्या गुंतवणुकींतून लाभ होतील. एखादी पुत्रचिंता जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १० व ११ हे दिवस गाठीभेटींतून वादग्रस्त. बाकी शुक्रवार कौटुंबिक जल्लोषाचा.

बोलण्यावर नियंत्रण ठेवा

मीन : सप्ताहात चंद्रबळ राहील. त्यामुळेच राशीतील गुरू-शुक्र उत्तम बोलतील. मात्र गुरूवर श्रद्धा ठेवा! तरुणांना हा सप्ताह छान ऊर्जा देणारा. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. रेवती व्यक्तींनी ता. १० व ११ या दिवसांत तोंड सांभाळावे. अर्थातच, गैरसमज होऊ देऊ नयेत.