गोलाणी व्यापारी संकुल अखेर चकाचक 

महापालिकेच्या ५५० कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता; ७८ ट्रॅक्‍टर कचरा संकलन 

जळगाव - अस्वच्छतेच्या प्रश्‍नावरून गोलाणी व्यापारी संकुल चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर व्यापारी, गाळेधारकांचे धाबे दणाणले. रविवारी त्यातून तोडगा काढत आज प्रभारी आयुक्तांच्या आदेशाने संपूर्ण गोलाणीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महापालिकेच्या साडेपाचशे सफाई कामगारांच्या साहाय्याने जवळपास ७८ ट्रॅक्‍टर कचरा जमा करण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण मोहिमेच्या वेळी प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर व्यक्तिशः हजर राहून लक्ष ठेवून होते. मार्केटमधील गाळेधारकांनी आपल्या दुकानालगतची सर्व अनधिकृत फलक, वायरचे जाळे, चोकअप झालेल्या पाइपलाइन आठ दिवसांत काढून टाकाव्यात अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा निंबाळकरांनी गाळेधारकांना दिला. 

सकाळी सहापासून स्वच्छतेला सुरवात
गोलाणी मार्केट परिसरातील स्वच्छता मोहिमेला सकाळी सहापासून सुरवात करण्यात आली. यात आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, अतिक्रमण विभागाचे तब्बल ५५० कर्मचाऱ्यांनी कामाला सुरवात केली. १३ ट्रॅक्‍टर, ‘४ घंटागाड्या, ४ पिकअप व्हॅन व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र गट तयार करून त्यांना प्रत्येक मजल्याच्या सफाईची जबाबदारी देण्यात आली. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार तसेच सर्व विभागांचे प्रमुख व अभियंते उपस्थित होते. तसेच महापौर नितीन लढ्ढा यांनीदेखील गोलाणी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. 

गच्चीवर जाण्यास बंदी
प्रभारी आयुक्त श्री. निंबाळकर यांनी दुपारी स्वच्छता मोहिमेची पाहणी करताना संकुलाच्या गच्चीवर जाऊन पाहणी केली. गच्चीवर दारू पिणारे, गैरकृत्य करीत असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर गच्चीवर जाणाऱ्या प्रवेशद्वारांना कुलूप लावून गच्चीवर जाण्यास बंदी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.     

जाहिरात फलक, वायर काढण्याचे आदेश
आयुक्त श्री. निंबाळकर यांनी पाहणीतून मार्केटमध्ये अवैधपणे जाहिरातींचे फलक तसेच जागोजागी वायरींचे जाळे धोकादायक स्थितीत आढळून आले. गाळेधारकांना त्वरित हे फलक व वायरी व्यवस्थित करण्याचे सांगितले. तसेच सांडपाण्याचे पाइप बदलण्याच्याही सूचना दिल्या. त्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून ही व्यवस्था केली नाही, तर सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना अतिक्रमण अधीक्षकांना दिल्या.

कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी पाठवू
आयुक्तांनी सकाळी केलेल्या पाहणीदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांची 
ओळख परेड घेतली. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक 
नसेल किंवा त्यांनी कामचुकारपणा केल्यास अशा कर्मचाऱ्यांना घरी पाठवून देऊ अशी तंबी दिली. तसेच अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले नाही तर त्यांना निलंबित करण्यात येईल अशीही ताकीद दिली. 

...तर पुन्हा संकुल बंद करेल
स्वच्छता पाहणीदरम्यान तीन- चार गाळेधारकांनी निंबाळकरांना ‘आम्हीतर कर भरतो तर स्वच्छतेचा कर आम्ही कशाला देवू, आमचे आठ गाळे तर पैसे जास्त होतात’, अशा तक्रारी मांडल्या. यावेळी आयुक्तांनी असोसिएशनचे टावरी, सूर्यवंशी, शोभा बारी यांना ‘तुम्ही काय ते ठरवा नाहीतर मी उद्यापासून पुन्हा संकुल बंद करेल’ अशी तंबी भरली. 

संकुलात सीसीटीव्ही बसविणार
पाहणीदरम्यान संकुलातील रहिवासी दीपा तापडिया यांनी श्री. निंबाळकर यांना संकुलात रात्रीच्या वेळी दारुडे तसेच गैरकामे करणाऱ्यांचा नेहमीच त्रास असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्तांनी संकुलात सुरक्षा रक्षक पासून ते सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसविले जातील असे सांगितले. 

रिकाम्या हॉलची माहिती काढा
पाहणीदरम्यान रिकाम्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा उचलण्यात आला. एकाच रिकाम्या हॉलमध्ये १३ ट्रॅक्‍टर कचरा गोळा करण्यात आला. त्यानुसार आयुक्त श्री. निंबाळकर यांनी संबंधित अधिकारी यांना सर्व रिकामे हॉल तसेच कोणाला ते दिले आहेत याची माहिती काढून त्यांना स्वच्छता करण्याचे सांगितले. 

दोन लाख ५२ हजार रुपये जमा
गाळेधारकांसोबत झालेल्या बैठकीत स्वच्छतेसाठी प्रति गाळ्यासाठी तीन महिन्यांचे अकराशे रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार महापालिकेच्या व्यापारी संकुल विभागातील १२ जणांचे पथक तयार केले आहे. त्यानुसार आज गोलाणीतील २३२ गाळेधारकांनी रक्कम जमा केली, त्यानुसार २ लाख ५२ हजार रुपये जमा झाले आहे. ज्या गाळेधारकांनी पैसे जमा केले नाही त्यांचे गाळे सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. 

सर्व कर्मचाऱ्यांसाठी मागविली केळी
साडेपाचशे कर्मचारी पहाटेपासून कामाला लागले, स्वतः प्रभारी आयुक्त त्यांच्यासोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांकडून केवळ कामच करून घ्यायचे नाही तर त्यांची काळजीही घेतली पाहिजे या भावनेतून निंबाळकरांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्वखर्चाने केळी मागवली.  

कचरा फेकणाऱ्यासह थुंकणाऱ्यास दंड
सफाई मोहिमेची पाहणी करताना आयुक्तांना दुपारी सफाई केलेल्या जागेवर साईदर्शन मोबाईल शॉपीच्या बाहेर कचरा फेकलेला दिसला. संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दुकानदाराला हजार रुपयांचा दंड आकारला. थुंकणाऱ्यावर देखील कारवाई करून दंड आकारला, तसेच तिसऱ्या मजल्यावर आणलेल्या सायकली देखील जप्त करून सर्व विंग मध्ये एक स्वच्छता पाहणीसाठी कर्मचारी तसेच त्यांना ज्याच्या दुकानाबाहेर कचरा दिसेल त्याला दंड आकारणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. 

गच्चीवर सापडले मृत कुत्रे
स्वच्छता मोहिमेत गोलाणी मार्केटच्या गच्चीवर स्वच्छता करताना सकाळी दोन-तीन मृत कुत्रे हे फुगलेल्या अवस्थेत सापडले. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. दोन-तीन दिवस जर अजून कुत्रे उचलले गेले नसते तर मोठी रोगराई संकुलातील परिसरात पसरली असती. आज स्वच्छता मोहिमेतून हे विदारक चित्र समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com