नाशिकला बनवा शूटिंग हब

नाशिक :  चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी असलेल्या नाशिकमधील कलावंतांनीही चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मुंबईपेक्षा येथील वातावरण चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भविष्यात नाशिक शहर आणि परिसर चित्रपटसृष्टीसाठी 'शूटिंग हब' बनू शकते, असा सूर आज नवव्या नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुंजला.

(सोमनाथ कोकरे : सकाळ छायाचित्रसेवा)
फेस्टिव्हलचे औपचारिक उद्‌घाटन आज सायंकाळी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झाले. महापौर रंजना भानसी, आयोजक मुकेश कणेरी, ज्येष्ठ अभिनेते रणजित, माजी मंत्री बबनराव घोलप, अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रभावती कणेरी, शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक अजय बोरस्ते, नगरसेविका हिमगौरी आडके, चित्रपट निर्माते सतीश राय, रवी बारटक्के, कथालेखक दिलीप शुक्‍ल, दिग्दर्शक बलराज वीज, श्‍याम लोंढे, लक्ष्मण सावजी आदी व्यासपीठावर होते. चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक लेख टंडन यांना या वेळी जीवनगौरव पुरस्काराने, तर अभिनेत्री शहाणे यांना नीफ सन्मानाने गौरविण्यात आले. येत्या रविवार (ता. 26)पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. 'स्वच्छ भारत अभियान', 'बेटी बचाव- बेटी पढाओ' व 'महिला सक्षमीकरण' ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.


नाशिक ही शूटिंग भूमी व्हावी, हे आपले स्वप्न असून, ते लवकरच पूर्णत्वास येईल, असा विश्‍वास माजी मंत्री घोलप यांनी व्यक्त केला. श्री. कणेरी म्हणाले, की महोत्सवासाठी 30 देशांमधून प्रतिनिधी आले आहेत. मुंबईतील वातावरण कमालीचे व्यावसायिक असल्याने नाशिक शूटिंग हब बनू शकतो. मात्र, मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये स्क्रिनिंग फॅसिलिटी निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फाळके स्मारकात चित्रपट निर्मितीसाठी आवश्‍यक मदत देण्याचे आश्‍वासन महापौर भानसी यांनी दिले.

'कासव' चित्रपट
महोत्सवांतर्गत येत्या शनिवारी (ता. 25) सायंकाळी सातला रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख भूमिका असलेला 'कासव' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. डॉ. आगाशे यांच्यासह किशोर कदम, इरावती हर्षे, आलोक राजवाडे आदींच्या यात प्रमुख भूमिका आहेत. नैराश्‍याच्या गर्तेत सापडलेल्या मानवी मनाचे अंतरंग उलगडून दाखविणारा 'कासव' चित्रपट पाहण्याची व त्यानिमित्त डॉ. आगाशे यांच्याशी संवाद साधण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती 'सायकिऍट्रिक सोसायटी'च्या नाशिक शाखेतर्फे देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com